कोल्हापूर : प्रतिनिधी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटकातील सौंदती रेणुका देवीच्या यात्रेसाठी एस.टी. बसेसच्या भाडे व खोळंबा आकारामध्ये वाढ केली असून, सौंदत्ती यात्रेसाठी विशेष सवलत द्यावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेकडे केली आहे. (Saundatti Yatra)
दरवर्षी कोल्हापूर जिल्हा व आसपासच्या परिसरातून लाखो भाविक जातात. सदरच्या यात्रेकरिता गेली ३५ वर्षे श्री रेणुका देवीचे भक्त प्रासंगिक कराराद्वारे एस.टी. गाडीचा वापर करतात. याबाबत गेल्या १२ वर्षात केलेल्या पाठपुराव्यामुळे दरवर्षी वर्षी एस.टी. महामंडळाने सौंदती यात्रेसाठी ४५ आसन क्षमते पर्यंतच्या परिवर्तन बसेससाठी खासबाब म्हणून प्रत्यक्ष चालविण्यात आलेल्या प्रती किलोमीटरसाठी ५५ रुपयांप्रमाणे भाडे दर आकारणी व खोळंबा आकार रुपये १०/- प्रती तास बस आकारण्यास मंजुरी दिली होती. परंतु यावर्षी पुन्हा यावर तपासून कार्यवाही करण्याचे आदेश परिवहन मंत्री.प्रताप सरनाईक यांनी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना दिले आहेत. (Saundatti Yatra)
आमदार राजेश क्षीरसागर यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, यावर्षी सौंदती येथील मार्गशीष पौर्णिमा यात्रा डिसेंबर महिन्यात होणार आहे. यावर्षी प्रती किलो मीटरमध्ये भाडे दरात वाढ केली असून हा दर विशेष सवलती अंतर्गत पूर्वीप्रमाणेच करावा असे निवेदन जिल्हातील श्री रेणुका भक्त संघटनांनी दिले आहे. करण्यात आलेली दरवाढ भाविकांवर आर्थिक बोजा टाकणारी असून विशेष यात्रा सवलत म्हणून एस.टी.खोळंबा आकार रद्द होवून एस.टी. भाडे दरपूर्वीप्रमाणे कमी व्हावा. यासह प्रत्यक्ष प्रवासाच्या होणाऱ्या किलोमीटर प्रमाणे भाडे आकारणी करणेबाबतच्या सूचना संबधितांना मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. (Saundatti Yatra)
दरम्यान आमदार राजेश क्षीरसागर यांनी परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या विभाग नियंत्रकांना भाडे दर आणि खोळंबा आकारासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच यातून तोडगा काढून भाविकांना दिलासा दिला जाईल, अशी माहितीही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.