मुंबई : विशेष प्रतिनिधी : काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बंगळूरु आणि हैदराबादकडे जात असल्याची कबुली दस्तरखुद उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीच दिली आहे. ही अधोगती होईपर्यंत राज्य सरकार काय झोपा काढत होता का? असा संतप्त प्रश्न विचारून अजित पवारांनी याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. (Sapkal slams Ajit Pawar)
अजित पवार यांनी हिंजवडीला भेट दिल्याचा आणि तेथील संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचा संदर्भ देत सपकाळ म्हणाले की, पुणे हे महाराष्ट्रातील औद्योगिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे महत्वाचे केंद्र आहे. पुण्याचा नावलौकिक सर्वच बाबतीत मोठा होता पण तो आता इतिहासजमा झाला आहे. पुण्यात आता कोयता गँग, ड्रग्जचा काळाबाजार जोरात सुरु आहे. एक पाऊस पडला तरी पुणे जलमय होते. वाहतूक कोंडीची समस्या वाढलेली आहे, परिणामी आयटी उद्योगाला घरघर लागली आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली. (Sapkal slams Ajit Pawar)
पुण्यासह राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, सत्ताधारी पक्षाचा वाढलेला भ्रष्टाचार, पदाधिकाऱ्यांची गुंडगिरी यांना उद्योजक वैतागले आहेत. पायाभूत सुविधांचा बट्ट्याबोळ झाला आहे म्हणून आयटी उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहेत. राज्यातील आहे ते उद्योग तर जातच आहेत पण राज्यात येऊ घातलेली मोठी गुतंवणूकही कशी गुजरातली गेली हे काँग्रेस पक्षाने सातत्याने उघड केले आहे, याकडे सपकाळ यांनी लक्ष वेधले. (Sapkal slams Ajit Pawar)
वेदांता फॉक्सकॉन हा १.६ लाख कोटीची गुतंवणूक व २ लाख रोजगार देणारा उद्योग भाजपा युती सरकारच्या नाकर्तेपणामुळेच गुजरातला गेला पण सरकार ते मान्य करायला तयार नाही. आता उपमुख्यमंत्रीच उद्योग बाहेर जात आहेत असे सांगत असतील तर सरकारने यावर खुलासा करावा, असे सांगून सपकाळ म्हणाले की, पुणे शहराबरोबरच नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि मुंबईतही फारशी समाधानकारक परिस्थिती नाही. बेरोजगारांच्या फौजा उभ्या आहेत, शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहे, महागाईने जगणे कठीण झाले आहे आणि मंत्री मात्र हिंदू मुस्लीम भांडणे लावून खोके भरत आहेत. ही आका व खोके संस्कृतीच महाराष्ट्राचा घात करत आहे. एवढे भ्रष्ट, निष्क्रीय व निर्ल्लज सरकार राज्यात आजपर्यंत झाले नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.