Home » Blog » Awhad-Padalkar: आव्हाडांच्या नादाला लागले, तिथेच पडळकर फसले!

Awhad-Padalkar: आव्हाडांच्या नादाला लागले, तिथेच पडळकर फसले!

by प्रतिनिधी
0 comments
Awhad-Padalkar

राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे धिंडवडे निघाले आहेत, ही गोष्ट खरीच. परंतु ती गोष्ट तेवढ्यापुरती मर्यादित नाही. लोकप्रतिनिधींचा वर्तनव्यवहार, सत्तेचा माज आणि विधिमंडळासारख्या लोकशाहीच्या मंदिराचे संचलन करणाऱ्यांचा पक्षपाती व्यवहार अशा सगळ्याच गोष्टी यात मिसळल्या आहेत. या सगळ्या प्रकाराला दोन आमदारांमधील किंवा त्यांच्या समर्थकांमधील वाद असे सरधोपटपणे म्हणणे कुणावर तरी अन्याय केल्यासारखे आणि कुणाचा तरी बचाव केल्यासारखे होईल. आतापर्यंत हा विषय तुकड्या तुकड्यांनी समोर आला आहे. त्यामुळे अनेक गैरसमज झाले आहेत. म्हणूनच या प्रकरणाची क्रोनॉलॉजी समजून घ्यायला हवी. (Awhad-Padalkar)

-डॉ. विजय चोरमारे

जितेंद्र आव्हाड किंवा गोपीचंद पडळकर यांचा राजकीय भूतकाळ काय, त्यांची विचारसरणी काय वगैरे तपशीलात आता जाण्याचे कारण नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनाही विधिमंडळाची अप्रतिष्ठा झाली असे वाटते, त्या प्रकरणापुरतेच आपण बोलणार आहोत. ही अप्रतिष्ठा केवळ पडळकर आणि आव्हाड यांच्यामुळे झाली, की राहुल नार्वेकर आणि राम शिंदे आणि विधिमंडळ प्रशासनामुळेही झाली, याचाही ऊहापोह करण्याची गरज आहे. (Awhad-Padalkar)

विषय सुरू कुठून झाला?

 हा विषय सुरू कुठून झाला? तर उपलब्ध माहितीनुसार जनसुरक्षा विधेयक मंजूर झाले तेव्हापासून हा विषय सुरू झाला. त्यादिवशी पडळकर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना तिथून जाणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून त्यांनी अर्बन नक्षल वगैरे टिप्पणी केल्याचे सांगतात. परंतु हा भाग ठळकपणे पुढे येत नाही. जितेंद्र आव्हाड विधानभवनाच्या रेड कार्पेटवरून चालताना, ‘मंगळसूत्र चोराचा…’ अशा घोषणा देत चालले आहेत, इथून या प्रकाराची सुरुवात झाल्याचे दिसते. परंतु ती आव्हाड यांची प्रतिक्रिया होती. पडळकर यांनी जनसुरक्षा विधेयसासंदर्भात बोलताना त्यांना उद्देशून अर्बन नक्षल अशी टिपणी केली होती, त्याची प्रतिक्रिया होती. अर्थात पडळकर यांच्यासारख्या नवख्या आमदाराला जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या सहा टर्मच्या आमदाराने महत्त्व द्यावे का, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. एखादा माणूस आपले वय, उंची, पद या कशाचाच विचार न करता मोकाट सुटल्यासारखा कुणावरही काहीही बोलत सुटतो. विरोधकांबद्दल अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरतो. सभागृहात पीठासीन अधिकाऱ्याला नडतो. आपल्याच सरकारच्या मंत्र्यांना नडतो. सुरक्षा व्यवस्थेला फाट्यावर मारून रेकॉर्डवरचे गुन्हेगार विधानभवनाच्या आवारात घेऊन येतो. आणि हे सगळे तो कशाच्या बळावर करतो, तर त्याला माहिती असते दुसरे कुणीही आपल्याइतक्या खालच्या पातळीवर उतरू शकत नाही. आपल्यासारखी टपोरीगिरी करू शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण खून केला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या केसाला धक्का लागू देणार नाहीत, असा विश्वास त्याला असल्यामुळेच. कुठे याच्या नादाला लागून घाणीत दगड मारायचा म्हणून विरोधी पक्षातले लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आले. त्यामुळे पडळकर जितेंद्र आव्हाडांच्या नादाला लागायला गेले. तिथेच ते फसले. आव्हाडांनी स्वतः नियमांच्या चौकटीत वागत त्यांना जशास तसे उत्तर दिले. आव्हाडांनी विधानभवनाच्या आवारातील नियमांचे उल्लंघन केले नाही. त्याचमुळे ते कारवाईच्या कचाट्यात सापडू शकले नाहीत. पडळकर त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकत गेले. परिणामी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी वाघाचे मांजर झालेले पाहायला मिळाले. (Awhad-Padalkar)

आव्हाडांचा जुना किस्सा

जितेंद्र आव्हाड काय आहेत, हे समजावे म्हणून आव्हाडांचा एक जुना किस्सा मुद्दाम सांगावासा वाटतो.

१९९९ ची घटना आहे. शिवसेना-भाजप युतीची सत्ता गेली आणि पुन्हा काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. सत्ता गेल्यामुळे नारायण राणे पिसाटल्यासारखे झाले होते. विधिमंडळात आणि बाहेरही शिवसेना स्टाईल त्यांचे राडे सुरू होते. एकदा त्यांनी आणि शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवनाचे प्रवेशद्वारच रोखले. सत्ताधाऱ्यांना सभागृहात जाऊ द्यायचे नाही असे ठरवले. सत्ताधारी पेचात पडले होते. तेव्हा असा काही प्रकार घडल्याचे ठाण्यात कळले. ठाण्यातून जितेंद्र आव्हाड कार्यकर्ते घेऊन आले. त्यांनी पुढाकार घेतला आणि विरोधकांना तुडवत सत्ताधारी आमदार, मंत्री विधानभवनात गेले. ठाण्यात एकदा मोठी दंगल झाली असताना प्रचंड तणाव असताना आणि पोलिस नको म्हणत असताना आव्हाड एकटे दंगलग्रस्त गल्लीत गेले आणि तिथल्या लोकांशी बोलले. ठाण्याच्या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत नथुराम गोडसेचे उदात्तीकरण केल्याचे कळल्यावर फक्त एका नगरसेवकासोबत संमेलनस्थळी येऊन स्मरणिकेची होळी केली होती. (Awhad-Padalkar)

वाढत्या वयाबरोबर त्यांनी अधिक प्रगल्भपणे वागायला पाहिजे, असे त्यांच्या सहकाऱ्यांना वाटत असते. परंतु प्रगल्भ म्हणजे तडजोडवादी का, असा त्यांचा प्रश्न असतो.

गाडीचा दरवाजा उघडताना आव्हाडांना धक्का लागणे, पडळकरांनी नेहमीच्या स्टाईलने शिविगाळ करणे इथपर्यंत ठीक होते. अर्थात शिविगाळ निषेधार्हच. पण थेट गुंडांना विधानभवनात आणून हल्ला करायला लावणे हा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला कळसाध्याय म्हणावा लागेल. काळा अध्याय म्हणावा लागेल.

विधिमंडळातील प्रवेशासाठी पोलिसांची यंत्रणा असते. त्याचप्रमाणे विधिमंडळाची स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा असते. ज्या दिवशी विधानभवनाच्या आवारात हाणामारी झाली, त्यादिवशीचा घटनाक्रम बघा.

नितीन देशमुख हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे. तो अधिवेशन काळात विधानभवनात असतो. तो आव्हाडांचा निकटवर्तीय आहे का, तर आहे. पण तो त्यांचे शेपूट धरून फिरतो असे नाही. त्यामुळे आव्हाड जे म्हणाले की, तो माझ्यासोबत आला नव्हता, ते खरेच आहे.

गोपीचंद पडळकर यांनी आपल्यासोबत जे कार्यकर्ते आणले होते, त्यांनी विधानभवनात नितीन देशमुख याच्यावर हल्ला केला. हा हल्ला करण्यासाठीच पडळकर त्यांना आत घेऊन आले होते का, याची चौकशी झाली पाहिजे. आव्हाड यांनी केलेल्या आरोपानुसार ही मंडळी आव्हाडांवरच हल्ला करायला आली होती. या सगळ्या बाबींची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी होती. हवी आहे. अध्यक्ष आणि सभापती निष्पक्ष असते तर कदाचित ती झाली असती. परंतु आजच्या काळात त्यांच्याकडून ती अपेक्षा करणे गैर आहे. (Awhad-Padalkar)

हृषिकेश उर्फ सर्जेराव टकले हा पडळकरांचा कार्यकर्ता रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळते. अशा व्यक्तिला घेऊन आमदार विधानभवनात कसे काय येऊ शकतात, याचे उत्तर पडळकर यांनी नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला पाहिजे. (Awhad-Padalkar)

विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती आणि विधिमंडळ प्रशासन पक्षपाती आहे, असे मी म्हणतो, त्याचे कारण असे की त्यादिवशीच्या मारामारीनंतर झालेल्या कारवाया. जी गोष्ट संपूर्ण जगाने पाहिली. ती म्हणजे पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. तर ज्यांनी हल्ला केला त्यापैकी एकावरही त्यादिवशी कारवाई झाली नाही. कारवाई कुणावर झाली तर ज्याच्यावर हल्ला झाला त्याच्यावरच. हा उफराटा न्याय आहे. एकूण सगळ्यांनी मिळून कायदा धाब्यावर बसवायचे ठरवले आहे, हेच यातून दिसते.

मारामारी की हल्ला ?

प्रारंभी चित्र असे रंगवले गेले की, आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांच्याच हाणामारी झाली. तशा बातम्या चालवल्या गेल्या. त्याच सुमारास आव्हाड माध्यमांशी बोलायला बाहेर आले. त्यांनी माध्यम प्रतिनिधींकडूनच वदवून घेतले की, मारामारी नव्हे, तर पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड भडकले. जर तुम्ही विधानसभेत गुंडांना प्रवेश देणार असाल, ते आमच्यावर हल्ला करणार असतील तर आमचे लोक सुरक्षित नाहीयेत. मला शिवीगाळ केली, मारण्याची धमकी दिली, असं आव्हाड म्हणाले. हे सगळे मलाच मारण्यासाठी आले होते, असंही ते म्हणाले.

प्रसारमाध्यमांचे लोकही अत्यंत सुमार वार्तांकन करतात. सरधोपट निवेदन करतात. त्यामुळे वस्तुस्थिती लोकांसमोर येत नाही. पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, असे आव्हाडांनी माध्यम प्रतिनिधींकडून वदवून घेतले नसते, तर दोन गटात हाणामारी झाली असेच चित्र गेले असते. पडळकर आत घेऊन आलेल्या लोकांनी हल्ला केला. म्हणजे त्यासाठीच ते गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आत घेऊन आले होते. म्हणजे आता मुंबईच्या अंडरवर्ल्डसारखी अवस्था महाराष्ट्राच्या विधिमंडळाची झाली आहे काय, असा प्रश्न निर्माण होतो.

आणि इतका गंभीर प्रकार होऊनसुद्धा केवळ दिलगिरीवर मिटवले जाते, हा तर पक्षपातीपणाचा कहर आहे.

कल्पना करा की हेच जर उलटे घडले असते तर जितेंद्र आव्हाडांची आमदारकी रद्द करण्यापर्यंत सत्ताधाऱ्यांची मजल गेली असती. परंतु या सगळ्या प्रकरणादरम्यान त्यांनी कुठेही नियमभंग केला नाही. `मंगळसूत्र चोराचा….` या घोषणापुरतीच त्यांची कृती मर्यादित होती. त्याचे समर्थन करता येणार नाही. परंतु ती कुठेही नियमाच्या चौकटीच्या बाहेर नव्हती, त्याचमुळे सत्ताधारी या संपूर्ण प्रकरणात बॅकफूटवर दिसले.

गोपीचंद पडळकर यांच्यासोबत विधानभवनात आलेल्या आणि नितीन देशमुखवर हल्ला करणाऱ्या लोकांना त्याच दिवशी का अटक केली नाही. त्यांना सोडून नितीन देशमुख यालाच का अटक केली, याची उत्तरे विधिमंडळ प्रशासनाने आणि पोलिसांनीही द्यायला हवीत.

एखाद्या आमदाराच्या विरोधात मग तो कुठल्याही पक्षाचा असो, कुणी बाहेरच्या व्यक्तिने ब्र जरी काढला तरी सगळी विधानसभा त्याच्याबाजूने उभी राहात असे. तो कोणत्या पक्षाचा आहे, हे पाहिले जात नसे. विधिमंडळाची ती परंपरा होती. परंतु पडळकर यांच्या एका समर्थकाने जितेंद्र आव्हाड सभागृहात असताना त्यांना मेसेज करून शिविगाळ केली. ठार मारण्याची धमकी दिली. तरीसुद्धा विधिमंडळाची कातडी थरथरली नाही. सभागृहाचे कामकाज इतके पक्षपाती बनले आहे. उगाच लोकशाहीचे मंदिर वगैरे उदात्तीकरण करण्यात काहीच अर्थ नाही.
विधिमंडळात गँगवॉर सुरू झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गँग सध्या फॉर्मात आहे. कारण आपले कुणी काही वाकडे करू शकत नाही, याची त्यांना खात्री आहे. अशा प्रवृत्तींना खतपाणी घालणारे फडणवीस वर पुन्हा राजकीय संस्कृती, सभागृहाची प्रतिष्ठा वगैरे भाषण झोडताहेत. सगळा आनंदी आनंद आहे.

हेही वाचा :
हनीट्रॅपचे धागेदारे समृद्धीच्या भ्रष्टाचारापर्यंत : सपकाळ यांचा आरोप
मोदींनी ४२ देशांना भेट दिली, पण मणिपूरला नाही : खरगेंची टीका

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00