ठाणे : जमीर काझी : महानगरातील चाकरमान्याचा रोज सकाळी फुल्ल भरलेल्या लोकलमधील प्रवास किती धोकादायक असतो, याची प्रचिती सोमवारी (९ जून) पुन्हा एकदा आली. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे निघालेल्या लोकलमधून १३ प्रवासी खाली कोसळले. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. सकाळी ९.२० वाजता मुंब्रा रेल्वे स्थानकात ही घटना घडली. (Local train accident)
अपघातात जीआरपीएफ जवान विकी मुकदल यांचा मृत्यू झाला. ते नाईट ड्युटी संपवून ठाण्याहून सकाळच्या ट्रेनने कल्याणच्या दिशेने निघाला होता. बायको आणि मुलीसमोरच त्यांचा मृत्यू झाला. तर मयूर शाह हे आयटी इजिनीयर होते. ते डोंबिवलीत घर घेण्यासाठी निघाले होते. त्यावेळी मयूर यांचा हात निसटला आणि त्यांचा मृत्यू झाला. (Local train accident)
ठाण्याच्या घोडबंदर परिसरात ते त्याच्या आईसोबत राहायचे. त्यांना दोन विवाहित बहिणी आहेत. मयूर अविवाहित होते. विद्याविहार या ठिकाणी ते नोकरी करत. ते डोंबिवलीत फ्लॅट खरेदी करणार होते. त्यासाठीच ते डोंबिवलीकडे येत होते, असे सांगण्यात आले.
राहुल संतोष गुप्ता (वय २८ , रा. दिवा), सरोज केतन (२३, रा. उल्हासनगर ) मयूर शाह (४४ रा. घोडबंदर), पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र मधुकर गोतरणे (३१) अशी मृतांची नावे आहेत. आणि दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. (Local train accident)
कामाचा पहिला दिवस असल्याने नेहमीप्रमाणे कसाऱ्याहून सीएसएमटीच्या दिशेने निघालेल्या फास्ट लोकलमध्ये तुडुंब गर्दी होती. लोकलच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला अनेकजण लटकत प्रवास करत होते. ९.२० च्या सुमारास ती मुंब्रा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ५वरून येत होती. त्याचवेळी ४ नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून सीएसएमटीकडून येणाऱ्या लोकलला दरवाजात उभे असलेले काही प्रवासी घासले गेले. या धक्क्याने त्यातील अनेकजण खाली पडले. या दुर्घटनेमुळे अन्य प्रवाशात भीतीचे वातावरण निर्माण होऊन त्यांनी आरडाओरड सुरु केली. त्यांच्या गोंधळामुळे मुंब्रा स्थानकात लोकल थांबवण्यात आली. (Local train accident)
घटनास्थळी दहाच्या सुमारास रुग्णवहिका पोहचली. जीआरपीचे जवान आणि नागरिकांच्या मदतीने रेल्वे रुळावर पडलेल्या जखमींना उचलून ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालय आणि कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी काहींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. काहींचा रक्तबंबाळ होऊन मृत्यू झाला होता. मृत आणि जखमींची चप्पल, बॅगा आणि अन्य साहित्य रुळावर विखरून पडले होते.
मुंब्र्याजवळचे वळण धोकादायक
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातासाठी अनेक प्रवाशांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्थानकाजवळच्या तीव्र वळणाला जबाबदार ठरवले. या वळणावर अप आणि डाऊन जाणाऱ्या लोकल किंवा इतर ट्रेनमधील अंतर कमी होते. या वळणासंदर्भात रेल्वे प्रशासनाने तातडीनं तोडगा काढावा अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.
हेही वाचा :
रेल्वेतून पडून सात प्रवाशांचा मृत्यू
हे बळी सरकारने घेतलेले : काँग्रेसची टीका