क्वालालंपूर : भारताचे स्क्वॉशपटू अनाहत सिंह आणि वीर चोत्रानी यांनी जागतिक अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेच्या आशियाई पात्रता स्पर्धेमध्ये अंतिम फेरी गाठली. अनाहत महिला एकेरीतून, तर वीर पुरुष एकेरीतून अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताच्या आकांक्षा साळुंखेचे आव्हान मात्र महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत संपुष्टात आले. (Squash)
मलेशियातील क्वालालंपूरमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. महिला एकेरीत सुरुवातीपासूनच दिमाखदार कामगिरी करणाऱ्या अनाहतने उपांत्य फेरीत हाँगकाँगच्या हेलन तांगचा ३-०(११-२, ११-७, ११-६) असा सहज पराभव केला. हा सामना अनाहतने अवघ्या २१ मिनिटांत जिंकला. या स्पर्धेत अनाहतला पाचवे, तर हेलनला आठवे मानांकन होते. या दोन्ही खेळाडू पाचवेळा आमनेसामने आल्या असून हे पाचही सामने अनाहतने जिंकले आहेत. अंतिम फेरीत तिचा सामना हाँगकाँगच्याच सातव्या मानांकित टॉबी त्से हिच्याशी होईल. टॉबीने उपांत्य फेरीमध्ये द्वितीय मानांकित आकांक्षाला चुरशीच्या सामन्यात ३-१(११-३, १२-१०, १०-१२, ११-८) असे हरवले. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूचा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील प्रवेश निश्चित होणार आहे. (Squash)
पुरुष एकेरीमध्ये भारताच्या वीरने उपांत्य फेरीत हाँगकाँगच्या ची हिम वाँगवर ३-१(११-७, ११-६, ७-११, ११-४) अशी मात केली. द्वितीय मानांकित वीरने या सामन्यात ३७ मिनिटांमध्ये विजय निश्चित केला. अंतिम फेरीत त्याची लढत मलेशियाचा अमिशेनराज चंद्रन आणि पाकिस्तानचा महंमद असियम यांच्यातील विजेत्या खेळाडूशी होईल. अंतिम सामना जिंकून प्रथमच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्याची आशा वीर बाळगून असेल. असे झाल्यास तो जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या ड्रॉमधील चौथा भारतीय खेळाडू ठरेल. अभय सिंग, वेलावन सेंथिलकुमार, रमित टंडन या भारतीय स्क्वॉशपटूंनी अगोदरच या स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. (Squash)
हेही वाचा :
अभिषेक नायर पुन्हा ‘केकेआर’मध्ये दाखल
‘उसका जाने का समय आ गया’