क्वालालंपूर : भारताच्या अनाहत सिंह आणि वीर चोत्रानी यांनी जागतिक स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेच्या आशियाई पात्रता स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले. या विजेतेपदासह अनाहत व वीर हे जागतिक स्पर्धेमध्ये अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीच्या मुख्य फेरीत खेळण्यासाठी पात्र ठरले आहेत. (Anahat Qualifies)
मलेशियातील क्लालालंपूर येथे ही पात्रता स्पर्धा रंगली. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात १७ वर्षीय अनाहतने हाँगकाँगच्या टॉबी त्से हिचा ३-१(११-४, ९-११, ११-२, ११-८) असा पराभव केला. या स्पर्धेसाठी अनाहतला पाचवे, तर टॉबीला सातवे मानांकन होते. अंतिम फेरीपूर्वी अनाहतने या स्पर्धेत एकही गेम गमावला नव्हता. अंतिम सामन्यात पहिला गेम जिंकून अनाहतने आघाडी घेतल्यानंतर टॉबीने दुसरा गेम जिंकत बरोबरी साधली. मात्र, त्यानंतर अनाहतने खेळ उंचावून पुढील सलग दोन गेम जिंकत विजय निश्चित केला. जागतिक क्रमवारीत ६३ व्या स्थानावर असणारी अनाहत प्रथमच जागतिक स्पर्धेत सहभागी होणार आहे. पुढील महिन्यात ९ ते १७ मेदरम्यान अमेरिकेतील शिकागो येथे ही स्पर्धा रंगेल. या स्पर्धेमध्ये अनाहतचा सलामीचा सामना इंग्लंडच्या कॅटी मॅलिफशी होणार आहे. (Anahat Qualifies)
पुरुष एकेरीमध्ये द्वितीय मानांकित वीरने मलेशियाच्याच तृतीय मानांकित अमिशेनराज चंद्रनला ३-०(११-३, ११-४, ११-८) असे सहज नमवले. वीरसुद्धा प्रथमच जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. जागतिक स्पर्धेत त्याचा सलामीचा सामना इंग्लंडच्या डेक्लान जेम्स याच्याशी होईल. वीरबरोबरच अभय सिंह, वेलावन सेंथिलकुमार आणि रमित टंडन हे भारताचे स्क्वॉशपटूही जागतिक स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळणार आहेत. (Anahat Qualifies)
हेही वाचा :