भुवनेश्वर : भारतीय महिला हॉकी संघाने शनिवारी प्रो-हॉकी लीग स्पर्धेमध्ये जोरदार पुनरागमन करत जर्मनीवर १-० अशा गोलफरकाने मात केली. भारताचा या स्पर्धेमध्ये सहा सामन्यांमधील हा दुसराच विजय ठरला. (Women’s hockey)
कलिंगा हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये शुक्रवारी भारताला जर्मनीविरुद्ध ०-४ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाचा वचपा भारताने शनिवारच्या सामन्यामध्ये काढला. जागतिक क्रमवारीत जर्मनीचा संघ पाचव्या, तर भारतीय संघ नवव्या स्थानावर आहे. शनिवारी, सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये बाराव्या मिनिटास भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या संधीचा पुरेपूर फायदा घेत दीपिकाने गोल नोंदवला. तिचा हा कारकिर्दीतील २६ वा गोल ठरला. त्यानंतर, भारताला तिसऱ्या सत्रामध्ये तीन व चौथ्या सत्रामध्ये चार असे एकूण सात पेनल्टी कॉर्नर मिळाले. परंतु, या पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात भारतीय खेळाडूंना यश आले नाही. (Women’s hockey)
दुसरीकडे, जर्मनीनेही त्यांना मिळालेले पाच पेनल्टी कॉर्नर वाया घालवले. चौथ्या सत्रामध्ये पहिल्याच मिनिटाला जर्मनीच्या स्टाइन कुर्झचा गोल करण्याचा प्रयत्न भारताच्या सुनीता टोप्पोने हाणून पाडला. अखेरच्या काही मिनिटांमध्ये जर्मनीने वारंवार भारतीय गोलजाळ्यावर आक्रमणे केली. परंतु, भारताची गोलरक्षक बिचू देवीने आपल्या भक्कम बचावाच्या जोरावर भारताची आघाडी अबाधित राखली. (Women’s hockey)
या विजयानंतर भारतीय संघ गुणतक्त्यात ७ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. या स्पर्धेच्या भारतातील टप्प्यामधील महिला संघाचे अखेरचे दोन सामने गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या नेदरलँड्सशी होणार आहेत.
हेही वाचा :
भारत-पाक सामन्यांचा आजवरचा इतिहास