कोल्हापूर : प्रतिनिधी : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत समझोता एक्सप्रेस चा प्रयोग झाला असून २१ पैकी १९ जागा बिनविरोध झाल्या आहेत. फक्त जत आणि कवठेमहांकाळ सोसायटी गटात निवडणूकीचा सामना रंगणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागा वाटप निश्चित केले आहे. (19 seats in Sangli District Bank filled unopposed)
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यात बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दिवसभर बैठका घेण्यात आल्या. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेचे नेते बैठकीला उपस्थित होते. सत्ताधारी आणि विरोधकांनी संघर्ष टाळून बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न केले. त्यामध्ये भाजपला ४, राष्ट्रवादी काँग्रेसला ७, काँग्रेस पक्षाला ६, राष्ट्रवादी अजित पवार गटाला १, शिवसेना शिंदे गटाला तीन अशा जागा वाटप निश्चित करण्यात आले. त्यानंतर उमेदवारांची माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २१ पैकी १९ जागा बिनविराध झाल्या. (19 seats in Sangli District Bank filled unopposed)
बिनविरोध निवड झालेले १९ उमेदवार असे
आमदार अमोल बाबर, आमदार विश्वजीत कदम, महेंद्र लाड, देवराज पाटील, विराज नाईक, तानाजी पाटील, अण्णासाहेब कोरे, माजी आमदार सुमनताई पाटील, राहूल महाडिक, पृथ्वीराज पाटील, सतीश देशमुख, रणधीर नाईक, के.डी.कांबळे, वैभव विलासराव शिंदे, पूजा विशाल पाटील, वर्षा विक्रम सावंत, रेणुका सत्यजीत देशमुख, संभाजी कचरे, नितिन होणराव.
कवठेमहांकाळ आणि जत गटात निवडणूक
कवठेमहांकाळ सोसायटीत गटात माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि टी.व्ही. पाटील यांच्यात लढत होणार आहे. तर जत सोसायटी गटात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि विनोद पवार यांच्यात लढत होणार आहे. (19 seats in Sangli District Bank filled unopposed)