पुणे : प्रतिनिधी : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांनी मतदानासंदर्भात मार्गदर्शन केले, तसेच मतदान करण्याचे आवाहन केले. (Chandrakant-dada campaigns door-to-door in Pune)
भाजप-महायुतीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रिया आणि मतदानाचे महत्त्व याबाबत मतदारांशी संवाद साधत भाजप-महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
मंगळवेढ्यात कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी बूथनिहाय नियोजन
कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा येथे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली तालुक्यातील शैक्षणिक संस्था चालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा संवाद मेळावा उत्साहात झाला. या मेळाव्यात कौस्तुभ गावडे यांना प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी बूथनिहाय नियोजनावर भर देण्यात आला.यावेळी भारतीय जनता पक्षाचे मंगळवेढा तालुका पक्ष निरीक्षक तथा धुळे जिल्ह्यातील माजी आमदार कुणाल पाटील यांनी गावडे यांना प्रथम पसंतीचे मत देण्याचे आवाहन केले. शिक्षकांचे प्रश्न समजून घेणारे आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित समस्यांची जाण असणारे नेतृत्व विधान परिषदेत पाठविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
इचलकरंजीत अभयकुमार साळुंखेंचा प्रचार
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी इचलकरंजीतील शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेऊन कौस्तुभ गावडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या दौऱ्यात डीकेटीईचे संचालक सुनील पाटील आणि प्रा. शेखर शहा यांची विशेष उपस्थिती होती. या भेटीगाठींमध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार अशोकराव जांभळे, माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार राजूबाबा आवळे, ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे कृष्णाजी बोहरा व श्रीनिवासजी बोहरा, व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे कौशिक मराठे, तात्यासाहेब विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे धोंडीराम कस्तुरे, ना. बा. एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त व नॅशनल हायस्कूलचे अहमद मुजावर, श्रद्धा परिवाराचे प्रा. ए. आर. तांबे, खंजिरे शिक्षण समूहाचे अरुण खंजिरे व राहुल खंजिरे, सरस्वती हायस्कूलचे अमरसिंह माने आणि गुरुकुल संस्थेचे गणेश नायकवडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश होता. (Chandrakant-dada campaigns door-to-door in Pune)
सातारा जिल्ह्यात श्रुती जोशींचा प्रचार
कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आजीव सेवक डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थांना सदिच्छा भेटी देत प्रचारमोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधून श्री. कौस्तुभ गावडे यांना प्रथम पसंतीचे मत देण्याचे आवाहन करण्यात आले.या प्रचार मोहिमेत सातारा जिल्हाप्रमुख शशिकांत काटे, सह-जिल्हा विभागप्रमुख प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, सिनिअर विभाग प्रचारप्रमुख डॉ. दीपक जाधव, प्रा. संदीप भुजबळ, श्री. विवेकानंद केशरकर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
प्रचारादरम्यान यशोदा कॅम्पस येथे श्री. दशरथ सगरे यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेण्यात आली. त्यानंतर गौरीशंकर कॅम्पस येथे संस्थेचे सचिव श्री. मुडलगीकर आणि श्रीरंग काटिकर यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप आणि उपाध्यक्ष दिलीप जगताप यांच्या वतीने कौस्तुभ गावडे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. (Chandrakant-dada campaigns door-to-door in Pune)