कोल्हापूर; प्रतिनिधी : कोविडमुळे १०० वे नाट्यसंमेलन कोल्हापुरात घेता आले नव्हते. मात्र, १०१ वे नाट्य संमेलन कोल्हापुरातच घेण्यात येईल, अशी स्पष्ट ग्वाही अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विश्वस्त आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली. (Uday Samant)
परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्यावतीने केशवराव भोसले यांच्या नावाने दिला जाणारा पहिला पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शरद भुथाडिया यांना प्रदान करण्यात आला. तसेच संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सामंत यांच्याहस्ते झाले. गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. पुरस्कारासाठी डॉ. भुथाडिया यांची निवड केल्यामुळे पुरस्काराची उंची वाढली आहे, असे मतही मंत्री सामंत यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, नाट्य परिषदेचे प्रशासन उपाध्यक्ष नरेश गाडेकर, कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, भाऊसाहेब भोईर, सतीश लोटके, प्रमुख उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेचे प्रमुख कार्यवाह गिरीश महाजन यांनी केले. सूत्रसंचालन सीमा जोशी यांनी केले. (Uday Samant)
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जसे होते तसेच उभे राहील. तसेच त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे कमर्शियल कॉम्प्लेक्स केले जाणार नाही. -उद्योगमंत्री उदय सामंत
हा पुरस्कार म्हणजे रंगभूमीची सेवा केल्याबद्दलचा सन्मान आहे. आपल्या मर्यादा सोडून लोकांसाठी काही तरी करावे ही ताकद रंगभूमी देत असते. शेवटपर्यंत रंगभूमीची सेवा करत रहावी अशी इच्छा आहे.
-ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शरद भुथाडिया