कोल्हापूर : प्रतिनिधी : देशाच्या २०२७ च्या जनगणनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ही २१ व्या शतकातील तिसरी आणि देशातील पहिलीच डिजिटल जनगणना ठरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ‘जनगणना २०२७’ अंतर्गत १ ते १५ मे दरम्यान नागरिकांना ‘स्वयंगणना’ करण्याची विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजानन गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तहसीलदार तेजस्विनी पाटील, नायब तहसीलदार नितीन धापसे आणि जनगणना संचलनालयाचे जिल्हा समन्वयक तुषार पाटील उपस्थित होते.
जनगणना ही धोरणात्मक व संख्यात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, या जनगणनेतील माहितीचा उपयोग देशातील विकास योजनांचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करताना अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे गजानन गुरव यांनी यावेळी सांगितले. (Facility for self-enumeration available in the district starting May 1st. Census)
नागरिकांसाठी १ ते १५ मे कालावधीत स्वयंगणनेची विशेष सुविधा
. जिल्ह्यामध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत असून, १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणकांद्वारे प्रत्यक्ष घरयादी व घरगणना केली जाणार आहे. तत्पूर्वी, नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्यासाठी १ मे ते १५ मे २०२६ या पंधरा दिवसांच्या कालावधीत स्वयंगणनेची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी https://se.census.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर भेट देऊन आपली माहिती भरावयाची आहे. या पोर्टलवर १४ विविध भाषांमध्ये माहिती भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहिती यशस्वीरीत्या भरल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला एक स्वतंत्र ओळखपत्र क्रमांक (आयडी) प्राप्त होईल, जो नागरिकांनी अत्यंत सुरक्षितपणे जतन करून ठेवणे आवश्यक आहे. १६ मे नंतर जेव्हा प्रगणक घरभेटीसाठी येतील, तेव्हा त्यांना हा आयडी दिल्यास प्रगणक तो पोर्टलवर अपलोड करतील आणि नागरिकांची माहिती अधिकृतरीत्या जनगणनेत नोंदवली जाईल. (Facility for self-enumeration available in the district starting May 1st. Census)
१२५७ गावांत ६०५४ प्रगणक
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या व्यापक राष्ट्रीय कार्यक्रमासाठी सूक्ष्म प्रशासकीय नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण १३ तहसिल कार्यालये, १३ नगरपालिका किंवा नगरपरिषदा आणि १२५७ महसूल गावांचा समावेश आहे. या संपूर्ण क्षेत्रातील जनगणनेसाठी ४९९९ हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स निश्चित करण्यात आले आहेत. तसेच, तळागाळात जाऊन अचूक माहिती संकलित करण्यासाठी जिल्ह्यात एकूण ६०५४ प्रगणक आणि ९९५ पर्यवेक्षक यांची महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. (Facility for self-enumeration available in the district starting May 1st. Census)
अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान आणि माहितीची सुरक्षितता
यंदाची जनगणना कागदविरहित आणि पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असल्याने, माहिती संकलनासाठी विशेष ॲप्लिकेशन्सचा वापर केला जाणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष कुटुंबाची तसेच घराची सविस्तर माहिती गोळा करण्यासाठी ‘हाऊजलिस्ट ॲप’ (HLO) वापरले जाणार आहे. या अद्ययावत प्रक्रियेद्वारे घराची स्थिती, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, आणि मालमत्ता याबद्दलची सखोल माहिती घेतली जाईल. या वेब पोर्टलमध्ये भरलेली जिल्ह्यातील नागरिकांची सर्व वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व सुजाण नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.