Home » Blog » WTC Final : डब्ल्यूटीसी विजेत्या संघाचे बक्षीस जाहीर

WTC Final : डब्ल्यूटीसी विजेत्या संघाचे बक्षीस जाहीर

जिंकणाऱ्या संघास ३६ लाख, तर उपविजेत्यांना २१.६० लाख डॉलर्स

by प्रतिनिधी
0 comments
WTC Final

लंडन : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (डब्ल्यूटीसी) अंतिम सामना पुढील महिन्यात रंगणार असून या स्पर्धेतील बक्षिसाची रक्कम आयसीसीने जाहीर केली. त्यानुसार, विजेत्या संघास ३६ लाख, तर उपविजेत्या संघास २१.६० लाख डॉलर्सचे बक्षीस मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर ११ जूनपासून हा अंतिम सामना रंगणार आहे. (WTC Final)

मागील दोन डब्ल्यूटीसीच्या तुलनेत विजेत्यांना मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत दुपटीपेक्षा अधिक वाढ करण्यात आली आहे. २०२१ व २०२३ मध्ये डब्ल्यूटीसी जिंकणाऱ्या अनुक्रमे न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया संघास प्रत्येकी १६ लाख डॉलर्सचे बक्षीस मिळाले होते. उपविजेत्यांच्या बक्षिसाची रक्कमही ८ लाखांवरून २१.६० लाख डॉलर्स इतकी वाढवण्यात आली. कसोटी क्रिकेटला प्राधान्य देण्याच्या आयसीसीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम वाढवण्यात आल्याचे आयसीसीतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी राहिलेल्या भारतीय संघास १४.४० लाख, तर चौथ्या स्थानावरील न्यूझीलंड संघास १२ लाख डॉलर्स मिळतील. इंग्लंडचा संघ पाचव्या स्थानावर असून त्यांना ९.६० लाख डॉलर्सचे बक्षीस मिळणार आहे. (WTC Final)

डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांनी बुधवारी संघ जाहीर केले. मणक्याच्या शस्त्रक्रियेतून सावरलेल्या कॅमेरॉन ग्रीनने ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन केले असून, वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाचा दक्षिण आफ्रिका संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. रबाडाने नुकताच उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी ठोठावण्यात आलेल्या एका महिन्याच्या बंदीचा कालावधी पूर्ण केला आहे. सध्या आयपीएलमध्ये खेळणारे या दोन्ही संघांचे खेळाडू प्ले-ऑफ लढतींपूर्वी मायदेशी रवाना होणार आहे. (WTC Final)

संघ – ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, ॲलेक्स केरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मॅथ्यू कुन्हेमन, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.

दक्षिण आफ्रिका : तेंबा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंघम, कॉर्बिन बॉश, टोनी डेझोर्झी, मार्को यान्सन, केशव महाराज, एडन मार्करम, वियान मुल्डर, सेनुरन मुथुस्वामी, लुंगी एन्गिडी, डेन पीटरसन, कॅगिसो रबाडा, रायन रिकलटन, ट्रिस्टन स्टब्ज, काइल व्हेरिन.

You may also like

error: Content is protected !!