Home » Blog » WTC Final : स्मिथ, वेबस्टरने ऑस्ट्रेलियाला सावरले

WTC Final : स्मिथ, वेबस्टरने ऑस्ट्रेलियाला सावरले

by प्रतिनिधी
0 comments
WTC Final

लंडन : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात पहिल्या दिवशी स्टीव्ह स्मिथ आणि ब्यू वेबस्टरने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सावरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बुधवारी चहापानापर्यंत ५ बाद १९० धावांपर्यंत मजल मारली होती. (WTC Final)

ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवत पहिल्या सत्रामध्येच ऑस्ट्रेलियाला एकामागोमाग एक धक्के दिले. कॅगिसो रबाडाने सलामीवीर उस्मान ख्वाजाला खाते उघडू न देता माघारी पाठवले व त्यापाठोपाठ कॅमेरॉन ग्रीनला ४ धावांवर बाद केले. मार्को यान्सनने मार्नस लॅब्युशेन (१७) आणि ट्रॅव्हिस हेड (११) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. उपाहारावेळी ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ६७ अशी झाली होती. (WTC Final)

दुसऱ्या सत्रामध्ये स्मिथ आणि वेबस्टर यांनी पाचव्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाच्या डावाची पडझड थांबवली. अखेर एडन मार्करमने स्मिथला बाद करून ही जोडी फोडण्यात यश मिळवले. स्मिथने ११२ चेंडूंमध्ये १० चौकारांसह ६६ धावांची खेळी केली. त्यानंतर, वेबस्टरने ॲलेक्स केरीसह चहापानापर्यंत यशस्वीपणे किल्ला लढवला. दरम्यान, वेबस्टरनेही अर्धशतक पूर्ण केले. चहापानावेळी खेळ थांबला, तेव्हा वेबस्टर ७६ चेंडूंमध्ये ८ चौकारांसह ५५, तर केरी २९ चेंडूंमध्ये ४ चौकारांसह २२ धावांवर खेळत होता. (WTC Final)

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया – पहिला डाव ५० षटकांत ५ बाद १९० (स्टीव्ह स्मिथ ६६, ब्यू वेबस्टर खेळत आहे ५५, ॲलेक्स केरी खेळत आहे २२, कॅगिसो रबाडा २-३५, मार्को यान्सन २-४९) विरुद्ध दक्षिण आफ्रिका.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00