Home » Blog »  स्थायी समिती सभापतीपदी शिराळे, ‘परिवहन’ सभापतीपदी जाधव यांची निवड

 स्थायी समिती सभापतीपदी शिराळे, ‘परिवहन’ सभापतीपदी जाधव यांची निवड

by प्रतिनिधी
0 comments
Vishal Shirale elected as the Chairman of the Standing Committee

कोल्हापूर :  प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती, परिवहन समिती आणि महिला बाल कल्याण समिती सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला. स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे विशाल किरण शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित चंद्रकांत जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी शिवसेनेच्या कौसर इस्माईल बागवान, तर उपसभापतीपदी भाजपच्या दीपा अजित ठाणेकर यांची निवड झाली. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजीत विशेष बैठकीत करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

भाजपच्या शिराळेकडून काँग्रेसच्या समर्थांचा पराभव

तिनही विषय समितीच्या निवडणूकीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुती विरोधात काँग्रेस अशी  थेट लढत झाली.स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपचे विशाल शिराळे आणि अमर समर्थ यांच्यात थेट निवडणूक झाली. यामध्ये विशाल शिराळे यांना नऊ मते तर अमर समर्थ यांना सात मते पडली. निवडून आलेले  स्थायी समिती सभापती हे प्रभाग क्र.७-अ या मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. विशाल शिराळे यांचे वडील किरण शिराळे हे यापूर्वी नगरसेवक होते. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदही सांभाळले होते. ते माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे कट्टर समर्थक आहेत. (Vishal Shirale elected as the Chairman of the Standing Committee)

परिवहन समितीचे सभापतीपदी शिवसेनेला संधी

परिवहन समिती सभापतीपदासाठी शिवसेनेचे सत्यजित जाधव यांनी काँग्रेसच्य दुर्वास कदम यांचा पराभव केला.  सत्यजित जाधव यांना आठ मते तर दुर्वास कदम यांना पाच मते पडली. सत्यजित जाधव यांना सर्वाधिक मते पडल्याने त्यांची परिवहन समिती सभापतीपदी निवड जाहिर करण्यात आली. नुतन परिवहन समिती सभापती हे प्रभाग क्र.११ -क या मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत चंद्रकांत जाधव आणि माजी आमदार जयश्री जाधव यांचे सत्यजीत जाधव हे चिरंजीव आहेत. त्यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिवसेनेच्या कौसर बागवान तर भाजपच्या दीपा ठाणेकरांना संधी

महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी नगरसेविका कौसर इस्माइल बागवान व  जयश्री धनाजी कांबळे यांच्यात थेट लढत झाली. कौसर बागवान यांना पाच मते तर  जयश्री कांबळे यांना चार  मते पडली. त्या प्रभाग क्र.१८ -ब या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. महिला व बालकल्याण समिती उप-सभापतीपदासाठी नगरसेविका  दीपा  ठाणेकर या विजयी झाल्या. त्यांनी अरुणा विशाल गवळी यांचा पराभव केला. दिपा ठाणेकर यांना पाच मते तर  अरुणा गवळी यांना चार मते पडली.  नुतन महिला व बालकल्याण समिती उपसभापती हे प्रभाग क्र.७-ब या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. आयुक्त के.मंजूलक्ष्मी,अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, यांनी  अभिनंदन केले. यावेळी मुख्य लेखापाल संजय सरनाईक, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, परवाना अधिक्षक अशोक यादव, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी उपस्थित होते.  (Vishal Shirale elected as the Chairman of the Standing Committee)

परिवहन समिती सभापती निवडीवर काँग्रेसचा आक्षेप

परिवहन समिती सभापती निवडीवर आक्षेप घेत पीठासन अधिकाऱ्यांकडे अर्ज दिला आहे. अर्जात असे म्हटले आहे की, परिवहन समिती सभापतीच्या निवडणुकीसाठी १२ परिवहन समिती सदस्य आणि नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती विशाल शिराळे उपस्थित होते. निवडणुकीत हात वरुन करुन मतदान घेतले असताना स्थायी समिती सभापती शिराळे यांनीही मतदान प्रक्रियेत भाग घेतला. नुतन सभापतीला मतदानाचा अधिकार नसल्याचा आक्षेप परिवहन समितीच्या सभापतीपदी निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसचे उमेदवार दुर्वास कदम यांनी घेतला होता. पणत्यांच्या आक्षेपाचा विचार न करता स्थायी समिती सभापतींचे मतदान ग्राह्य धरले. परिवहन समिती सभापती निवडीत कलम २५ पोटकलम दोन मध्ये १२ सदस्यांची निवड सांगितले. त्यामुळे स्थायी समिती सभापतींना मतदानाचा अधिकार नसल्याचे कायद्याने स्पष्ट होत आहे. त्यामुळे परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक रद्द करुन नव्याने निवड प्रक्रिया राबवण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे यांनी केली आहे. निवड प्रक्रिया रद्द केली नाही तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशारा दिला आहे.  (Vishal Shirale elected as the Chairman of the Standing Committee)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00