Home » Blog » राज्यात कोल्हापूर, जिल्ह्यात करवीर भारी

राज्यात कोल्हापूर, जिल्ह्यात करवीर भारी

कोल्हापूर जिल्ह्यात ७६.२५ करवीर ८४.७२ टक्के मतदान

by प्रतिनिधी
0 comments
Kolhapur

कोल्हापूर; प्रतिनिधी : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत चुरशीचे मतदान झाले. राज्यात सर्वांत जास्त मतदानाचा बहुमान कोल्हापूर जिल्ह्याला मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात  ७६.२५ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात एकूण १० विधानसभा मतदारसंघ आहेत. या दहा मतदारसंघांपैकी करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ८४.७९ टक्के मतदान झाले. प्रचंड राजकीय ईर्ष्या, दिग्गज उमेदवार, कार्यकर्त्यांची फौज, जागरुक मतदार आणि लाडकी बहीण योजना, व्होट जिहाद या प्रचारांच्या मुद्द्यामुळे मतदानाचा टक्का वाढला असल्याची चर्चा आहे. जिल्हा प्रशासनानेही मतदानाचा टक्का वाढावा यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याचा परिणाम म्हणून मतदान टक्केवारी वाढली आहे. (Maharashtra Election)

जिल्ह्यात ८० टक्क्याच्या वर करवीर आणि कागल मतदारसंघात मतदान झाले. करवीर मतदारसंघात करवीर आणि दुर्गम गगनबावडा, पन्हाळा तालुक्यातील भाग येत असून मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसते. या मतदारसंघात काँग्रेसकडून राहुल पाटील आणि शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यात लढत झाली आहे. जास्त मतदानाचा फायदा कोणाला मिळणार हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल मतदारसंघात ८१.७२ टक्के मतदान झाले. मतदारसंघात कागल तालुका, गडहिंग्लज पालिका आणि एक जिल्हा परिषद मतदार संघ, आजरा तालुक्यातील एका मतदारसंघाचा समावेश आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे या दोन तुल्यबळ उमेदवार आणि राष्ट्रवादीच्या दोन गटांत निवडणूक झाली. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राधानगरी, शाहूवाडीला ७५ टक्क्यांवर

७५ टक्क्याच्यावर राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकणंगले मतदारसंघात मतदान झाले. शाहूवाडी मतदारसंघात शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील गावांचा समावेश असून या मतदारसंघात ७९.०४ टक्के म्हणजे जवळजवळ ८० टक्के मतदान झाले आहे. आमदार विनय कोरे आणि माजी आमदार सत्यजित पाटील या पारंपरिक विरोधकांमध्ये येथे सामना आहे. या मतदारसंघात पन्हाळा की शाहूवाडी बाजी मारणार हे निकालात दिसून येणार आहे. राधानगरी मतदारसंघात ७८.२६ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात राधानगरी आणि भुदरगड तालुक्यासह आजरा तालुक्यातील गावांचा समावेश होते. आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार के. पी. पाटील यांच्यात आणि शिवसेनेच्या दोन गटांत लढत होत आहे. (Maharashtra Election)

शिरोळ, हातकणंगले मतदारसंघात मतदानाचा आकडा ७५ टक्क्याच्यावर पोचला आहे. ऊस आणि साखर कारखानदाराचा पट्टा ओळखल्या जाणाऱ्या शिरोळ मतदारसंघात ७८.०६ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत असून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील आणि गणपतराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघात माजी खासदार राजूशेट्टी यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. हातकणंगले तालुक्यातही तिरंगी लढत होत असून या मतदारसंघात ७५.५० टक्के मतदान झाले आहे. आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार सुजीत मिणचेकर आणि अशोकराव माने यांच्यात लढत होत आहे.

संवेदनशील मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात मतदानाचा टक्का जवळजवळ ७५ टक्क्याच्या आसपास ७४.९५ टक्क्यावर पोचला. आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक या घराण्यात होत आहे. विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघात ७४.६१ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यातील गावांचा समावेश आहे. आमदार राजेश पाटील यांना नंदाताई बाभुळकर, अप्पी पाटील, शिवाजी पाटील यांनी आव्हान दिल्याने इथे चौरंगी लढत होणार आहे. (Maharashtra Election)

मॅचेंस्टर सिटी म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी मतदारसंघात ६८.९५ टक्के मतदान झाले आहे. राहुल आवाडे आणि मदन कारंडे यांच्यात थेट लढत असून नवीन चेहऱ्याचा आमदार इचलकरंजीला मिळणार आहे.  जिल्ह्यात सर्वात कमी मतदान ६५.५१ टक्के  कोल्हापूर उत्तर मतदारसंघात झाले आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि माजी नगरसेवक राजेश लाटकर यांच्यात लढत होणार आहे.

  मतदारसंघनिहाय टक्केवारी

  • चंदगड                   ७४.६१
  • राधानगरी               ७८.२६
  • कागल                    ८१.७२
  • कोल्हापूर  दक्षिण    ७४.९५
  • करवीर                   ८४.७९
  • कोल्हापूर उत्तर       ६५.५१
  • शाहूवाडी                ७९.०४
  • हातकणगंले            ७५.५०
  • इचलकरंजी             ६८.९५
  • शिरोळ                    ७८.०६

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00