अहिल्यानगर : धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह योजनेला मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतिगृह बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असे नाव देण्यात येणार आहे. नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, अमरावती येथे ही वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. (Hostel Facility)
धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव देण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली.
याशिवाय या बैठकीत अन्य महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान आणि आदिशक्ती पुरस्कार योजना सुरु करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. महिलांचे आरोग्याबाबत समस्यांचे संवेदनशीलपणे निवारण करणे, कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यूचे प्रमाण कमी करणे. मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढवणे, लैंगिक आणि शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करणे, पंचायत राज पध्दतीत महिला नेतृत्वाचा सहभाग वाढविणे, महिलांना आर्थिक सक्षम करणे आदी या अभियानाची उद्दिष्टे आहेत. (Hostel Facility)
राहुरी येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालये स्थापन करण्यास आणि त्यासाठीच्या आवश्यक पदांना मंजुरी देण्यात आली.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याच्या अध्यादेशास मान्यता देण्यात आली.
ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मिशन महाग्राम कार्यक्रमाला २०२९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. (Hostel Facility)
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि या महाविद्यालयास संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. या महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव देण्याचाही निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांनुसार या महाविद्यालयाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पायाभूत सुविधा पुढील सात वर्षांसाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारलेल्या तलाव, बारव, कुंड, घाट विहिरी आणि पाणी वाटप प्रणालीच्या जतनासाठी विशेष योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली.
हेही वाचा :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्यांच्या आत जाहीर करा
प्रदूषणकारी वाहनांना इंधन बंदी
आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा हटवा