नवी दिल्ली : प्रतिनिधी : आरक्षणांवरील ५० टक्के मर्यादा हटवा, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जातीय जनगणनेसंदर्भात खर्गे यांनी मोदींना तीन सूचना केल्या आहेत. (Kharge)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाने नुकतीच देशात जातीय जनगणना घेण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रव्यापी जनगणना करताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तीन सूचना एका पत्राद्वारे केल्या आहेत. या पत्रातील काही उतारे खर्गे यांनी एक्स वर शेअर केले आहेत. जनगणना करताना तेलंगणा मॉडेलवर आधारित प्रश्नावली करावी. जात सर्वेक्षण निकालांकडे दुर्लक्ष करुन जबरदस्तीने लादलेली ५० टक्के आरक्षण मर्यादा काढून टाकण्यासाठी घटनात्मक दुरुस्ती करावी. खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्यासाठी कलम १५ (५) ची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. (Kharge)
तेलंगणात काँग्रेस पक्षाची सत्ता असून विद्यमान सरकारने जात सर्वेक्षण केले आहे. त्याचे निकाल फेब्रुवारीमध्ये जाहीर झाले. सरकारने जातगणनेची घोषणा केल्यापासून काँग्रेसकडून संपूर्ण भारतात तेलंगणा मॉडेल स्वीकारण्याच मागणी केली आहे. तसेच खर्गे यांनी पंतप्रधानांना जातीय जनगणनेच्या मुद्द्यावर सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. जातीय जनगणना काँग्रेसने सुचवलेल्या व्यापक पद्धतीने केल्या पाहिजेत. त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक न्याय आणि दर्जा संधींच्या समानता सुनिश्चित होतील असे पत्रात म्हटले आहे. (Kharge)