अजितदादांची भाजपशी कुस्ती खरी की नुरा?
महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत महाराष्ट्राचं लक्ष मुंबई महापालिकेकडं लागलं होतं. म्हणजे अजूनही लागून राहिलं आहे. त्या तुलनेत पुण्याची निवडणूक मचूळ मचूळ वाटत होती. दोन्ही राष्ट्रवादी एक होणार का, यासारख्या वांझोट्या राजकीय प्रश्नाभोवती सुरुवातीला निवडणूक फिरत होती. अखेर उद्योगपती गौतम अदानींच्या बारामती दौ-यात पवार कुटुंबीयांचे मनोमीलन झाले आणि पाठोपाठ पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी झाली. अजित पवार भाजपविरोधात लढत असले तरी त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेले गुळपीठ पाहता ही नुरा कुस्ती आहे आणि अजित पवार नंतर भाजपसोबतच जातील, असा अनेकांचा कयास आहे. पण महायुतीत राहुन अजित पवार भाजपचे राजकारण शिकले आहेत. निवडणुकीच्या मैदानात विरोधकांना अंगावर घेतल्याशिवाय यश मिळत नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी भाजपवरच भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यावरून राज्याच्या राजकारणात कलगी-तुरा रंगला आहे.
विजय चोरमारे
अजित पवारांचा जीव पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये
जसा ठाकरेंचा जीव मुंबई महापालिकेत अडकलेला असतो, तसाच अजित पवारांचा जीव पुणे आणि त्याहून अधिक पिंपरी चिंचवड महापालिकेत अडकलेला असतो. त्याचमुळं सत्तेत असताना त्यांनी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत कधी तडजोड केली नाही. पालकमंत्रिपदाच्या माध्यमातून पुण्याच्या राजकारणावर वर्चस्व ठेवलं. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढताहेत. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र लढताहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचीही भाजपशी युती होऊ शकली नाही, त्यामुळे तेही स्वतंत्र लढताहेत. असे असले तरी पुण्यातला सामना प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात असल्याचे दिसते. अर्थात चर्चा आपल्याभोवती राहील याची काळजी घेत बाकीच्या पक्षांना चित्रातून गायब करायचे, ही भाजप आणि शिवसेनेची जुनी रणनीती आहे. आता ती रणनीती भाजप आणि अजित पवारांचा पक्ष राबवताना दिसताहेत. त्यासाठी अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा सामना पुण्यात उभा केला जातोय. (Ajit Pawar’s wrestling match real or fake)
अर्थात मुरलीधर मोहोळ हे आता आता केंद्रात राज्यमंत्री झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यामुळे मराठा असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. त्यामुळे ते चर्चेत आले. पुण्याचे भाजपचे नेते म्हणून पुढं येऊ लागले. नाहीतर अजित पवार जेव्हा राज्याचे राजकारण करीत होते, तेव्हा मुरलीधर मोहोळ पुण्यात साधे नगरसेवक होते. तीच त-हा पिंपरी चिंचवडच्या महेश लांडगे यांचीही आहे. या दोघांची अजितदादांशी कोणत्याही अंगाने बरोबरी होऊ शकत नाही. मात्र महापालिकेसाठीचे नेतृत्व मुरलीधर मोहोळ यांच्याकडे असल्यामुळे स्वाभाविकपणे मुरली मोहोळ विरुद्ध अजित पवार असा सामना पुण्यात दिसतो आहे. दोघांनी एकमेकांविरुद्ध केलेल्या आरोपांमुळे तो ठळकपणे समोर आला आहे.
गुन्हेगारीवरून आरोप-प्रत्यारोप
कोयता गँग हद्दपार करू, टायर मध्ये घालू असे म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांची उमेदवार यादी बघा, असे म्हणून मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्या यादीतील गुन्हेगारांच्या नावाकडे लक्ष वेधले. पुण्यात गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्याचे खापर राज्याच्या गृहखात्यावर म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच फोडले जाते. आता सत्तेतल्या दोन पक्षांचे नेते त्यावरून एकमेकांवर आरोप करतानाचे मनोरंजन भारीच आहे. मोहोळ यांनी डिवचल्यावर अजित पवार यांनी थेट त्यांच्या वर्मावरच घाव घातला. गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेला, त्यासंदर्भाने अजित पवार यांनी, गुन्हेगार विदेशात कोणत्या मंत्र्याच्या साहाय्याने पळून गेला ? असा प्रश्न उपस्थित केला. (Ajit Pawar’s wrestling match real or fake)
संघर्षाला व्यक्तिगत किनार
मोहोळ आणि अजित पवार यांच्यातील या संघर्षाला पक्षीय राजकारणापलीकडं काही व्यक्तिगत संघर्ष आहेत का? अजित पवार यांनी ‘जय जिनेंद्र म्हणत जैन बोर्डिंग प्रकरणाकडं लक्ष वेधताना मुरली मोहोळ यांची कळ काढली. पार्थ पवारच्या जमीन प्रकरणात व्यवहारच झाला नाही म्हणत त्या विषयावर पडदा टाकला. ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप ज्यांनी केले त्यांच्या सोबतच मी सत्तेत आहे ना, म्हणत स्वतःच स्वतः ला क्लीन चिट दिली.
पुण्यातील जैन बोर्डिंगच्या प्रकरणात मुरलीधर मोहोळ अडचणीत आले होते. खरेतर पुणे महापालिकेची निवडणूक त्याच मुद्द्यावर केंद्रीत झाली असती. परंतु पाठोपाठ पार्थ पवार यांचे जमीन प्रकरण बाहेर आले. मुरली मोहोळ यांचे जैन बोर्डिंगचे प्रकरण दाबण्यासाठी पार्थ पवारांचे प्रकरण काढल्याची चर्चा होती आणि आहे. हा पदरही या दोघांच्या आरोप प्रत्यारोपांना आहे. (Ajit Pawar’s wrestling match real or fake)
कारभारी बदलण्याचे आवाहन
अजित पवार यांनी पुण्यातल्या भाजपच्या कारभारावरही थेट टीका केली आहे. गेल्या नऊ वर्षात पाच वर्षे भाजपची एकहाती सत्ता असताना आणि चार वर्षे प्रशासक असताना पुणेकरांच्या समस्या वाढल्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पाणी कपात, कचरा कोंडी, ट्रॅफिक जाम वरून पुणेकरांचे हाल होत असल्याचे यांनी म्हटले आहे. कारभारी बदला मी पुणेकरांच्या समस्या सोडवतो असे म्हणत भाजपवर हल्लाबोल केला. अजित पवार यांच्या या विधानामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती दिसून येते. आपल्याला आठवत असेल. २००७ मध्ये शरद पवार यांनी पुण्याचा कारभारी बदला असे आवाहन केले. आणि सुरेश कलमाडी यांची दहा वर्षांची सत्ता गेली. त्यावेळी अजित पवार यांनी कलमाडी आणि काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी भाजप, शिवसेनेसोबत हातमिळवणी केली. यावेळी भाजपला दूर ठेवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आघाडी केली आहे. शिवाय आरपीआय खरात या गटाशी आघाडी केली. तो पक्ष स्वतंत्र आहे आणि त्यांच्यामार्फत गुन्हेगारांना उमेदवारी दिली ती जबाबदारी त्यांची, अशी सोयीस्कर भूमिका घेतली आहे. अजित पवार यांनी काँग्रेसलाही सोबत घेण्याचे प्रयत्न केले होते. पुण्याचे प्रभारी सतेज पाटील यांना फोनही केला होता. परंतु काँग्रेसने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही.
पिंपरी चिंचवडवरून संघर्ष तीव्र
पिंपरी चिंचवड महापालिका हे अजित पवार यांच्या राजकारणाचे प्रमुख केंद्र मानले जाते. रामकृष्ण मोरे यांचे वर्चस्व संपवून अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडवर वर्चस्व मिळवले. तिथे त्यांची २५ वर्षे सत्ता होती. पिंपरी चिंचवडचा विकास आपण केल्याचा दावा त्यांनी केला. त्यात तथ्यही आहे. पिंपरी चिंचवडचे जे नियोजन दिसते त्यामागे अर्थातच अजित पवार होते. परंतु मधल्या काळात लक्ष्मण जगताप यांना फोडून भाजपने पिंपरीची सत्ता अजित पवारांकडून हिसकावून घेतली. महेश लांडगे आणि भाजपवाल्यांनी पिंपरी चिंचवड महापालिका कशी पोखरली आहे, याचा पाढाच अजित पवार यांनी वाचला आहे. भाजपने पुण्यात कोट्यवधी रुपयांच्या ठेवी मोडल्या हा एक भ्रष्टाचारच आहे. त्या भ्रष्टाचाराचे पुरावे आपल्याकडे असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं होतं. (Ajit Pawar’s wrestling match real or fake)
भाजपवर टीका करताना त्यांनी शब्दही अत्यंत कठोर वापरले. भाजपची बकासुरी भूक हा त्यांचा शब्द भाजपच्या नेतृत्वाच्या जिव्हारी लागला. त्यामुळे पिंपरी चिंचवडचा संघर्ष थेट राज्य पातळीवर गेला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याही ते जिव्हारी लागले. रवींद्र चव्हाण यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. अजित पवार यांना सोबत घेतल्याचा पश्चात्ताप होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदेशाचा मी अध्यक्ष आहे, त्यामुळं कार्यकर्ते मला हे सांगण्याचा प्रयत्न करतात. अजित पवारांना सोबत घेताना विचार करा, असं मी देवेंद्र फडणवीस यांनाही म्हटलं होतं, असं त्यांनी सांगितलंय. त्याचवेळी चंद्रकांतदादा पाटील यांनीही गृहखातं आणि पोलिस आमच्याकडं असल्याचा इशारा दिला आहे.
स्थानिक संघर्ष राज्य पातळीवर
भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे राज्य पातळीवरील नेते प्रतिक्रिया देत आहेत. ते स्वाभाविकही आहे. पण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकमेकांविरुद्ध शब्द काढलेला नाही, हेही लक्षात घ्यायला हवं. त्याचमुळं अजित पवार यांनी भाजपला थेट अंगावर घेतलंय का, याबद्दल अनेकांना शंका वाटते.
राज्य पातळीवरील नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली असली तरी लढत स्थानिक पातळीवरचीच आहे. ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांनी म्हटल्याप्रमाणं, पुणे काय पिंपरी चिंचवड काय दोन्ही कडं खरेखुरे पैलवान असलेले मुरलीधर मोहोळ आणि महेश लांडगे यांच्याशी तेल लावलेल्या पैलवानाच्या तालमीत तयार झालेले अजित पवार यांची लढत होत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड केसरी कुस्ती रंगणार असली तरी ही नुसतीच खडा खडी असणारी नुरा कुस्ती लावणारे देवेंद्र आहेत. यात विरोधकांना चितपट करायचा डाव आहे.
‘चित भी मेरी, पट भी मेरी’, अशी रणनीती आहे. ‘खाऊंगा भी, और खाने भी दूंग“, असा नारा आहे. ‘आपण सारे भाऊ भाऊ, मिळून किंवा वेगवेगळे खाऊ’ असं ब्रीद आहे.