एनसीईआरटीच्या आठवीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकातील मराठा इतिहासाच्या गौरवावरून राजस्थानमधील राजपूतांच्या वारसांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राजपूत इतिहासाला कमी लेखून मराठ्यांच्या इतिहासाचे गौरवीकरण करण्यात आल्याची टीका राजस्थानमधील सर्वपक्षीय नेत्यांकडून होऊ लागली आहे. भाजपला आता व्होट बँकेसाठी राजपुतांपेक्षा मराठे महत्त्वाचे वाटू लागल्याची टीका होऊ लागली आहे. राजस्थानमधल्या भाजपच्याही अनेक नेत्यानी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. (NCERT Book Controversy)
-डॉ. विजय चोरमारे
एनसीईआरटीच्या आठव्या इयत्तेच्या समाजशास्त्राच्या सुधारित पुस्तकातील एका नकाशावर आक्षेप घेतला जात आहे. या नकाशात जैसलमेर, बूंदी आणि मेवाडला मराठा साम्राज्यात दाखवले आहे.
एनसीईआरटीच्या आठवीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात ‘Reshaping India’s political map’ मध्ये राजपूत इतिहास फक्त दोन पानांत ‘Surge of the Rajputs’ शीर्षकाखाली दिला आहे. यात लिहिले आहे— “राणा सांगाने १६व्या शतकाच्या सुरुवातीला अनेक राजपूत कबिल्यांना एकत्र केले, सुलतानांविरुद्ध अनेक युद्धं जिंकली, पण खानवा युद्धात बाबराकडून हरले.” (NCERT Book Controversy)
राजपूत–मुगल संघर्षावर पुस्तकात लिहिले आहे— “मेवाडचे महाराणा प्रताप यांनी मुगल सत्ता स्वीकारण्यास नकार दिला आणि राजपूत विरोधाचे प्रतीक बनले…१५७६ मध्ये अरावलीच्या हळदी घाटात संघर्ष झाला, ज्यात मुगलांचे पारडे जड होते, पण महाराणा प्रताप बचावले आणि अनेक वर्षे गनिमी काव्याने युद्ध चालू ठेवले…”
‘The Rise of the Marathas’ नावाचे प्रकरण २२ पानांचे आहे, ज्यात फक्त मराठा शासकांची चर्चा आहे. वादग्रस्त नकाशा याच प्रकरणाच्या पान ७१ वर आहे. यात ‘Who are the Marathas?’, ‘Foundations of Maratha power and the rise of Shivaji’ (ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अचानक हल्ल्यांचे वर्णन आहे), ‘The Marathas after Shivaji’ आणि ‘Maratha administration’ असे विभाग आहेत. यात मराठा सेना, आरमाराची ताकद, न्याय व्यवस्था तसेच महाराणी ताराराणी आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या योगदानाचा उल्लेख आहे. (NCERT Book Controversy)
राजस्थानातील राजकीय परिस्थितीची वस्तुस्थिती काय होती… तर
इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी लिहिले की, १७२४ मध्ये बूंदी राजवंशाच्या उत्तराधिकारी वादादरम्यान मराठ्यांनी संधी साधून राजस्थानात प्रवेश केला आणि कोटा, डुंगरपूर, जोधपूर आणि आमेरकडून कर वसूल केला, पण तिथे पूर्ण नियंत्रण मिळवले नाही.
‘The Marathas’ या पुस्तकात स्टुअर्ट गॉर्डनने लिहिले आहे की, “बाजीरावाने १७२८ मध्येच उत्तरेकडे पश्चिम माळवा आणि नंतर राजस्थानात कर वसुली मोहीम चालवली. त्यांच्या मृत्यूनंतर, मराठा सेना जवळजवळ दरवर्षी राजस्थानात घुसखोरी करत राहिल्या. जयपूरचे राजा जयसिंह यांच्या मृत्यूनंतर उत्तराधिकारी वादात पेशव्यांनी मध्यस्थी केली, जयपूरवर चढाई केली आणि मोठा कर मागितला.”
त्यांनी पुढे लिहिले, “आम्ही शिंदे, होळकर आणि पेशव्यांच्या वाढत्या दाव्यांना राजस्थानात पाहू शकतो. त्यांनी मोठ्या कराच्या थकबाकी वसुलीसाठी सेना पाठवली. कोटा, बुंदी, जयपूर आणि उदयपूरकडून काही कर मिळाला, पण त्यांनी व्यवस्था ताब्यात घेतली नव्हती. (NCERT Book Controversy)
मात्र एनसीईआरटीच्या पुस्तकातील उल्लेखावरून राजस्थानमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विशेषतः राजपूत वंशाच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतले आहेत.
राजसमंदच्या भाजप खासदार महिमा कुमारी आणि त्यांचे पती, नाथद्वारा येथील भाजप आमदार आणि महाराणा प्रताप यांचे वंशज विश्वराज सिंह यांनी संबंधित नकाशावर आक्षेप घेतला आहे. या नकाशात जैसलमेर, बूंदी आणि मेवाडला मराठा साम्राज्यात दाखवले आहे.
राजस्थानातील अनेक जुन्या राजघराण्यांच्या वंशजांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात मेवाडचे भाजप नेते विश्वराज सिंह, अलवरचे काँग्रेस नेते भंवर जितेंद्र सिंह आणि जैसलमेरचे चैतन्य राज सिंह भाटी यांचा समावेश आहे. त्यांचे म्हणणे आहे की पुस्तकात मराठ्यांचे गौरवीकरण करताना राजपूतांना कमी लेखले आहे. (NCERT Book Controversy)
पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणात “The Rise of the Marathas” मधील नकाशात मराठा साम्राज्य कोल्हापूरपासून कटक (पूर्व) आणि कोल्हापूरपासून पेशावर (उत्तर) पर्यंत पसरलेले दाखवले आहे. यात ग्वाल्हेर, जयपूर, दिल्लीसह जैसलमेर, मेवाड, बुंदी आणि पंजाबचे अनेक भाग मराठा शासनाखाली दाखवले आहेत. याच नकाशावरून राजस्थानातील नेत्यांमध्ये नाराजी आहे.
महिमा कुमारी यांनी दिल्लीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणावर गांभीर्याने विचार करून आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. एनसीईआरटीने आता एक तज्ञ समिती नेमली असून ती या प्रकरणाचा आढावा घेऊन अहवाल सादर करणार आहे.
विश्वराज सिंह यांनी म्हटले आहे की, राजपूत वंशाचा इतिहास मराठा वंशापेक्षा खूप मोठा आहे आणि एनसीईआरटीच्या नकाशातील चुकीच्या सादरीकरणामुळे राजस्थानच्या राजघराण्यांच्या शौर्य आणि योगदानाला कमी लेखले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “राजस्थान कधीच मराठा साम्राज्याचा भाग नव्हता. त्यांनी प्रयत्न केले होते, पण यश मिळाले नाही. राजपूतांचा इतिहास मराठ्यांपेक्षा खूप मोठा आहे. मराठा साम्राज्याला मोठे दाखवण्याचा आणि त्यांना अधिक शूर दाखवण्याचा प्रयत्न करताना राजस्थानच्या राज्यकर्त्यांना कमीपणा लखले आहे.
नकाशा पुस्तकात एका ओळीच्या संदर्भ म्हणून दिला आहे —“मराठ्यांनी भारताच्या मोठ्या भागावर नियंत्रण मिळवले…”. नकाशात केशरी रंग मराठा साम्राज्य दर्शवतो, जो राजस्थानपर्यंत पसरलेला दाखवला आहे, तर नकाशाच्या मजकुरात राजस्थान किंवा कोणत्याही राजपूत राज्याचा उल्लेख नाही. पुढच्या परिच्छेदात लिहिले आहे—“उत्तरेकडे वाढत जाऊन, मराठ्यांनी काही काळासाठी लाहोर, अटक आणि अगदी पेशावरवरही नियंत्रण मिळवले.”
एनसीईआरटीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकांची निर्मिती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष मिशेल डॅनिनो यांनी म्हटले आहे की, हा नकाशा पूर्वी प्रकाशित सार्वजनिक नकाशांवर आधारित आहे आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने तयार केला आहे. सातवीच्या पुस्तकात ऐतिहासिक सीमांच्या अनुमानित असण्याचा डिस्क्लेमर आहे, पण आठवीच्या वर्गाच्या पुस्तकात तो चुकून वगळला गेला. तो दिला असता तर गैरसमज टाळता आला असता.
जैसलमेर राजवंशाचे वंशज चैतन्य राज सिंह यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट करून या नकाशाचा निषेध केला आहे. जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग दाखवणे हे इतिहासाच्या दृष्टीने भ्रामक, तथ्यहीन आणि अत्यंत आक्षेपार्ह” असल्याचे म्हटले आहे. (NCERT Book Controversy)
पुस्तकाबद्दल त्यांनी लिहिले, “अशा चुकीच्या आणि इतिहासाशी विसंगत गोष्टी एनसीईआरटीसारख्या संस्थांच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे करतातच. शिवाय आमच्या गौरवशाली इतिहास आणि जनतेच्या भावनांना धक्का पोहोचवतात. आमच्या पूर्वजांचे बलिदान, स्वायत्तता आणि शौर्याला कलंकित करण्याचा हा प्रयत्न आहे.”
बूंदी संस्थानच्या ब्रिगेडियर भूपेश सिंह यांनीही नकाशावर आक्षेप घेत आम्ही कधीच मराठ्यांच्या अधीन नव्हतो, असे म्हटले आहे. स्वतःच्या लोकांना लुटणे आणि त्रास देणे हे साम्राज्य म्हणता येत नाही. कृपया हा खोटा प्रचार थांबवा.”
काँग्रेस नेते आणि अलवर संस्थानचे वंशज भंवर जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की, १८व्या शतकात राजस्थानची मारवाड, मेवाड, बीकानेर, जयपूर, भरतपुर, जैसलमेर, अलवर किंवा इतर संस्थाने स्वतःचे स्वातंत्र्य आणि स्वायत्तता टिकवण्यास सक्षम होती.”
१८व्या शतकात—राजस्थानच्या राजपूत आणि भरतपुरच्या जाट संस्थानाच्या शासकांनी सतत मुगल, मराठा आणि नंतर ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी संघर्ष केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भैरों सिंह शेखावत यांच्या निधनानंतर, राजस्थानच्या राजकारणात राजपूत समाजाचे वर्चस्व राहिले नाही. आता भाजप, राजपूतांपेक्षा मराठा वोट बँकेला मजबूत करण्यावर लक्ष देत असल्याचा आक्षेपही घेण्यात येत आहे.
एनसीईआरटीच्या या पुस्तकाच्या अनुषंगाने भाजपच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपला आता राजपूत समाजाची गरज राहिलेली नाही, त्यांना मराठी व्होट बँक महत्त्वाची वाटते का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहेत.
अस्मितांचे राजकारण सगळीकडेच चालते. राजस्थानही त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. आता बघूया केंद्र सरकार म्हणजेच एनसीईआरटी राजस्थानातील राजपुतांचे कसे समाधान करते ते.
हेही वाचा :
विरोधकांचा मोर्चा रोखला; राहुल, प्रियंका पोलिसांच्या ताब्यात
अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्यांना भीक घालत नाही; पाकला इशारा