मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी मोठ्या संख्येने आंदोलक राज्याची राजधानी मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. तथापि, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित आदेश राज्य सरकारने दिल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहीत पवार यांनी सरकारला इशारा दिला आहे. (Rohit Pawar warns)
आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकूमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल. या-ना त्या मार्गाने सरकार मराठा आंदोलकांशी दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये, असा इशारा आ. रोहीत पवार यांनी दिला आहे. (Rohit Pawar warns)
यासंदर्भातील पोस्ट त्यांनी ‘एक्स’वर केली आहे.
पोस्टमध्ये रोहीत पवार यांनी म्हटले आहे, ‘‘मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात. तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात.’’ या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा!, असे त्यांनी म्हटले आहे.