राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पाच जुलै रोजी एका मंचावर येणार आहेत. महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीच्या सरकारी निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे त्यासंदर्भातील मोर्चा रदद् करून विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तब्बल वीस वर्षांनी राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, ही महाराष्ट्राच्या आणि विशेषतः मुंबईकरांच्यादृष्टीने महत्त्वाची राजकीय घटना आहे. परंतु आता एकत्र आले, पुढे काय…. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हा विजयी मेळावा म्हणजे दोघांची राजकीय युती होण्याच्यादृष्टीने पडलेले पहिले पाऊल आहे काय, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. (Raj-Uddhav alliance)
- डॉ. विजय चोरमारे
शिवसेनेची स्थापना १९६६ साली झाली. म्हणजे पुढच्या वर्षी शिवसेना साठ वर्षांची होईल. शिवसेनेची स्थापनाच मुळी मराठीच्या मुद्यावर झाली होती. आणि सहा दशकांनंतर पुन्हा तोच मराठीचा मुद्दा घेऊन शिवसेना मैदानात उतरतेय.
सभा, मेळावे नेहमीच होत असतात. राज आणि उद्धव यांच्या सभाही अधुनमधून होत असतात. परंतु यावेळची सभा वेगळी आहे. त्याचे कारण तब्बल दोन दशकांनंतर दोघे भाऊ एकत्र येणार आहेत. मधल्या काळात एखाद्या कार्यक्रमात, कौटुंबिक समारंभात, दुःखद प्रसंगात दोघांची भेट झाली. परंतु दोघांनी एका मंचावर येण्याची ही पहिली वेळ आहे. मुळात ते एकत्र येण्याची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहे. सरकारने केलेल्या मराठीच्या मुद्यावरील मोर्चाच्या निमित्ताने ते एकत्र येणार होते. परंतु सरकारने संबंधित निर्णयच स्थगित केला. त्यामुळे मोर्चाच्यानिमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता मावळली. परंतु मोर्चाऐवजी विजयी मेळावा ठरवण्यात आला. आणि दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यात यश आले. परंतु ही युती तात्पुरती आहे की पुढे तिचे रुपांतर राजकीय युतीमध्ये होणार याचे कुतूहल आहे.(Raj-Uddhav alliance)
या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याआधी आपण या दोघा भावांचा राजकीय प्रवास समजून घेऊया.
राज ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहेत, तर उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र. राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे बाळासाहेबांचे धाकटे बंधू, तर राज यांची आई कुंदा ठाकरे या बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताईंच्या धाकट्या बहीण. त्यामुळे राज आणि उद्धव हे चुलत भाऊ आहेत.(Raj-Uddhav alliance)
राज ठाकरे हे लहानपणापासूनच शिवसेनेत सक्रिय होते. बाळासाहेबांच्या सभांमध्ये आणि दौऱ्यांमध्ये ते सहभागी असायचे. उद्धव यांची राजकारणात प्रवेश उशिरा झाला, तर राज यांनी १९८० च्या दशकात भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून युवकांसाठी काम केले.(Raj-Uddhav alliance)
या काळात राज आणि उद्धव यांच्यातील संबंध मैत्रीपूर्ण आणि जिव्हाळ्याचे होते. उद्धव ठाकरे राजकारणात नसल्यामुळे राज यांना बाळासाहेबांचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते.
…
१९९०च्या दशकात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कामकाजात सहभाग घ्यायला सुरुवात केली. बाळासाहेबांनी २००४ मध्ये उद्धव यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष नेमले. महाबळेश्वरच्या अधिवेशनात बाळासाहेबांनी राज ठाकरे यांनाच त्यासाठी उद्धव यांचे नाव सुचवायला सांगितले. त्यामुळे राज यांच्यासह त्यांचे समर्थक नाराज झाले.
उद्धव यांचा पक्षातील हस्तक्षेप वाढत गेल्याने राज यांना आपले स्थान धोक्यात असल्याची जाणीव झाली. यामुळे दोघांमधील राजकीय मतभेद वाढत गेले.
२७ नोव्हेंबर २००५ रोजी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. उद्धव यांना कार्याध्यक्षपदी नेमल्यामुळे आणि पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे राज यांनी हा निर्णय घेतला.(Raj-Uddhav alliance)
९ मार्च २००६ रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) स्थापन केली. त्यांनी पक्षाचे धोरण मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या हितांभोवती केंद्रित केले. यामुळे शिवसेना आणि मनसे यांच्यात थेट स्पर्धा सुरू झाली.
राज यांनी मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेतली, विशेषतः उत्तर भारतीय स्थलांतरितांविरोधात आक्रमक आंदोलने केली. उद्धव यांनीही मराठी अस्मितेचा मुद्दा हाताळला, परंतु त्यांची शैली तुलनेने संयमित होती.(Raj-Uddhav alliance)
२००९, २०१४ आणि २०१९च्या निवडणुकांमध्ये शिवसेना (उद्धव गट) आणि मनसे यांच्यात तीव्र स्पर्धा दिसून आली. मनसेला २००९ मध्ये पहिल्याच निवडणुकीत चांगले यश मिळाले. त्यांचे १३ आमदार निवडून आले. शिवाय त्यांच्यामुळे शिवसेनेचे ११ उमेदवार पडले. त्यामुळे शिवसेना-भाजप युती सत्तेवर येऊ शकली नाही. नंतरच्या निवडणुकांमध्ये त्यांची कामगिरी घसरली (२०२४ मध्ये एक जागा, २०१९मध्ये एक जागा मिळाली, परंतु २०२४ मध्ये त्यांना एकही जागा मिळाली नाही. तुलनेने शिवसेनेची कामगिरी उजवी होती.
राजकीय संघर्ष असले तरी कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये दोघे एकत्र दिसले, २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारावेळी, त्याचवर्षी एका कौटुंबिक समारंभात ते एकत्र दिसले. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी समारंभास राज उपस्थित होते. नंतरही काही कौटुंबिक समारंभांमध्ये ते एकत्र दिसले.
जुलै २०१२ मध्ये उद्धव ठाकरे यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात हलवले. त्यावेळी राज्याच्या दौ-यावर निघालेले राज ठाकरे निम्म्या वाटेतून परत आले. सोबत थांबले आणि उद्धव ठाकरे यांना गाडीतून घेऊन ड्राइव्ह करीत मातोश्रीवर घेऊन गेले. अशा प्रसंगांमधून त्यांच्या कौटुंबिक जिव्हाळ्याचेही दर्शन घडले.
यावर्षी म्हणजे २०२५ मध्ये महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात राज आणि उद्धव यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. पाच जुलैला त्याविरोधात मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु सरकारने निर्णय स्थगित केल्यामुळे मोर्चा बारगळला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघा भावांना एकत्र येण्यापासून रोखले, अशी चर्चा सुरू झाली. परंतु शिवसेना-मनसे या दोन्ही पक्षांमधील थिंक टँकने मोर्चा रद्द झाला तरी दोघांच्या एकत्र येण्याचा कार्यक्रम निश्चित केला. मोर्चाऐवजी विजयी मेळावा ठरला. त्याच्या तयारीसाठी दोन्हीकडील दुस-या फळीतील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या.
मेळाव्याच्या संदर्भात अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. मेळाव्यात शेवटचे भाषण कुणाचे होणार, हा त्यातला कळीचा प्रश्न. त्याबाबतही कमालीची उत्कंठा आहे.
परंतु महापालिका निवडणुकीसाठीची युती ही अजून तरी लांबची गोष्ट आहे. कारण त्यासाठी युतीचा फॉर्म्यूला ठरावा लागेल. तो ठरवण्यासाठी अनेक बैठका व्हाव्या लागतील. दोन्ही बाजूंच्या वाचाळांना आवरावे लागेल. जागावाटप ठरावे लागेल.
युतीची गरज उद्धव ठाकरे यांच्यासाठी अधिक आहे. कारण त्यांच्यासाठी मुंबई महापालिकेची सत्ता अधिक महत्त्वाची आहे.
राज ठाकरे यांच्याकडं गमावण्यासारखं काहीच नाही. त्यामुळं त्यांचा इगो सांभाळत युतीकडं वाटचाल करावी लागणार आहे. शिवसेनेला आपल्या अनेक जागांवर पाणी सोडावे लागणार आहे. दरम्यानच्या काळात भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांकडून त्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न होतील. त्यावर मात करून पुढे जावे लागणार आहे. मुळात दोघा भावांची आपापले अहंकार बाजूला ठेवून खरोखर एकत्र येण्याची तयारी आहे का हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.