नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारत आणि चीन हे ‘हेल होल’ म्हणजे नरकाचे द्वार आहे अशी टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांच्या विधानाचे पडसाद भारतात उमटले असून भारतातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांच्याकडे तीव्र आक्षेप नोंदवला पाहिजे, अशी मागणी केली आहे. (Congress targets Modi over Trump’s statement)
अमेरिका ही भारत किंवा चीनची एक वसाहत बनेल
सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पत्र पोस्ट केले आहे. पत्रामध्ये त्यांनी कॅलिफोर्नियाच्या हाय टेक क्षेत्रात भारत आणि चीनमधील लोकांच्या वर्चस्वाचा दावा केला आहे. पोस्टमध्ये असे म्हटले आहे की “जन्माच्या आधारावर नागरिकत्वामुळे स्थलांतरित लोक त्यांच्या मुलांना नागरिकत्व मिळवून देतात. नंतर संपूर्ण कुटुंब अमेरिकेत येते. या मुद्द्यावर निर्णय न्यायालयांनी किंवा वकिलांनी नव्हे, तर देशव्यापी मतदानाने व्हायला हवा. एका सोशल मीडिया सर्वेक्षणात बहुतेक लोकांनी असे मत दिले की, जन्माच्या आधारावर मिळणारे नागरिकत्व मर्यादित केले पाहिजे. या मुद्द्यावर योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांना न्यायालये आणि कायदेशीर संस्थांवर विश्वास नाही, असे मत त्यांनी यामध्ये व्यक्त केले आहे. कॅलिफोर्नियातील हाय-टेक नोकऱ्यांमध्ये भारत आणि चीनच्या लोकांमुळे अमेरिकन नागरिकांना संधी मिळत नसल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले. भारत आणि चीनमधील स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येमुळे अमेरिका ही भारताची किंवा चीनची एक वसाहत बनेल आणि अमेरिकेची राष्ट्रीय ओळख नष्ट होईल, असेही ते यावेळी म्हणाले आहेत. नवीन येणाऱ्या स्थलांतरित समुदायाला अमेरिकेबद्दल कोणतीही निष्ठा नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे. (Congress targets Modi over Trump’s statement)
मोदी मौन बाळगून असल्याची काँग्रेसची टीका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा काँग्रेसने निषेध व्यक्त केला आहे. तसेच, काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे. “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताला नरक असे संबोधले. हे विधान अत्यंत अपमानजनक आणि भारतविरोधी आहे. यामुळे प्रत्येक भारतीयाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे हा मुद्दा उपस्थित करून आपला तीव्र आक्षेप नोंदवला पाहिजे. तथापि, आतापर्यंतचा त्यांचा इतिहास पाहता, ट्रम्प यांच्यासमोर ते काही बोलतील अशी अपेक्षा करणे शक्य नाही. ट्रम्प यांनी भारताविषयी वारंवार अपमानजनक विधाने केली आहेत. मोदी मात्र मौन बाळगून राहिले आहेत. नरेंद्र मोदी हे एक कमकुवत पंतप्रधान आहेत आणि संपूर्ण देशाला त्याचा फटका सहन करावा लागत आहे.” (Congress targets Modi over Trump’s statement)