कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी काही हिंदुत्ववादी संघटनांकडून होत आहे. त्याला तितक्याच ताकदीने विचारवंत, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांकडून जोरदार विरोध होत आहे. या वादाचे पडसाद शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत उमटले. विद्यापीठाच्या नामविस्ताराला सिनेटच्या बहुसंख्य सदस्यांनी विरोध दर्शवला. आम्ही विद्यापीठाचा नामविस्तार होऊ देणार नाही. चंद्र-सूर्य असेपर्यंत शिवाजी विद्यापीठ हेच नाव राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. ‘आमचं विद्यापीठ-शिवाजी विद्यापीठ‘हा नारा यावेळी घुमला. सिनेटमध्ये त्यासंबंधी स्थगन प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहे. (Shivaji University)
गेल्या त्रेसष्ठ वर्षात पश्चिम महाराष्ट्रासह सीमाभागातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या नामकरणाचा वाद सुरू झाला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जावे, अशी मागाी करत विद्यापीठाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे करावे यासाठी सोमवारी (दि.१७) मोर्चाचे आयोजन केले आहे, पण त्याला शिक्षणक्षेत्राशी संबंधित कार्यकर्ते, विचारवंत, प्राध्यापक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांकडून कडाडून विरोध होऊ लागला आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला शनिवारी झालेल्या अधिसभेत सिनेट सदस्यांनी कडाडून विरोध केला. शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटमध्ये ‘आमचं विद्यापीठ-शिवाजी विद्यापीठ‘हा नारा घुमला. संतप्त सदस्यांनी, नामविस्ताराची मागणी करणाऱ्यांचा धिक्कार केला. तसेच निषेधाची पत्रके सभागृहात भिरकावण्यात आली. ‘शिवाजी विद्यापीठ’ हेच नाव कायम राहावे असा स्थगन प्रस्ताव आणि ठराव करावा यावर सदस्य आक्रमक राहिले. जवळपास पाऊण तास या विषयावरुन गदारोळसारखी स्थिती होती. सभाध्यक्ष कुलगुरू डी. टी. शिर्के यांनी, ‘या विषयी मी सभागृहासोबत आहे. सदस्यांच्या भावना आठ दिवसांत सरकारला कळवू. हा स्थगन प्रस्ताव चर्चेविना स्वीकारण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (Shivaji University)
अॅड. अभिषेक मिठारी यांनी मांडला स्थगन प्रस्ताव
राजर्षी शाहू सभागृहात सभेच्या सुरुवातीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सिनेट सदस्य अॅड. अभिषेक मिठारी यांनी, ‘शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहावे,’ यासंबंधी स्थगन प्रस्ताव दाखल करत आहे. तो प्रस्ताव स्विकारावा आणि नामविस्तार होणार नाही, शिवाजी विद्यापीठ हेच नाव योग्य आहे असा ठराव करावा, अशी भूमिका मांडली. सिनेट सदस्या श्वेता परुळेकर यांनी ही विद्यापीठाचा नामविस्तार होऊ नये यासाठी ठराव करावा, याविषयी सभागृहात चर्चा घडावी अशी मागणी मांडली. यावेळी सदस्यांनी, ‘आमचं विद्यापीठ-शिवाजी विद्यापीठ’ अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले ‘आमचं विद्यापीठ-शिवाजी विद्यापीठ’या मजकुराचे फलक झळकावले. नामविस्ताराची मागणी करणाऱ्यांचा धिक्कार असो, अशा घोषणा देण्यात आल्या. (Shivaji University)
मी तुमच्यासोबत : कुलगुरु शिर्के
सभाध्यक्ष कुलगुरू शिर्के यांनी, ‘हा विषय संवेदनशील आहे. सभागृहाच्या भावना तीव्र आहेत. सदस्यांच्या भावना सरकारकडे कळवू, मी तुमच्यासोबत आहे,’ असे सांगत सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. शिवाजी विद्यापीठाच्या नावात बदल होऊ नये, अशी भूमिका सदस्यांची होती. या चर्चेत सदस्य प्राचार्य व्ही. एम. पाटील, प्रा. रघुनाथ ढमकले, डॉ. प्रताप पाटील, अमरसिंह रजपूत, डॉ. मंजिरी मोरे अॅड. अजित पाटील, प्रा. प्रकाश कुंभार, स्वागत परुळेकर, निवास गायकवाड, संजय परमणे, विष्णू खाडे, धैर्यशील यादव यांनी भाग घेत विद्यापीठाचे नाव पूर्वीसारखेच कायम राहावे, नामविस्तार होऊ नये. नामविस्तार झाल्यास शॉर्टफॉर्म होऊन विद्यापीठाची ओळख हरवेल,’ अशा भावना व्यक्त केल्या. (Shivaji University)
अभिषेक मिठारी यांचा सभागृहातच ठिय्या
प्रशासनाकडून स्थगन प्रस्ताव दाखल करुन घेण्यास व ठराव करण्यास विलंब होत असल्याचा आक्षेप नोंदवित सदस्य अभिषेक मिठारी यांनी खुर्चीवरुन उतरत जमिनीवर ठिय्या मारला. सभाध्यक्षांनी, स्थगन प्रस्ताव स्वीकारला की नाही हे स्पष्टपणे सांगावे. स्थगन प्रस्ताव स्वीकारला नाही तर सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. सभाध्यक्ष शिर्के यांनी त्यांना खुर्चीवर बसण्याचे आवाहन केले. काही वेळाने मिठारी आसनस्थ झाले. कुलगुरू शिर्के यांनी, ‘चर्चेविना हा स्थगन प्रस्ताव स्वीकारण्यात येत असल्याचे घोषित केले. यानंतर गोंधळाची स्थिती संपली. (Shivaji University)
सभागृहात भिरकावली निषेधाचे पत्रके
विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी करणाऱ्यांचा निषेध नोंदविण्यासाठी सिनेटमधील बहुसंख्य सदस्यांनी, ‘आमचं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ असा मजकूर लिहिलेले टी शर्ट परिधान केले होते. तसेच नामविस्ताराच्या निषेधार्थ काळया फिती बांधल्या होत्या. सदस्य मिठारी यांनी नामविस्ताराच्या मागणीचा निषेध करणारी पत्रके भिरकावली. ‘राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली. तसेच राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकरच निषेध असो,’ अशा घोषणाही दिल्या. आम्ही विद्यापीठाचा नामविस्तार होऊ देणार नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत शिवाजी विद्यापीठ हेच नाव राहील, अशा शब्दांत त्यांनी ठणकावले. (Shivaji University)
विद्यापीठ स्थापनेत बाळासाहेब देसाईंचा पुढाकार
छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांनी कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ व्हावे असा विचार १९३४ ला मांडला होता. हा विचार अस्तित्वात यायला १९६८ साल उजडावे लागले. विद्यापीठ स्थापनेसाठी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, तत्कालीन शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई यांचे मोठे योगदान आहे. बाळासाहेब देसाई हे डॉ. बाळकृष्ण यांचे विद्यार्थी होते. त्यामुळे कराड आणि सांगलीऐवजी विद्यापीठ कोल्हापुरात स्थापन व्हावे यासाठी जोरदार प्रयत्न केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवाजी विद्यापीठाचा ठराव मंजूर होणार होता. त्यादिवशी आजारी असूनही अंगावर शाल पांघरुन ते बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्यासमोर जोरदार युक्तिवाद करुन कोल्हापुरातच शिवाजी विद्यापीठ झाले पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. आपली मागणी नामंजूर झाली तर मंत्रिपदाचा राजीनामा देणार, असा इशाराही त्यांनी दिला. देसाई यांच्या ठाम भूमिकेमुळे कोल्हापुरात विद्यापीठ स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. (Shivaji University)
‘शिवाजी विद्यापीठ’ नाव : पार्श्वभूमी
शिवाजी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्राचार्य सी. आर. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत विद्यापीठाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे करायचे की शिवाजी विद्यापीठ असे करायचे यावर मतमतांतरे होती. कोल्हापूरचे तत्कालीन आमदार बराले यांनी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नाव द्यावे, अशी मागणी केली होती. पण या नावाचा शॉर्ट फॉर्म ‘सी.एस.एम.यू’ असा होऊन शिवरायांचे नाव हरवण्याची शक्यता असल्याने ‘शिवाजी विद्यापीठ’ नाव असावे यासाठी मुख्यमंत्री चव्हाण यांनी बराले यांचे मन वळवले. बराले यांनीही मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य केली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठ हे नाव संपूर्ण देश-विदेश पातळीवर दुमदुमले. (Shivaji University)
नामविस्ताराला विरोध : सोशल मीडियावरही जोरदार मोहीम
नामविस्ताराला विरोध करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ हेच नाव असावे यासाठी ‘माझं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ ही मोहीम सोशल मीडियावर सुरू होती. विद्यापीठाच्या सिनेटमध्ये विरोध करणारे सदस्य असा मजकूर लिहिलेले टी शर्ट परिधान करुन आले होते. सोशल मीडियावरही ‘माझं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ असे स्टेटस् झळकले होते. (Shivaji University)
हेही वाचा :
सुनीता विल्यम्सची परतीची प्रतिक्षा समीप
विधान परिषदेसाठी भाजपचे तीन उमेदवार जाहीर