पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गृहमंत्री अमित शाह हे कार्यकारी पंतप्रधान असल्यासारखे वागत असल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान मोदी यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तरीही त्यांनी डोळे झाकून अमित शाह यांच्यावर भरवसा ठेवू नये. एके दिवशी ते मीर जाफरसारखा त्यांचा विश्वासघात करतील, असा इशाराही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांना दिला आहे. ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावरून देशाच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा विषय नेमका काय आहे आणि मीर जाफर नेमका कोण होता, हे आपण जाणून घेणार आहोत. (Shah acting Prime Minister)
बंगालच्या उत्तरेकडील भागातील पूरग्रस्त स्थितीचा आढावा घेऊन परतल्यावर ममता बॅनर्जी यांनी कोलकाता विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, भाजप या देशाचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही. इतके घमेंडखोर आणि हुकूमशाही सरकार मी आजवर पाहिलं नाही. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, कुठलीही गोष्ट पर्मनंट नसते. उद्या ते सत्तेत नसतील. (Shah acting Prime Minister)
त्या म्हणाल्या, मतदार यादीसाठी एसआयआरच्या निमित्तानं केंद्रीय निवडणूक आयोग जे काही करतोय ते सगळं अमित शाह यांच्या म्हणण्यानुसार करीत आहे. ते कार्यकारी पंतप्रधान असल्यासाऱखे वागत आहेत. दुर्दैवानं पंतप्रधानांना त्याची सगळी माहिती आहे.
अमित शाह यांची पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. नरेंद्र मोदी वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्त होतील आणि त्यांच्या जागी आपली वर्णी लागेल, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु आपणच तयार केलेल्या ७५ व्या वर्षी निवृत्त होण्याचा नियम मोदींनी गुंडाळून ठेवला. त्यामुळं अमित शाह यांचं स्वप्नं अपुरं राहिलं. त्या स्वप्नपूर्तीसाठी अमित शाह गद्दारी करतील का, हा खरा प्रश्न आहे. कारण ममता बॅनर्जी यांनी अमित शाह यांची मीर जाफरशी तुलना केल्यामुळे मोदींचा विश्वासघात करून अमित शाह पंतप्रधान बनण्याची चर्चा सुरू झाली आहे. (Shah acting Prime Minister)
ममता बॅनर्जी यांनी अमित शाह यांची मीर जाफरशी तुलना केली आहे. हा मीर जाफर नेमका कोण होता आणि त्याची अमित शाह यांच्याशी तुलना करण्याचं कारण काय, हे समजून घेऊया.
मीर जाफरचा जन्म सुमारे १६९१ च्या आसपास दिल्लीत झाला. त्याचं पूर्ण नाव मीर बख्शी अली खान बहादूर असं होतं. तो मूळचा नजफी घराण्यातील होता, जे शिया मुस्लिम कुटुंब होतं. त्याचे वडील सय्यद अहमद नजफी हे मुघल दरबारात प्रभावशाली व्यक्ती होते.
मीर जाफरनं आपल्या कारकिर्दीची सुरुवात मुघल साम्राज्याच्या सैन्यातून केली. त्यानं बंगालच्या नवाब अलिवर्दी खान यांच्या नेतृत्वाखाली सैन्यात महत्त्वाची पदं भूषवली. अनुभव आणि कर्तबगारी यामुळे ता बंगालच्या सैन्याचा प्रमुख कमांडर बनला.
मीर जाफरचं नाव इतिहासात गाजलं ते प्लासीच्या लढाईमुळं. ही लढाई बंगालचा नवाब सिराज-उद-दौला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झाली. सिराज-उद-दौला हा तरुण आणि कणखर नवाब होता, पण त्याच्या आक्रमक धोरणांमुळे बंगालमधील अनेक जहागीरदार आणि सरदार त्याच्यावर नाराज होते. मीर जाफर हा सिराजचा सैन्यप्रमुख होता, पण त्याला सिराजच्या नेतृत्वावर विश्वास नव्हता.
१७५६ मध्ये आजोबा अली वर्दी खान यांच्या मृत्यूनंतर सिराज उद-दौला सिंहासनावर बसला. त्यावेळी सत्ता मिळवण्यासाठी आतुर झालेल्या, मीर जाफरनं सिराज उद-दौलाला पदच्युत करण्याचा कट रचला. सिराज उद-दौलानं बंगालमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या वाढत्या व्यावसायिक आणि राजकीय कारवायांना विरोध केला. १७५६ मध्ये फोर्ट विल्यम येथील ब्रिटिश तटबंदी ताब्यात घेतली. १७५७ च्या सुरुवातीला मद्रासचे ब्रिटिश गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह आणि अॅडमिरल चार्ल्स वॉटसन यांनी कलकत्ता परत मिळवला. याच दरम्यान क्लाइव्हने मीर जाफरशी वाटाघाटी सुरू केल्या. त्यानं फ्रेंचांना बंगालमधून बाहेर काढण्यासाठी ब्रिटिशांशी युती करण्यास सहमती दर्शविली.
प्लासीची लढाई २३ जून १७५७ रोजी सिराज उद-दौलाची राजधानी मुर्शिदाबादजवळील पलाशी या गावी झाली. नवाबाचं ५०,००० सैन्य क्लाइव्हच्या ३,००० सैन्यापेक्षा खूपच जास्त होतं. तरी मीर जाफर आणि त्याच्या सहकारी कटकारस्थानांनी ब्रिटिशांचा विजय निश्चित केला. मीर जाफरच्या नेतृत्वाखालील बहुतेक सैन्यानं युद्धात भाग घेतला नाही. त्यामुळं आणि नवाबाचा लवकर पराभव झाला आणि तो पदच्युत झाला. नंतर त्याला मृत्युदंड देण्यात आला. त्यानंतर मीर जाफरला बंगालचा नवीन नवाब म्हणून स्थापित करण्यात आले. ब्रिटिशांनी मीर जाफरला बंगाल, बिहार आणि ओडिशा प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केलं. मीर जाफर हा ब्रिटिशांच्या हातातलं बाहुलं असलेला नवाब म्हणून ओळखला जाऊ लागला.
मीर जाफर यांनी १७५७ ते १७६० आणि नंतर १७६३ ते १७६५ अशी दोन टप्प्यांत बंगालच्या नवाबपदाची धुरा सांभाळली. मात्र, त्यांचा कारभार हा पूर्णपणे ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली होता. त्याला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची मुभा नव्हती. त्याला ब्रिटिशांना प्रचंड प्रमाणात आर्थिक नजराणे द्यावे लागत होते. मीर जाफरनं बंगालच्या खजिन्यातून ब्रिटिशांना मोठ्या रकमा दिल्या. त्यामुळं बंगालची अर्थव्यवस्था डबघाईला आली त्याच्याविरुद्ध स्थानिक जनतेचा रोष वाढला.
ब्रिटिशांना मीर जाफर यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास नव्हता. त्यामुळे १७६० मध्ये त्याला नवाबपदावरून काढून त्याचा जावई मीर कासिम याला नवाब बनवण्यात आलं. पण मीर कासिमनेही ब्रिटिशांविरुद्ध बंडखोरी केल्याने १७६३ मध्ये मीर जाफरला पुन्हा नवाबपद देण्यात आलं.
मीर जाफर यांचा अंत आणि वारसा
मीर जाफरचा मृत्यू १७ जानेवारी १७६५ ला झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा नजम-उद-दौला बंगालचा नवाब बनला.
मीर जाफरचं नाव भारतीय इतिहासात विश्वासघातकी म्हणून नोंदले गेले आहे. मराठ्यांच्या इतिसाहात सूर्याजी पिसाळ म्हटलं जातं, त्याच प्रमाणं हिंदी आणि उर्दू भाषेत “मीर जाफर” हे नाव आजही विश्वासघाताचं प्रतीक म्हणून वापरलं जातं. मीर जाफरच्या विश्वासघातामुळंच ब्रिटिशांना भारतात आपलं साम्राज्य स्थापण्याचा मार्ग मोकळा झाला, असं मानलं जातं.
मीर जाफरनं रॉबर्ट क्लाइव्हशी केलेला करार गुप्त होता. इतका की तो लिहिताना मीर जाफरनं स्वतःच्या हस्ताक्षरात स्वाक्षरी केली नव्हती, जेणेकरून पुरावा सापडू नये.
एकीकडे तो कर्तबगार सैनिक होता., तर दुसरीकडे स्वार्थ आणि सत्तेच्या लालसेमुळं तो विश्वासघातकी बनला.
मीर जाफरचं जीवन आणि कृती यांनी भारतीय इतिहासाला एक वेगळी दिशा दिली. त्याच्या विश्वासघातामुळं ब्रिटिश साम्राज्यवादाला भारतात पाय रोवण्याची संधी मिळाली. तरीही, त्याचं जीवन हे तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे एक जटिल उदाहरण मानलं जातं. जिथं वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि परकीय शक्तींच्या कुटनैतिक खेळांनी मिळून इतिहासाला आकार दिला.
प्रश्न असा उरतो की, ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्यात कितपत तथ्य आहे ?
अमित शाह मीर जाफर बनू शकतात का? ते नरेंद्र मोदी यांना धोका देऊ शकतात का?
तशी शक्यता अजिबात दिसत नाही. कारण अमित शाह हे मोदींचे हनुमान आहेत. सुमारे तीन दशकांहून अधिक काळ दोघे एकत्र राजकारण करताहेत. दोघांमधील प्रत्येकजण एकमेकांना पूरक आहेत. एक अधिक एक अशी दोघांची ताकद एक और एक ग्यारह नव्हे तर एकसौ ग्यारह होऊ शकते. हे त्यांनाही ठाऊक आहे. त्यांच्यात मतभेद होतील तेव्हा दोघांचेही राजकारण संपुष्टात येईल. त्यामुळे ममता बॅनर्जी म्हणतात, तसे होण्याची शक्यता दिसत नाही.