जमीर काझी : मुंबई : राज्यात कोयता गँग, ड्रग्ज माफिया, रेती माफिया, लँड माफिया, आका यांचे पेव फुटले आहे. गावागावात गुन्हेगारीचे लोण पसरले असून अकोल्यातील काँग्रेस नेते हिदायत पटेल यांची झालेली हत्या हे राज्यातील कायदा सुव्यवस्था किती रसातळाला गेली आहे, याचे उदाहरण आहे. राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री नसल्याचा हा परिणाम आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. या हल्ल्यातील सर्व गुन्हेगारांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी सपकाळ यांनी बुधवारी केली.
अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करून श्रद्धांजली अर्पण करून ते म्हणाले की, ही निवडणूक अमरावती महानगरपालिकेची जशी आहे तशीच राज्यातील इतर २९ महानगरपालिकेची आहे. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत “पैसा फेक तमाशा देख”, हे वगनाट्य सत्ताधारी पक्षाकडून खेळले गेले. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षांच्या हाताचे खेळणे बनून राहिला आहे, प्रशासन सत्ताधाऱ्यांना मदत करत आहे. बोगस मतदान, पैशाचे प्रचंड वाटप सुरु आहे. जे नगरपालिका निवडणुकीत झाले तेच महानगरपालिका निवडणुकीत होत आहे. (Sapkal criticizes the Home Department)
घोडेबाजाराला ऊत आला असून अर्ज मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले जात आहे, दबाव आणला जात आहे असा आरोप करुन हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, बिनविरोध निवडीसाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री गुंडगिरीवर उतरले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष संविधानाचे, सभागृहाचे कस्टोडीयन आहेत पण त्यांच्या घरातील तीन उमेदवार बिनविरोध होण्यासाठी ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर उभे होते, त्यांनी दमदाटची केली,धमक्या दिल्या, त्यांचे वागणे हे विचित्र व विकृत होते. (Sapkal criticizes the Home Department)
‘भाजपा व एमआयएम हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माजी मुख्यमंत्री व भाजपा नेते अशोक चव्हाण हे एमआयएमला उमेदवारी देण्यास सांगत आहेत. एमआयएम ही भाजपीची बी टीम आहे, पत्रकार परिषदेला खासदार बळवंत वानखेडे, प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री सुनिल देशमुख, जिल्हाध्यक्ष बबलू शेखावत, माजी आमदार वीरेंद्र जगताप आदी उपस्थित होते. (Sapkal criticizes the Home Department)