संभल : संभलच्या वादग्रस्त शाही जामा मशिदीसंबंधीचा सर्वेक्षण अहवाल गुरुवारी उत्तर प्रदेश न्यायालयामध्ये सुपूर्द करण्यात आला. न्यायाधीश आदित्य सिंह यांच्या न्यायालयामध्ये अडव्होकेट कमिश्नर रमेशसिंह राघव यांनी हा अहवाल जमा केला. (Sambhal )
संभलमधील जामा मशिदीच्या जागेवर हरिहर मंदिर असल्याचा दावा आहे. या संदर्भात १९ ते २४ नोव्हेंबरदरम्यान सर्वेक्षण करण्यात आले होते. हा अहवाल सर्वोच्च न्यायालयाचे आदेश येईपर्यंत सार्वजनिक करण्यात येणार नसल्याचे न्यायालयातर्फे सांगण्यात आले. जामा मशिदीसंबंधीचा वाद सर्वोच्च न्यायालयप्रविष्ट असल्यामुळे हा अहवाल बंद पाकिटातून सुपूर्द करण्याचे आदेश होते. हा अहवाल ४० ते ४५ पानांचा असून त्यासोबत १२०० छायाचित्रे व व्हिडिओही जमा करण्यात आला. (Sambhal )
हा अहवाल ९ डिसेंबरला न्यायालयापुढे सादर होणे अपेक्षित होते. तथापि, रमेश राघव यांनी प्रकृतीअस्वास्थ्यामुळे न्यायालयाकडून अधिक वेळ मागून घेतला होता. त्यानुसार, न्यायालयाने १५ दिवसांचा अतिरिक्त कालावधी मंजूर केला होता. मात्र, २४ डिसेंबरलाही हा अहवाल सादर होऊ शकला नाही. अखेर, नव्या वर्षामध्ये हा अहवाल न्यायालयात जमा करण्यात आला. या सर्वेक्षणादरम्यान संभलमध्ये काही परिसरात हिंसाचार भडकला होता. याप्रकरणी आतापर्यंत ४० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा :
- भोपाळ दुर्घटनेतील घातक कचरा इंदोरमध्ये हटवण्यासाठी केला ग्रीन कॉरिडॉर
- हॅलो, मी अंतराळात पोहोचलोय!
- मूळ दुखण्यावर चर्चेची तयारी का दाखवत नाही?