नागपूर : प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच चिरंजीव सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. अनिल देशमुख हे शरद पवारांचे कट्टर समर्थक असल्याने सलील देशमुखांच्या राजीनाम्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रकृतीच्या कारणावरुन त्यांनी राजीनामा दिला आहे. (Salil Deshmukh’s resignation)
सलील देशमुखांनी शरद पवारांकडे पाठवला राजीनामा
सलील देशमुख यांच्या राजीनाम्याने नागपूर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठे खिंडार पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. २०२४ च्या निवडणुकीत सलील देशमुख यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ते पराभूतही झाले होते. पण शरद पवार गटाशी एकनिष्ठ राहिले होते. नागपूर जिल्हा, शहर आणि विदर्भात युवकांना संघटित करण्याठी त्यांनी जोरदार तयारी केली होती. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना सलील देशमुखांनी विकास कामांचा धडाका लावला होता. सलील देशमुखांनी आपला राजीनामा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना पाठवला आहे. पत्रात असे म्हटले आहे की, गेल्या वीस बावीस वर्षांपासून राष्ट्रवादी शरद पवारांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी सक्रिय आहे. नागपूर जिल्हा, शहर आणि विदर्भ याठिकाणी प्रामुख्याने युवकांच्या बांधनीसाठी आपण केलेल्या प्रयत्नामध्ये कधी यश, तर कधी अपयश आले. मागील काळात मी नागपूर जिल्हा परिषद सदस्य असताना विकासावर भर देत अनेक मोठी विकास कामे आणि प्रकल्प सातत्यपूर्ण पाठपुरावा करून आपल्या परिसरासाठी आणले. यात आपण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व मंत्र्यांनी व नेत्यांनी भरपूर सहकार्य केले, याचा मला अभिमान आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून माझे आरोग्य योग्य नसल्यामुळे काही दिवस (सहा महीने) मी कार्यरत राहू शकत नाही. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. कृपया माझा राजीनामा स्वीकारावा, अशी विनंती सलील देशमुख यांनी केली आहे. (Salil Deshmukh’s resignation)
अजित पवार, सलील देशमुखांची भेट
मागील काही दिवसापूर्वी सलीम देशमुख आजारी असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले होते. नागपूर दौऱ्यात अजित पवार यांनी सलीम देशमुख यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवार आणि सलील देशमुख यांच्यात जवळीक निर्माण झाल्याची चर्चा होती. पण आता सलीम देशमुख यांनी अचानक आजारपणाचे कारण देऊन राजीनामा दिल्याने ते अजित पवार गटामध्ये जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Salil Deshmukh’s resignation)