जमीर काझी : मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक विकास आणि मुंबईकरांच्या समस्यांवर न लढवता हिंदू -मुस्लिम ध्रुवीकरणाच्या माध्यमातून लढवण्याचा भाजपाचा कुटील डाव आहे. मालवणीला ‘रोहिंग्या–बांगलादेशी’ म्हणून बदनाम करण्याची मोहीम सुरु असून या परिसरातील गरीब कुटुंबांना रोहिंग्या किंवा बांगलादेशी ठरवत एका समुदायाला लक्ष्य केले आहे. बांगलादेशी -रोहिंग्या नावाने हिंदू आणि दलितांच्या घरावर बुलडोझर चालवला गेला आहे, असा गंभीर आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी केला.
राजीव गांधी भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सचिन सावंत यांच्यासह मुंबई काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस, शकील चौधरी, त्याचबरोबर मालवणी येथे मंगल प्रभात लोढा यांच्या आदेशाने घरे तोंडली गेलेले पृथ्वीराज श्रीरंग माने, गंगा नयन्द्रा भालेराव, संगीता झरे, रंजना अनिल ठोंबरे, लक्ष्मी देवेकर व इतर अनेक नागरिकांना समोर आणून भाजपचा ध्रुवीकरणाचा डाव उधळला. (Sachin Sawant)
तक्रारदारांवर पॉस्को, खंडणीचे गुन्हे
सचिन सावंत म्हणाले की, बीएमसी निवडणुकीत विकास, भ्रष्टाचार, पायाभूत सेवांबद्दल बोलायला भाजप घाबरते म्हणून नेहमीप्रमाणे ते हिंदू-मुस्लिम द्वेष उभा करण्याचा घाणेरडा प्रयत्न करत आहेत. यासाठी अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या आमदार अस्लम शेख व मालवणी भागाला त्यांनी लक्ष्य केले आहे. सहपालकमंत्री म्हणून मंगलप्रभात लोढा यांनी अधिकाऱ्यांना झोपड्या पाडण्याचे थेट आदेश दिले. यासंदर्भात तक्रार करण्यासाठी भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांना उभे करण्यात आले. या तक्रारदारावर पॉस्को आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. लोढा यांचा महसूल खात्याशी संबंध नाही, ते पूर्ण पालकमंत्रीही नाहीत तरिही त्यांनी आदेश कसे दिले? ज्या पद्धतीने सातत्याने शासकीय अधिकाऱ्यांना बोलावून आदेश दिले गेले ते पाहता ही तोडक कारवाई पूर्वनियोजित आणि राजकीय दृष्टीकोनातून केली गेली हे स्पष्ट आहे. ही तोडक कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार झाली नाही. जनतेला कागदपत्रे दाखवण्याची संधीही दिली नाही. ही सर्व कारवाई निष्पक्ष झाली नसल्याने सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. तोडक कारवाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे लोढा यांची राज्यपालांनी मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. (Sachin Sawant)
‘रोहिंग्या, बांगलादेशी’ असल्याचा दावा पूर्णपणे खोटा
भाजप “बांगलादेशी-रोहिंग्या” असा प्रचार करत असून झोपड्या पाडण्याच्या कारवाईचा या विषयाशी दूरचा संबंधही नाही. डिपोर्टेशनची अधिकृत प्रक्रिया असते, या प्रक्रियेनुसार, बेकायदेशीर परदेशी नागरिकांना हद्दपार करण्यासाठी फॉरेनिअर अक्ट आणि एफआरआरओ ( फॉरेनिअर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस) प्रक्रियेप्रमाणे टप्पे आहेत: स्थानिक पोलिस, स्पेशल बँच, एफआरआरओ हे व्यक्तीची स्वतंत्र चौकशी करतात. त्यानंतर आधार, वोटर आयडी, रेशन कार्ड, घराचा पुरावा तपासले जाते. नागरिकत्वाबाबत शंका असल्यास एफआरआरओ कडे केस पाठवली जाते त्यानंतर त्या व्यक्तीला स्पष्टीकरण देण्याची संधी देणे बंधनकारक आहे. एफआरआरओ किंवा गृहमंत्रालयच डिटेन्शन, डिपोर्टेशन आदेश देऊ शकते. एफआरआरओ कडे यातील एकही प्रकरण सोपवले गेले नाही यावरून भाजपचा खोटा प्रचार उघड होतो. मागील ११ वर्षापासून केंद्रात भाजपाचे शासन असताना बांगलादेशी- रोहिंग्या भारतात आले कसे? अमित शहा हे कमजोर गृहमंत्री आहेत असे लोढा आणि मुंबई भाजपला म्हणायचे आहे का? असा सवाल सावंत यांनी विचारला आहे. (Sachin Sawant)
हिंदू व दलित नागरिकांच्याही घरांवर बुलडोझर
हिंदू व दलित नागरिकांच्याही घरांवर बुलडोझर. तोडकाम केलल्या भागात केवळ मुस्लिम अवैध रहिवासी होते, हा त्यांचा दावा पूर्णपणे खोटा आहे. या कारवाईत हिंदू व दलितांच्या घरावरही बुलडोझर चालवला आहे हे पत्रकार परिषदेत उपस्थित नागरिकांनी सांगितले. संपूर्ण वस्ती गेले २५ वर्षे अस्तित्वात आहे. या सर्वांना संधी दिली असती तर हे सिद्ध झाले असते म्हणून वैधता सिध्द करण्यासाठी संधीही दिली नाही. यावरून स्पष्ट होते की भाजप केवळ मुस्लिमविरोधी नाही, त्यांचा मुद्दा गरीबांविरोधात आहे. भाजपा हा हिंदू धर्माला विखारी दर्शवून बदनाम करत आहे.अन्यायपूर्ण आणि बेकायदेशीर तोडकामाविरोधात काँग्रेस कायदेशीर व राजकीय दोन्ही पातळ्यांवर निर्णायक लढा देणार आहे. विवाद नव्हे विकास हवा ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले. (Sachin Sawant)