मॉस्को : वृत्तसंस्था : रशियाने गुरुवारी रात्री युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करून संपूर्ण देशाला वीज संकटात टाकले. या हल्ल्यांमध्ये रशियाने ९१ क्षेपणास्त्रे आणि ९७ ड्रोनचा वापर केला. युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करणाऱ्या या हल्ल्यानंतर दहा लाखांहून अधिक लोकांना अंधारात राहण्यास भाग पाडले गेले. रशियाने या हल्ल्याचे वर्णन युक्रेनने अमेरिकन ‘एटीएसीएमएस’ क्षेपणास्त्रांच्या वापरास प्रत्युत्तर म्हणून केले आहे. ही बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे लांब पल्ल्याच्या हल्ल्यात सक्षम आहेत आणि अलीकडेच युक्रेनने रशियन प्रदेशांवर हल्ला करण्यासाठी त्यांचा वापर केला होता.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या हल्ल्यांना ‘पाश्चात्य शस्त्रांचा धोकादायक वापर’ म्हटले आणि रशिया जोरदार प्रत्युत्तर देईल असे सांगितले होते. हल्ल्यापूर्वी पुतिन यांनी कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे पत्रकार परिषदेत सांगितले, की रशिया युक्रेनच्या ‘निर्णय केंद्रांवर’ आणि कीव्हवर नवीन हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्याचा विचार करू शकतो. या धमकीच्या काही तासांनंतर रशियाने युक्रेनच्या ऊर्जा ग्रीड आणि इंधन साठवण केंद्रांवर हल्ला केला. रशियन हल्ल्यात युक्रेनची ऊर्जा यंत्रणा प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आली.
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की बहुतेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वीज निर्मिती आणि वितरण केंद्रे नष्ट करण्यासाठी डागण्यात आली. हल्ल्यामुळे १ दशलक्षाहून अधिक लोक अंधारात आहेत. थंडीच्या काळात वीजपुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. इंधन पुरवठ्यातील व्यत्ययाचा अत्यावश्यक सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. युक्रेनियन हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, १७ भागात तैनात केलेल्या हवाई संरक्षण यंत्रणेने ७६ ड्रोन आणि काही क्षेपणास्त्रे पाडण्यात यश मिळवले, तर उर्वरित क्षेपणास्त्रे आणि ड्रोनमुळे ऊर्जा संयंत्रे आणि नागरी क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले; मात्र मृतांचा नेमका आकडा कळू शकलेला नाही. रशियन हल्ल्यांनंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ‘नाटो’चे सरचिटणीस, ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टार्मर आणि जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्यासह अनेक पाश्चात्य नेत्यांना मदतीचे आवाहन केले. ते म्हणाले, की आमच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हा हल्ला केवळ युक्रेनवरील हल्ला नाही, तर संपूर्ण जगाच्या शांतता प्रयत्नांवर आहे. आम्हाला आणखी मदत हवी आहे. झेलेन्स्कीने अमेरिका आणि युरोपीय महासंघाकडून अतिरिक्त शस्त्रे, हवाई संरक्षण यंत्रणा आणि आर्थिक मदत मागितली आहे.
घातक शस्त्रास्त्रांचा वापर
रशिया आणि युक्रेनमध्ये जवळपास तीन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाचे रूपांतर आता नव्या आणि घातक शस्त्रांच्या शर्यतीत झाले आहे. युक्रेन पाश्चात्य शस्त्रांचा वापर करत असल्याचा दावा रशियाने केला आहे, तर युक्रेनचे म्हणणे आहे, की रशियाचे हल्ले आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांचे उल्लंघन करत आहेत.