जमीर काझी : मुंबई : परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत काँगेसने आघाडीचा धर्म पाळला आहे. मात्र चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)चे ८ नगरसेवक असताना त्यांनी भाजपाला मतदान केले हे राजकीय दृष्टीकोनातून चुकलेले आहे, आणि त्याचे पक्ष पातळीवरून समर्थन केले जाते, काँग्रेसची लाज काढली जाते, या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला. (Role of Thackeray’s group in Chandrapur is wrong)
परभणी महापालिकेत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या सर्व १२ नगरसेवकांनी आज महापौर निवडीत शिवसेना ठाकरेंच्या उमेदवाराला मतदान केले. त्याबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, चंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना (उबाठा) ने जी भूमिका घेतली त्याची सल असण्याची अथवा बदला घेण्याची भूमिका व संस्कृती काँग्रेसची नाही. चंद्रपुरसंदर्भात खासदार संजय राऊत यांच्यासोबत काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा केली होती, काँग्रेसचे नेते शिवसेना (उबाठा) शी सातत्याने संपर्कात होते असे असताना संजय राऊत व त्यांच्या पक्षातील लोकांनी जी वक्तव्ये केली ती चुकीची असून, आघाडी धर्माला शोभणारी नाहीत. वंचित बहुजन आघाडी हा काँग्रेसचा मित्र पक्ष आहे, त्यांचे २ नगरसेवकर गैरहजर राहिले, त्यांना पक्षाने बडतर्फ केले तसेच शहराध्यक्षांवरही कारवाई केली पण उबाठाने मात्र कोणतीच कारवाई केली नाही, उलट त्याचे समर्थन केले, हे काँग्रेस पक्ष कदापी सहन करणार नाही.असे त्यांनी स्पष्ट केले. (Role of Thackeray’s group in Chandrapur is wrong)
परभणीत काँग्रेसचा महापौर करण्यासंदर्भात आमच्याकडे प्रस्ताव होता पण सत्तेसाठी वाट्टेल ते ही काँग्रेस पक्षाची भूमिका नाही. आम्ही सत्तेला लाथाडून आघाडी धर्म पाळला, असेही सपकाळ यांनी सांगितले. (Role of Thackeray’s group in Chandrapur is wrong)