मुंबई : फॉर्मच्या शोधात धडपडणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने पुन्हा मुळापासून तयारीला सुरुवात केली आहे. मंगळवारी रोहित मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये दाखल झाला. या आठवड्यात मुंबई संघाचे वानखेडे स्टेडियमवर सरावसत्र आयोजित करण्यात आले असून त्यांच्यासोबत रोहितही शिबिरात घाम गाळणार आहे. (Rohit Sharma)
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये मुंबईचा यंदाच्या मोसमातील सहावा सामना २३ जानेवारीपासून जम्मू आणि काश्मीरविरुद्ध रंगणार आहे. रोहित या सामन्यात खेळणार का, याविषयी अद्याप स्पष्टता नाही. तथापि, रोहितने शिबिरासाठी उपस्थित राहणे आणि मुंबईचे मुख्य प्रशिक्षक ओंकार साळवी यांच्याशी केलेली चर्चा यांवरून तसे संकेत मिळत आहेत. भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेस सुरुवात होण्यापूर्वी रोहित मुंबईतर्फे किमान एक तरी सामना खेळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई क्रिकेट संघटनेतर्फे (एमसीए) या आठवड्यात पुढील रणजी सामन्याकरिता संघाची घोषणा करण्यात येईल. (Rohit Sharma)
नुकत्याच आटोपलेल्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये रोहितला सपशेल अपयशाचा सामना करावा लागला होता. या दौऱ्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेमध्ये ५ डावांत अवघ्या ३१ धावा करता आल्यामुळे रोहितने अखेरच्या कसोटीत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर, तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचीही चर्चा रंगली होती. तथापि, आपण इतक्यात निवृत्ती घेणार नसल्याचे सांगत रोहितने या चर्चांना पूर्णविराम दिला होता. (Rohit Sharma)
पुढील महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ही महत्त्वाची स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील भारताच्या यशस्वी कामगिरीकरीता रोहितने पुन्हा फॉर्ममध्ये येणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर रोहितने कसून तयारीला सुरुवात केली आहे. मंगळवारी रोहितने सुमारे दोन तास फलंदाजीचा सराव केला. यावेळी भारतीय संघातील माजी खेळाडू व मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेही सरावात सहभागी झाला होता. (Rohit Sharma)
गिल रणजी सामन्यासाठी उपलब्ध
भारताचा फलंदाज शुभमन गिलने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये पंजाबतर्फे खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचे कळवले आहे. यंदाच्या रणजी मोसमातील पंजाबचा सहावा सामना कर्नाटकविरुद्ध २३ जानेवारीपासून बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. इंग्लंडविरुद्ध २२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी गिलला भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे, रणजी सामन्यात खेळण्यासाठी तो उपलब्ध असेल.
Rohit Sharma is back where it all began—training with the Mumbai Ranji team! 🏏 Preparation, passion, and focus in full swing.#RohitSharma pic.twitter.com/DWhqzyS1os
— Star Sports (@StarSportsIndia) January 14, 2025
हेही वाचा :
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिका संघ जाहीर