सिडनी : मागील काही कसोटींमध्ये सातत्याने अपयशी ठरत असलेला भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील सिडनी येथे अखेरची कसोटी पार पडल्यानंतर रोहित निवृत्तीची घोषणा करू शकतो, असे वृत्त आहे. (Rohit Sharma)
कर्णधार आणि फलंदाज म्हणूनही रोहित सध्या टिकाकारांच्या रडारवरती आहे. न्यूझीलंडविरुद्धची मायदेशातील मालिका ०-३ अशी गमावल्यानंतर त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. सध्या सुरू असणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत भारताचा एकमेव विजय हा रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली मिळालेला आहे. ॲडलेड येथे दुसऱ्या कसोटीत परतल्यानंतरची रोहितची कर्णधार म्हणून तीन कसोटींमधील कामगिरी ही दोन पराभव व एक अनिर्णित अशी आहे. एकाच मोसमात पाच कसोटी सामने गमावणारा रोहित हा भारताचा केवळ दुसराच कर्णधार ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली १९९९ मध्ये भारताने एकाच मोसमात पाच कसोटींमध्ये पराभव पत्करले होते. (Rohit Sharma)
मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरी गाठण्याच्या भारताच्या आशा धुसर बनल्या आहेत. भारताने सिडनी कसोटी जिंकली, तरीही संघाला ऑस्ट्रेलिया-श्रीलंका कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. अशातच फलंदाज म्हणूनही रोहित शर्मा सातत्याने अपयशी ठरतो आहे. या मोसमात रोहितला आतापर्यंत आठ कसोटींमध्ये केवळ एक अर्धशतक झळकावता आले आहे. मोसमातील त्याची सरासरी १०.९३ इतकी कमी आहे. यंदाच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये त्याला तीन कसोटींतील सहा डावांमध्ये मिळून केवळ ३१ धावा करता आल्या आहेत. ॲडलेड व ब्रिस्बेन कसोटीत रोहित सहाव्या स्थानी फलंदाजीस आला होता. मेलबर्नला रोहितने पुन्हा सलामीला येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अगोदरच्या कसोटींमध्ये सलामीला प्रभावी कामगिरी करणाऱ्या लोकेश राहुलला तिसऱ्या स्थानी फलंदाजीस यावे लागले, तर शुभमन गिलला संघाबाहेर राहावे लागले. (Rohit Sharma)
या सर्व पार्श्वभूमीवर क्रिकेटप्रेमींबरोबरच क्रिकेटतज्ज्ञही रोहितच्या निवृत्तीची चर्चा करू लागले आहेत. फलंदाज म्हणून रोहितच्या पायांची हालचाल मंदावली असून त्याच्या फटक्यातील सफाईही दिसून येत नाही. कर्णधार म्हणूनही त्याच्या नेतृत्वात कल्पकतेचा अभाव आहे. त्यामुळे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रोहितची कर्णधारपदावरून हकालपट्टी करत त्याला संघातून डच्चू देण्यापूर्वी रोहितसमोर सन्मानाने निवृत्त होण्याचा पर्याय आहे. परिणामी, सिडनी कसोटीनंतर रोहित निवृत्तीची घोषणा करू शकतो. हा सामना जिंकला तरीही रोहित विजयासह सन्मानाने कसोटीला अलविदा करू शकतो. फेब्रुवारीत चॅम्पियन्स ट्रॉफी ही महत्त्वाची स्पर्धा असल्याने त्यापूर्वी कसोटीचे ओझे उतरवल्यास रोहित पुन्हा नव्या जोमाने ‘वन-डे’मध्ये भारताचे नेतृत्व करू शकेल. (Rohit Sharma)
हेही वाचा :
- बुमराह, नितीश झळकले ‘एमसीजी’च्या सन्मानफलकावर
- आयुषने मोडला यशस्वी जैस्वालचा विश्वविक्रम
- न्यूझीलंडची विजयी आघाडी