मुंबई : भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रंगणारी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका अवघ्या दहा दिवसांवर आली असली, तरी अद्याप भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याबाबत स्पष्टता नाही. दरम्यान, रोहित सध्या मुंबईत रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथे सराव करत आहे.
मालिकेतील पहिली कसोटी पर्थ येथे रंगणार असून भारतीय संघाने बुधवारी पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर सराव सुरू केला. तथापि, रोहित या कसोटीमध्ये खेळण्याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. रोहितने वैयक्तिक कारणास्तव सुट्टी घेतली आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी रोहित पहिल्या कसोटीत खेळण्याची आशा व्य्क्त केली होती. तथापि, तसे न घडल्यास जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करेल आणि लोकेश राहुल व अभिमन्यू ईश्वरन यांच्यापैकी एकजण रोहितऐवजी सलामीस फलंदाजी करेल, असेही गंभीर यांनी स्पष्ट केले होते.