नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या काही दिवस आधीच ७० लाख मतदार वाढले कसे, याचे उत्तर अद्याप आम्हाला मिळालेले नाही. महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे ही माहिती मागवली. तथापि, अद्याप ती दिलेली नाही. ७० लाख मतदार म्हणजे अख्खा हिमाचल प्रदेश! मतदार यादीत एवढी मोठी तफावत कशी काय, याचे उत्तर मिळाले पाहिजे, याचा पुनरुच्चार लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी केला. (Rahul slams EC)
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावरील चर्चेत भाग घेताना ते बोलत होते. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांनंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे घुसडल्याचा आरोप खासदार गांधी यांनी यावेळी केला.
निवडणूक आयोगाने पारदर्शीपणे मतदार यादीचा डेटा महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना उपलब्ध करून दिला पाहिजे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) या आघाडीतील पक्षांचा उल्लेख राहुल गांधी यांनी यावेळी केला. (Rahul slams EC)
दरम्यान, खासदार गांधी यांनी लोकसभेत केलेल्या टिपण्णीवर निवडणूक आयोगाकडून तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही, परंतु राज्याच्या यादीत मतदारांची अनियंत्रित भर घातली किंवा काही हटवण्यात आल्याची शक्यता नाकारण्यात आली.
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी गांधी यांचे वक्तव्य निराधार असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य पूर्णपणे खोटे आणि निराधार आहे. प्रत्येक यादी निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाइटवर अपलोड केली होती, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. (Rahul slams EC)
नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, मविआने ने २८८ विधानसभा जागांपैकी फक्त ५० जागा मिळवल्या. शिवसेनेने (ठाकरे गट) 20, काँग्रेसला १६, आणि राष्ट्रवादीने (शरद पवार) १० जागा जिंकल्या. उर्वरित दोन जागा अपक्ष आणि एक एआयएमआयएमच्या वाट्याला गेली. भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महायुतीने २३५ जागा जिंकल्या. त्यांपैकी भाजपने १३२, शिवसेनेला ५७, राष्ट्रवादीला ४१ आणि इतरांना पाच जागा मिळाल्या.
हेही वाचा :