मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ३० डिसेंबरला विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धमकावून अर्ज भरु दिले नाहीत. अशी तक्रार शिवसेना-मनसे युतीचे उमेदवार बबन महाडिक आणि आपछया प्रवक्त्या प्रीती मेनन शर्मा यांनी केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या तक्राराची दखल घेऊन मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि मुंबई जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (Rahul Narvekar’s threats. BMC election)
निवडणूक कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून अहवाल तयार केला जाणार आहे. परंतु मागच्या दोन दिवापासून सीसीटीव्ही फुटेज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. या फुटेजमधील काही भाग गायब केल्याचा आरोप आपच्या प्रिती मेनन यांनी केला आहे.
नार्वेकरांच्या तीन नातेवाईकांचे अर्ज दाखल
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कुलाबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २२५, २२६ आणि २२७ या तीन प्रभागातून राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करतेवेळी राहुल नार्वेकर उपस्थित होते. यावेळी तीन प्रभागांतील अन्य उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा तसेच सभागृहात धमकावल्याचा आरोप इतर पक्षांच्या उमेदवारांनी केला आहे. तसेच निवडणूक अधिकारी कृष्णा जाधव यांच्यावर दबाव टाकून सायंकाळी पाच वाजेच्या आत कार्यालयात उपस्थित असूनही इतर उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास मनाई केल्याचा आरोपही उमेदवारांनी केला आहे. (Rahul Narvekar’s threats. BMC election)
आपच्या डिकास्टांना फॉर्म भरु दिला नाही.
वॉर्ड २२७ मध्ये आपच्या उमेदवार मार्गारेट डिकास्टा यांना साडेचार वाजता उमेदवारीचे पैसे स्वीकारुन पावतीही देण्यात आली. मात्र, राहुल नार्वेकर यांच्या सांगण्यावरून त्यांना उमेवारी अर्ज भरू दिला नाही. तर, वॉर्ड २२५ मध्ये आपचे उमेदवार दिपक सिलान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात असताना त्यांनाही फॉर्म भरु दिला नाही. निवडणूक अधिकारी कृष्णा जाधव यांना वारंवार पोलीस तसेच महापालिका कार्यालयातून फोन येत असताना कुणाचाही फोन घ्यायचे नाही असा दम नार्वेकरांनी भरला. यावेळी नार्वेकरांसोबत डझनभर माणसे होते. या सगळ्याचे सीसीटीव्ही मिळावेत व मार्गारेट डिकास्टा यांचा अर्ज भरुन घ्यावा अशी मागणी आहे. अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागू, असे प्रीती मेनन-शर्मा यांनी सांगितले. (Rahul Narvekar’s threats. BMC election)
राज्य निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश
इतर उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवून नार्वेकर यांना त्यांच्या नातेवाईकांना बिनविरोध निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असा आरोप माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी केला आहे.राज्य निवडणूक आयोगाने या तक्रारींची दखल घेऊन मुंबई महापालिका आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. सभागृहात अर्ज दाखल करतानाचा उमेदवारांचा व्हिडिओ, उमेदवारांसोबत कोण कोण उपस्थित होते, राहुल नार्वेकर कशासाठी आले होते, नार्वेकर यांनी खरोखरच उमेदवारांना धमकावले काय, तसे असेल तर निवडणूक निर्णय अधिकार्याने कोणती खबरदारी घेतली, नसेल तर कार्यवाही का केली नाही, आदी मुद्दे विचारात घेतले जाऊन त्यासंदर्भात निवडणूक अधिकार्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.वास्तविक उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारासोबत सभागृहात जाताना केवळ उमेदवारी अर्जावर सूचक आणि अनुमोदक असलेली व्यक्ती, पोलिंग एजंट असे दोनच व्यक्ती जाऊ शकतात. त्यामुळे राहुल नार्वेकर सभागृहात कशासाठी गेले होते, याचीही चौकशी केली जाणार आहे.
बिनबुडाचे आरोप करु नयेत, नार्वेकरांचा इशारा
प्रीती मेनन-शर्मा यांच्या आरोपावर बोलताना राहुल नार्वेकर यांनी म्हटले की, कुठल्याही उमेदवारासोबत त्याचे दोन प्रतिनिधी निवडणूक कार्यालयात जाऊ शकतात. मी कुलाबा विधानसभा मतदारसंघाचा विद्यमान आमदारही आहे. त्यामुळे माझ्या उपस्थितीवर कुणाला आक्षेप घेण्याचे कारण नाही. मी कुणाला धमकावले असेल, तर कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे. त्यातून सर्व सत्य बाहेर येईल. त्यामुळे उगीच बिनबुडाचे आरोप करू नये, असा इशारा राहुल नार्वेकर यांनी दिला.