Home » Blog » जाहीर प्रचाराचा धुरळा बंद, आता रात्रीस खेळ सुरु…..

जाहीर प्रचाराचा धुरळा बंद, आता रात्रीस खेळ सुरु…..

जाहीर प्रचाराचा धुरळा बंद, आता रात्रीस खेळ सुरु…..

by प्रतिनिधी
0 comments
One Nation One Election

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रॅलीतून शक्तीप्रदर्शन, पदयात्रा, कोपरा सभा घेण्याचा आटोकाट प्रयत्न केल्यानंतर सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रचार थांबला. आता मतदानाची जुळवाजुळव करण्यासाठी घडामोडी सुरू झाल्या असून नाराजांना आपल्या गटात ओढण्याबरोबर सर्वसामान्य मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी ‘रात्रीस खेळ सुरू’ प्रयोगाचा अंक सुरू झाला आहे.

दीपावली संपल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी पायाला भिंगऱ्या लावत प्रचाराचा धुरळा उडवला होता. जिल्ह्यात गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, राष्ट्रवादीचे संस्थापक खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभांनी वातावरण ढवळून निघाले. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. पाठिंब्यासाठी शह काटशहाचे राजकारणही रंगले. पदयात्रा, कोपरा सभा, मेळावे, मिसळ पे चर्चा, मान्यवरांची व्याख्यानांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कसलीच कसर मागे ठेवली नाही.

आज सोमवारी शेवटच्या दिवशी सकाळपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत पदयात्रांनी जिल्हा दुमदुमुन गेला. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी मोठी बाईक रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात प्रचार फेऱ्या काढून मतदारांना आवाहन केले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार ऋतुराज पाटील यांनी ग्रामीण भागासह शहरातील उपनगरात पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात नेते व कार्यकर्त्यांनी जाहीर प्रचाराद्वारे मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. सायंकाळी सहा वाजेर्पंत रिक्षा आणि वाहनातून स्पीकरवरुन उमेदवारांनी प्रचार केला आणि त्यानंतर प्रचार थांबला.

सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रचार थंडावल्यानंतर बुधवारी (दि २३) रोजी होणाऱ्या मतदानाची तयारी सुरू झाली. प्रचारकार्यालयातून मतदान केंद्रानुसार बूथवरील कार्यकर्त्यांना मतदार याद्यांचे वाटप करण्यात आले. मतदान केंद्रात बसणाऱ्या पोलिंग एजंटांनी कोणत्या खबरदारी घ्याव्यात याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या भागात मतदान कमी आहे तेथील नाराज कार्यकर्ते, मंडळांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. कार्यकर्ते आणि मतदारांसाठी मंगळवारी जेवणावळींचेही आयोजन करण्यात आले आहे. युवा कार्यकर्त्यांना हॉटेलमधील जेवणाच्या पासेसचे वाटप करण्यात आले आहे. दुसऱ्या फळीतील नेते आणि कायकर्त्यांना अमिष दाखवण्याबरोबर भविष्यातील राजकारणांसाठी शब्दही दिले जात आहे. ग्रामीण भागात माजी पंचायत समिती आणि माजी जिल्हा परिषद सदस्यांना मोठी मागणी वाढली आहे. आपल्या गटातील नेता दुसऱ्या गटात जाऊ नये यासाठी नजर ठेवण्याचे काम नेते मंडळींनी विश्वासू सहकाऱ्यांवर सोपवले आहे. एकदंरीत रात्र वैऱ्याचीआहे या न्यायानुसार उमेदवार आणि प्रमुख कार्यकर्ते दक्ष राहिले आहेत.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00