Home » Blog » Pro-Hockey : नेदरलँड्सची भारतावर मात

Pro-Hockey : नेदरलँड्सची भारतावर मात

प्रो-हॉकी लीगमध्ये भारतीय महिलांचा चौथा पराभव

by प्रतिनिधी
0 comments
Pro-Hockey

भुवनेश्वर : मिळालेल्या संधींचा लाभ उठवता न आल्यामुळे भारतीय महिला संघाला प्रो-हॉकी लीगमध्ये सोमवारी नेदरलँड्सविरुद्ध २-४ असा पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेमधील भारतीय महिलांचा हा चौथा पराभव असून गुणतक्त्यात भारतीय संघ सातव्या स्थानावर आहे. ऑलिंपिक सुवर्णपदक आणि वर्ल्ड कपविजेता नेदरलँड्सचा संघ मात्र या विजयासह गुणतक्त्यामध्ये अग्रस्थानी पोहोचला आहे. (Pro-Hockey)

कलिंगा स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे. मागच्या सामन्यात भारताने जागतिक क्रमवारीत वरचढ असणाऱ्या जर्मनीला पराभूत केले होते. त्यामुळे, नेदरलँडविरुद्धही भारताकडून चांगल्या खेळाच्या अपेक्षा होत्या. मात्र, पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यामध्ये भारतीय संघ या सामन्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला. भारताला या सामन्यात तब्बल १७ पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. तथापि, केवळ उदिताच्या दोन गोलचा अपवाद वगळल्यास अन्य पेनल्टी कॉर्नर भारताने वाया घालवले. (Pro-Hockey)

सामन्याच्या पहिल्याच सत्रात नेदरलँड्सच्या एमा रिजनेनने सातव्या मिनिटास गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर, दुसऱ्या सत्रामध्ये १९ व्या मिनिटास उदिताने पेनल्टी कॉर्नरवर भारतातर्फे बरोबरीचा गोल केला. तिसऱ्या सत्रामध्ये फेलिस अल्बर्सने पेनल्टी कॉर्नरवर, तर फे व्हॅन डेर एल्स्टने मैदानी गोल करून नेदरलँड्सची आघाडी ३-१ अशी वाढवली होती. याच सत्रामध्ये ४२ व्या मिनिटास उदिताने पेनल्टी कॉर्नरवर भारताचा दुसरा गोल केला. अखेरच्या सत्राच्या सुरुवातीलाच ४६ व्या मिनिटास फेलिस अल्बर्सने सामन्यातील वैयक्तिक दुसरा, तर संघाचा चौथा गोल नोंदवला. त्यानंतर, अखेरपर्यंत भारताने गोलसाठी प्रयत्न केले. परंतु, गोल करण्यात यश न आल्यामुळे अखेर भारत २-४ अशा फरकाने पराभूत झाला. (Pro-Hockey) भारताची अनुभवी गोलरक्षक सविता पुनियाचा हा ३०० वा आंतरराष्ट्रीय सामना होता. कारकिर्दीमध्ये ३०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ती वंदना कटारियानंतरची केवळ दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली. त्याचप्रमाणे, पी. आर. श्रीजेशनंतर ३०० सामन्यांचा टप्पा पार करणारी ती दुसरी भारतीय गोलरक्षक ठरली.

हेही वाचा :

‘मला आता लय सापडतेय’

भारताने पाकला नमवले

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00