कोल्हापूर : प्रतिनिधी : ’काश्मीर फाईल्स’, ‘केरळा फाईल्स’ सारख्या प्रपोगंडा बेस्ड फिल्मसवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही. मग ‘फुले’वरच आक्षेप कशासाठी?, असा सवाल करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सेन्सॉर बोर्डवर टीका केली आहे. सेन्सॉर बोर्डाने ‘फुले’ चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त होणारे ‘फुले’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबले आहे. ११ एप्रिल ऐवजी हा चित्रपट आता २५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. सेन्सॉरच्या या कृतीविरुध्द संतापाची लाट उसळली आहे. सेन्सॉरच्या कृतीवरून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते, अशी टीकाही पाटील यांनी केली आहे. (Phule Cinema)
महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनसंघर्षावर आधारित ‘फुले’ चित्रपट शुक्रवारी ११ रोजी प्रदर्शित होणार होता. या चित्रपटातील काही दृश्यांवर ब्राह्म्ण समाजातील संघटनांनी आक्षेप घेतले आहेत. त्यानंतर सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतले आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘एक्स’वर सेन्सॉर बोर्डाच्या नोटिशीसह आपले मत व्यक्त केले आहे.
जयंत पाटील यांनी पोस्टवर म्हटले आहे, “काश्मीर फाईल्स, केरळा फाईल्स सारख्या प्रपोगंडा बेसड् फिल्मसवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही. मात्र ‘फुले’ सारख्या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. हू इज नामदेव ढसाळ? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर्ड बोर्डात किती विद्वान लोक बसतात याची कल्पना आली होती. पण आता फुले चित्रपटावर आक्षेत घेतला जात आहे. त्यातून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येत आहे.” सेन्सॉर बोर्डाकडून सूचवण्यात आलेल्या बदलांच्या पत्राची प्रत शेअर करत जयंत पाटील यांनी सेन्सॉर बोर्डावर संताप व्यक्त केला आहे. (Phule Cinema)
सेन्सॉर बोर्डाने सावित्रीबाईंवर एक मुलगा शेण फेकतो या दृश्यावर आक्षेप घेतला आहे. तसेच काही संवादावरही आक्षेप घेतले आहेत. संवादामध्ये काही जातींची नावे आहेत. तसेच पेशवाई असती तर… हात पैर अलग करवा देते, अशा संवादावर आक्षेप घेण्यात आले आहेत. (Phule Cinema)
ब्राह्मण महासंघाचा आक्षेप
अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा राव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपटात फक्त ब्राह्मण समाजाबाबत आक्षेपांचे चित्रीकरण नको. फुले यांना ब्राह्मण समाजाने केलेल्या मदतीचाही उल्लेख हवा असे दवे यांचे म्हणणे आहे. सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाल्यावर सावित्रीबाई फुले यांच्यावर एक मुलगा शेण फेकतो यावर पुण्यातील ब्राह्मण महिला संघटनेने आक्षेप घेतला आहे. (Phule Cinema)
हेही वाचा :
‘फुले’ चित्रपटावर ब्राह्मण महासंघाने घेतलेले आक्षेप कितपत योग्य?