Home » Blog » Pawar On sanjay Raut : म्हणून झाली संजय राऊत यांना अटक…

Pawar On sanjay Raut : म्हणून झाली संजय राऊत यांना अटक…

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अटकेसंबंधी केले मत व्यक्त

by प्रतिनिधी
0 comments
Pawar On sanjay Raut

मुंबई :  जिथे अन्याय होतो. अत्याचार होतो, त्याविरुद्ध संजय राऊत अखंड काम करत होते. शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराविरुद्ध ते नेहमीच लिहितात. पत्राचाळीत कष्ट करणारे मध्यमवर्गीय लोक राहत होते. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यांना घरे मिळावी अशी त्यांची मागणी होती. ते संजय राऊतांकडे गेले. त्याच्यामुळे मग यंत्रणांना संधी मिळाली. त्यांच्या नेहमीच्या लिखाणाने दुखावले गेले होते अशा शासकीय यंत्रणेचे, ईडीचे योगदान या प्रकरणात अधिक आहे. राऊतांचा यांचा यात यत्किंचितही संबंध नसताना त्यांना गुतंवले, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. (Pawar On sanjay Raut)

पत्राचाळ प्रकरण हे निमित्त होते मात्र यासंबंधीचे वेगळे कारण त्यांनी सांगितले.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

ईडीने अटक केल्यानंतर १०० हून अधिक दिवस तुरुंगात काढावे लागले होते. या अनुभवावर आधारीत आणि त्यावेळच्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देणारे हे पुस्तक आहे. जावेद अख्तर यांच्या हस्ते या पुस्तकाचे मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यावेळी प्रमुख उपस्थित होते. (Pawar On sanjay Raut)

पवार म्हणाले, महाराष्ट्रात काही लोक चुकीचे काम करत आहेत हे माहीत असताना कारवाई होत नव्हती. खासदार म्हणून राऊतांनी देशाच्या प्रमुखांना पत्र लिहिले. जे लोक शासकीय यंत्रणेशी भ्रष्टाचाराच्या मार्गाने संबंध ठेवातात अशा लोकांमार्फत पैसे कसे गोळा केले जातात याची सविस्तर माहिती त्यांनी केंद्र सरकारला कळवली. त्यात ३० ते ३५ लोक, कंपन्या होत्या. त्यांच्याकडून पैसे काढले गेले. ती रक्कम ५८ कोटीपर्यंत होती. संजय राऊतांकडे ही माहिती आल्यानंतर त्यांनी देशांच्या प्रमुख लोकांना ती लिखित स्वरुपात दिली. त्याचा परिणाम एकच झाला कारवाई झाली नाही. पण त्यांना अटक केली. आणि शंभर दिवस त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.

कुणावर उपकार केले असतील तर ते मोजायचे नसतात : उद्धव ठाकरेंचा टोला

गेल्या काही दिवसांत संजय राऊत यांच्या पुस्तकातील काही प्रसंग चर्चिले जात आहेत. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रसंगाचाही उल्लेख असल्याचे सांगून यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. “मला कुणी अमित शहा तुमच्या घरी आले होते का, बाळासाहेबांनी त्यांना मदत केली होती का, असे विचारले तर मी त्यांना एवढेच सांगेन की, मला आठवत नाही. कारण कोणावर उपकार केले असतील तर ते मोजायचे नसतात, असे आमच्या वाडवडिलांनी सांगितले आहे. उपकारांची फेड कृतज्ञ नियतीने करायची की अपकाराने करायची हे ज्याच्या त्याच्यावर असते. कोणाला मदत करताना असा विचार आपण करू शकत नाहीत.”

संजय राऊत यांना बाद होण्याची भीती नाही : जावेद अख्तर

खासदार संजय राऊत यांना बाद होण्याची कधीही भीती वाटत नाही. ते आयपीएल खेळाडूसारखे आहेत. बॅकफूटवर चेंडू खेळून काढण्यात ते विश्वास ठेवत नाहीत. ते क्रिझमधून बाहेर पडून चौकार आणि षटकार मारतात. त्यांना बाद होण्याची भीती वाटत नाही, असे कौतुकोद्गार ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर यांनी यावेळी काढले. (Pawar On sanjay Raut)

पाकिस्तान ऐवजी नरक निवडेन

मला दोन्ही बाजूचे कट्टरपंथी शिव्या घालतात. एका बाजूचे म्हणतात, तू काफीर आहेस, नरकात जाशील. दुसऱ्या बाजूचे म्हणतात, जिहादी तू पाकिस्तानला निघून जा. माझ्याकडे पाकिस्तान आणि नरक हे दोनच पर्याय असतील तर मी नरकातच जाणे पसंत करेन, असे जावेद अख्तर म्हणाले आहेत. मी १९ वर्षांचा असताना मुंबईत आलो होतो. आज मी जो काही आहे, तो मुंबईमुळेच. हे कर्ज मी सात जन्मात उतरवू शकत नाही, अशी कृतज्ञता व्यक्त करून गेल्या ३० वर्षांत मला चार वेळा मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे. त्यातील तीन वेळा मुल्लांनी दिलेल्या धमक्यामुळे संरक्षण दिले गेले, अशी माहितीही जावेद अख्तर यांनी दिली.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00