मुंबई : प्रतिनिधी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या सहा जणांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. सचिन अंदुरे, वासुदेव सूर्यवंशी, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर, अमित बद्दी आणि भरत कुरणे अशी त्यांची नावे आहेत. हे आरोपी सहा वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहेत. तपास आणि खटल्याच्या कामकाजास जास्त दिवस लागणार असल्याने न्यायाधीश अनिल किलोर यांनी त्यांना जामीन मंजूर केला. दरम्यान हिंदू जनजागरण समितीचा वीरेंद्र तावडे याच्या जामिनावर सुनावणी झाली नाही. (Panasare case)
आरोपींचे वकील सिद्ध विद्या यांनी सांगितले की, सहा आरोपी दीर्घ कारावासात असून त्या कारणास्तव जामीन मंजूर झाला आहे. अजून या खटल्यातील २५० साक्षीदारांची साक्ष व्हायची आहे. त्यामुळे खटला पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे. न्यायालयाने ही बाब लक्षात घेतली. सिद्ध विद्या यांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेच्या अर्जावर सुनावणी झाली नसल्याचे सांगितले.(Panasare case)
फेब्रुवारी २०१५ मध्ये गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा या मॉर्निंग वॉकवरुन घरी परतत असताना त्यांच्यावर सम्राटनगर येथे गोळीबार करण्यात आला. मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर हा हल्ला केला. त्यानंतर पानसरे दाम्पत्याला हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना गोविंदराव पानसरे यांचा मृत्यू झाला.(Panasare case)
पोलिसांनी या गुन्ह्यात २०१६ मध्ये हिंदू जनजागरण समितीचा पदाधिकारी वीरेंद्र तावडे आणि सनानत संस्थेचा साधक समीर गायकवाड या दोघांना अटक करुन त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. २०१९ मध्ये अमोल काळे, वासुदेव सूर्यवशी, अमित दिगवेकर आणि भरत कुरणे या चौघांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी कट आणि शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन असे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान कोल्हापूर जिल्हा न्यायालयात पानसरे हत्या खटल्याची सुनावणी सुरु आहे. साक्षीदार आणि फिर्यादींच्या साक्षी सुरू आहेत. नरेंद्र दाभोळकर, गोविंदराव पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास पोलिसांकडून सुरू असला तरी तीनही हत्येसंदर्भात कोर्टात सुनावणी सुरू आहेत.
हेही वाचा :
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, ३० भाविकांचा मृत्यू
‘इस्रो’चे शतक !
नऊ भारतीयांचा सौदी-अरेबियात मृत्यू