नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या राजीनाम्यानंतर आता भारताला नवीन राष्ट्रपती मिळणार आहेत. निवडणूक आयोगाकडून यासंदर्भात संकेत देण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळी धनकड यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन उपराष्ट्रपती कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे.
७४ वर्षीय धनकड यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये उप राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता. पण सोमवारी अचानक वैद्यकीय कारणांमुळे पदांचा राजीनामा दिला. उप राष्ट्रपतीपदांच्या राजीनाम्यानंतर दोन महिन्यात निवडणूक घ्यावी लागते. पण आज बुधवारी निवडणूक आयोगाने एक निवेदन काढून भारताच्या उपराष्ट्रपतींच्या निवडणूक वेळपत्रकाची घोषणा शक्य तितक्या लवकर केली जाईल, असे म्हटले आहे.
उप राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्य मतदान करतात. दोन्ही सभागृहातील ७९० सदस्य मतदान करतील. लोकसभेचे ५४३ आणि राज्यसभेचे २४५ सदस्य मतदान करणार आहेत. राज्यसभेच्या २४५ सदस्यांमध्ये १२ राष्ट्रपती नियुक्त सदस्य असतात.
उप राष्ट्रपतीपदासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सितारामन, केरळचे राज्यपाल अरिफ खान, केंद्रीय राज्यमंत्री रामनाथ ठाकूर, माजी केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.