-
पंडित जवाहरलाल नेहरू
भारतीय लेखकांनी भाषाभाषांच्या मोठेपणावरून एकमेकांशी वाद घालण्यात शक्ती खर्च करण्यापेक्षा भारतीय भाषा अधिक समृद्ध करण्याकडे लक्ष द्यावे, असे माझे त्यांना आवाहन आहे. आज सांस्कृतिक सहिष्णुतेची गरज आहे. संकुचित सांस्कृतिक वृत्ती आणि एखादी भाषा दुसऱ्या भाषेपेक्षा श्रेष्ठ असण्याच्या मुद्यावरून होणारे वाद राष्ट्राच्या प्रगतीत अडथळा ठरतात. वाङ्मयाच्या भरभराटीकडे एखाद्या राष्ट्राचे दुर्लक्ष झाल्यास कितीही संपत्ती ओतली तरी ती त्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी पोषक ठरू शकत नाही. ( Delhi Sahitya Sammelan )
लोक बौद्धिकदृष्ट्या कुंठित होतील
हिंदी ही भारतीय संघराज्याची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली गेली आहे. मात्र हिंदी भाषेला एका विशेष स्थानावर नेण्याच्या उद्देशाने हे केले गेलेले नाही. वास्तविक केवळ हिंदीच नाही तर देशातील बारा-चौदा प्रमुख भाषांपैकी प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा आहे.( Delhi Sahitya Sammelan )
वाङ्मयीन व्यवहारांअभावी लोक बौद्धिकदृष्ट्या कुंठित होतील. राष्ट्राच्या प्रगतीत साहित्याचा मोठा वाटा असतो. भाषेचा माणसाच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. भूतकाळाकडून मिळवलेले ज्ञान समजून घेण्याचे आणि त्याचे अंतरंग व्यक्त करण्याचे भाषा हे एक साधन आहे.
एखाद्या राष्ट्रातील लोकांच्या भाषेवरून आपण ते राष्ट्र सशक्त आहे की दुर्बल हे आपण सांगू शकतो, असे मिल्टनने म्हटले आहे.
भाषा ही माणसाच्या कृती आणि विचारांचा आरसा असते. भाषेपासूनच इतिहासाची सुरुवात झाली. गतकाळात इतर देशांमध्ये भाषा हे कलहाचे कारण ठरले होते. झारच्या आधिपत्याखालील रशियाने पोलंडवर राज्य करताना पोलिश भाषेवर बंदी घातली होती. पण पोलिश भाषा मरण पावली नाही. उलट त्या भाषेने महान लेखकांना जन्म दिला. जिवंत भाषा चिरस्थायी असते, मग सरकारे काहीही करोत. ( Delhi Sahitya Sammelan )
भाषांचा क्रम लावणे चुकीचे
हिंदी आणि इतर भाषांमध्ये स्पर्धा किंवा कोणताही अहमहमिका असण्याचा प्रश्नच उद्भवू शकत नाही. एका भाषेतील लेखकांनी स्वतःची भाषा विकसित करण्यासाठी धडपडण्याऐवजी दुसरी भाषा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला तर तो वेळ आणि शक्तीचा अक्षम्य अपव्यय असेल. पहिली, दुसरी, तिसरी अशा प्रकारे भाषांचा क्रम लावणेदेखील चुकीचे आहे.( Delhi Sahitya Sammelan )
भाषा लहान, मोठी नसते
खरेतर काही बाबतीत, मराठी, गुजराती किंवा बंगाली हिंदीपेक्षाही सरस असू शकतात. हिंदी भाषा संपूर्ण देशासाठी अधिकृत वापरासाठी म्हणून स्वीकारल्याचा अर्थ असा नाही, की ती इतर भाषांपेक्षा श्रेष्ठ आहे. घटनात्मक तरतुदींमुळे कोणतीही भाषा कधीच मोठी किंवा लहान ठरलेली नाही. भाषा विकसित होते ती स्वतःच्या सामर्थ्याने. समाजाचा विचार करता लेखकांची जबाबदारी मोठी आहे. ते लोकांच्या विचारांना दिशा देतात आणि लोकांना चुकीची दिशा मिळाली तर ते दुर्दैवच म्हणावे लागेल.
पुस्तक ही अशी गोष्ट आहे जी तुमचे मन जागृत करते आणि विचारांना चालना देते. आपण जे वाचू ते आपण आत्मसात केले पाहिजे. खूप पुस्तके वाचली म्हणजे माणूस खूप शहाणा होतो असे नाही. महान युरोपियन विचारवंत आणि तत्त्वज्ञानी डेसिडेरियस इरास्मस (इ.स. १४६६-१५३६) यांच्याकडे केवळ पन्नास पुस्तकांचे ग्रंथालय होते. आम्ही हजारो पुस्तके वाचतो पण आमच्या शहाणपणात फारशी भर पडत नाही, आमची समज सुरुवातीला जेवढी होती तेवढीच राहाते.( Delhi Sahitya Sammelan )
लेखकांना जबाबदारीची जाणीव हवी
लेखकांना आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव असायला हवी, पण लोकांनी आपल्या हुकुमाप्रमाणे वागावे या विचारापासून लेखकांनी स्वतःला दूर ठेवले पाहिजे. वाङ्मय म्हणजे लोकांना विशिष्ट पद्धतीने विचार करण्यास भाग पाडणारी काठी नव्हे. राष्ट्राला विचाराची दिशा दाखवणे एवढेच वाङ्मयाचे काम आहे. या अर्थाने लेखक सशक्त आणि समृद्ध भारताचा पाया रचण्यास मदत करू शकतात. अभियंते आणि लेखक अत्यावश्यक आहेत. त्यांच्याशिवाय देश भौतिक आणि बौद्धिकदृष्ट्या बहरणार नाही. फक्त कार्यालयीन कामे करणाऱ्यांशिवाय एकवेळ जमू शकेल, देशाची प्रगती होत राहील. पण अभियंते आणि साहित्यिकांशिवाय देश पुढे जाणार नाही.
वाङ्मयाच्या ऱ्हासाला वृत्तपत्रे जबाबदार
आज वृत्तपत्रांची संख्या वाढत आहे. वाङ्मयाच्या ऱ्हासाला तीच जबाबदार आहेत. वाङ्मयीन विषयांना महत्त्व देणारी पन्नास वर्षांपूर्वीची फ्रेंच वृत्तपत्रे मला आठवतात. पहिल्या पानावर केवळ वाङ्मयीन विषयच असायच. एवढेच नव्हे तर अग्रभागी असणारा लेखही अनेकदा वाङ्मयीन विषयावर असायचा. दोन दिवसांपूर्वीच्या वर्तमानपत्रात काय वाचले ते सांगा असे आज जर तुम्ही एखाद्याला विचारले, तर मला खात्री आहे, की त्याला ते आठवणार नाही. कारण आजच्या वृत्तपत्रांतून क्षणजीवी बाबींनाच महत्त्व दिले जाते. टेलिव्हिजनच्या बाबतीत (बोलायचे तर); एखाद्या चांगल्या गोष्टीचाही चुकीचा वापर हानिकारक ठरू शकतो.
(नवी दिल्ली येथे १ ऑक्टोबर १९५४रोजी सुरू झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना केलेल्या भाषणातील मुद्द्यांचा गोषवारा.)