नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG मध्ये राजस्थानचा महेश कुमार देशात अव्वल ठरला आहे. मध्य प्रदेशचा उत्कर्ष अवधिया दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. राष्ट्रीय चाचणी संस्थेने शनिवारी (१४ जून) निकाल जाहीर केला. (NEET-UG)
परीक्षा दिलेल्या २२.०९ लाख परीक्षार्थींपैकी १२.३६ लाखांहून अधिक उमेदवार परीक्षेत पात्र ठरले. गेल्या वर्षीच्या तुलनेत (१३.१५) यंदा उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या कमी आहे.
या परीक्षेत महाराष्ट्राच्या कृष्णांग जोशी आणि दिल्लीच्या मृणाल किशोर झा यांनी अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान पटकावले.
मुलींमध्ये दिल्लीची अविका अग्रवाल ही पहिली आली आणि तिने राष्ट्रीय स्तरावर पाचवे स्थान पटकावले.(NEET-UG)
सर्वाधिक पात्रता मिळवणारे उमेदवार उत्तर प्रदेशचे (१.७० लाखांहून अधिक), त्यानंतर महाराष्ट्राचे (१.२५ लाखांहून अधिक) आणि राजस्थानचे (१.१९ लाखांहून अधिक) आहेत.
परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या संख्येच्या बाबतीत राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा-अंडरग्रेजुएट (NEET-UG) ही देशातील सर्वांत मोठी प्रवेश परीक्षा आहे.(NEET-UG)
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) दरवर्षी ही परीक्षा घेते. देशभरात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एकूण १,०८,००० जागा उपलब्ध आहेत. त्यांपैकी सरकारी रुग्णालयांमध्ये सुमारे ५६,००० आणि खाजगी महाविद्यालयांमध्ये सुमारे ५२,००० जागा आहेत.
दंतचिकित्सा, आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध या विषयातील पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते.