सांगली जिल्ह्यातल्या वाळवे तालुक्यातल्या ढवळी या छोट्या गावातल्या सामान्य शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा, वडिल शेतकरी होते. दोघेही अशिक्षित होते. आजोबा – रामजी पाटील प्रतिष्ठित शेतकरी म्हणून त्यांचा गावात लौकिक होता. गावातला कुणाचा तंटा मिटवायचा असेल तर रामजी पाटलांची गरज लोकांना वाटायची. आजोबांना दोन मुलं. घरातला सगळा कारभार त्यांचे आजोबाच बघायचे. वडिल सतत शेतातच असायचे. शेती आणि कष्ट यातच त्यांचा जन्म गेला. (N D PATIL)
पहिलं सामाजिक काम
ढवळी गावात मुसलमानाचं घर नाही. पण गावात पीर आहे. सगळे गावकरी त्याचा उरुस करायचे. त्या उरसाच्या तमाशात गावातल्या दोन गटात तणाव झाला. बसण्याच्या जागेवरून वाद झाला. काही दिवसांनी त्यावरून गावातल्या एका प्रतिष्ठित माणसाचा खून झाला. प्राथमिक शाळेत असलेल्या नारायणच्या मनावर त्याचा परिणाम झाला. गावात आपली काही जबाबदारी आहे, म्हणून त्यांनी पहिलं पाऊल टाकलं आणि ठरवलं की गावात उरुस होऊ द्यायचा नाही. एनडी पाटील यांनी ही कल्पना मांडली तेव्हा ते शाळकरी विद्यार्थी होते. गावात सगळ्यांना भेटून भेटून सांगत होते, कशाला भांडणं करायची. खून झाला आहे. त्यातून सुडाचा प्रवास चालू राहणार. गाव शांत कसं राहणार वगैरे. त्याअर्थानं विचार केला, तर एनडी पाटील याचं पहिलं सार्वजनिक काम कुठलं असेल तर गावानं उरुस बंद केला. दोन्ही गटातील ताणतणाव कमी झाला.(N D PATIL)
सांगली जिल्ह्याची राजकीय क्षेत्रातही मोठी आघाडी होती. क्रांतिसिंह नाना पाटील, शिगावचे रंगराव दादा, पांडू मास्तर, नागनाथअण्णा नायकवडी अशी लढवय्यी मंडळी होती. नाना पाटलांवर दहा हजाराचे बक्षिस होते. पांडू मास्तरावरही पाच हजारांचे बक्षिस होते. अशा सामाजिक जागृतीच्या प्रकाशात एनडी पाटील यांची सार्वजनिक जीवनातली पावलं पडत होती. कौटुंबिक वारसा नसला तरी असा अवतीभवतीच्या वातावरणाचा मोठा परिणाम होत होता.
ना. सी. फडके यांचा निषेध
चुकीच्या गोष्टींचा राग येणे, दांभिकतेची चीड येणे हा एनडी पाटील यांचा स्वभाव तरुणपणापासूनचाच आहे. त्याचमुळे राजाराम कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. ना. सी. फडके यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. प्रा. फडके यांच्याबाबतीत एनडींचे म्हणणे असे होते की, कोल्हापूरच्या वातावरणात अनेक वर्षे राहूनही कोल्हापूरची नस समजून घेऊनही त्यांनी चुकीच्या भूमिका घेतल्या. विशेषतः बहुजन समाजाबद्दल त्यांच्या मनात शुष्क कोरडेपणा होता.
राजाराम कॉलेचचे प्राचार्य असलेल्या डॉ. अप्पासाहेब पवारांची बदली झाली. तत्कालीन ब-याच राजकीय घडामोडी त्याला कारणीभूत होत्या. जिथं शासकीय कॉलेज असेल तिथे बदली होणार, त्यानुसार त्यांची बदली उत्तर गुजरातमध्ये वीसनगरला झाली, एकदम आडबाजूला. तिथे ते रुजू झाले. ना. सी फडके तेव्हा राजाराम कॉलेजमध्येच प्राध्यापक होते. ते तेव्हा झंकार साप्ताहिक चालवत होते. अप्पासाहेब पवारांची बदली झाल्यानंतर झंकारमध्ये त्यांनी अप्पासाहेब पवारांवर गरळ ओकणारा लेख लिहिला. राजाराम कॉलेजची परंपरा वगैरे लिहिली. बाळकृष्णांच्या काळात कॉलेज सर्वोत्तम गणलं जायचं. खर्डेकरांनंतर थोडीफार उतरती कळा लागली. खर्डेकरांच्यानंतर डॉ. पवार या नावाचे गृहस्थ अनेक खटपटी लटपटी करून प्राचार्यपदावर आले. त्यांनी राजाराम कॉलेज हा मराठा विद्यार्थ्यांचा अड्डा बनवला असा मजकूर त्यात होता. मराठा विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी तेवढे स्वतंत्र ठेवण्याचे या गृहस्थांनी बाकी ठेवले होते, असे अप्पासाहेबांबद्दल लिहिले होते.(N D PATIL)
राजाराम कॉलेजमध्ये शेकडो विद्यार्थी होते, परंतु ना. सी. फडके यांच्या लिखाणाचा एनडी पाटील यांना प्रचंड राग आला. त्याचा प्रतिवाद करणारा लेख त्यांनी शं. बा. भोसले यांच्या `लोकसेवक`मध्ये लिहिला. फडक्यांच्या लेखाची आणि त्यातल्या मुद्यांची चिरफाड केली. केवळ लेख लिहूनच थांबले नाहीत, तर फडके यांच्या निषेधाची सभा कोल्हापूरच्या नगरपालिकेच्या हॉलमध्ये घेतली. अप्पासाहेब पवार यांच्याविरोधात लिहिले हे निषेधाचे कारण नव्हते, तर अप्पासाहेब पवारांची बदली झाल्यावर त्यांनी लिहिले, हे कारण होते. अप्पासाहेब कोल्हापुरात असताना लिहिलं असतं तर मला आक्षेप घेण्याचे कारण नव्हते, असे एनडींचे म्हणणे. अप्पासाहेब प्राचार्य असताना फडके म्याव मांजर होते. कधी हुंकार काढला नव्हता. बदली झाल्यावर झंकार निघू लागला याचा त्यांना विशाद वाटत होता. अप्पासाहेबही शिक्षक, फडकेही शिक्षक. परंतु फडके यांनी लिहिलेले आवडले नव्हते म्हणून त्यांनी जाहीर भूमिका घेतली. आपल्या बदली झालेल्या प्राचार्यांच्या बाजूने सध्याच्या प्राध्यापकांच्या विरोधात भूमिका घेतली. निषेध सभेला विद्यार्थी, अनेक प्रतिष्ठित मंडळी आली होती. सगळ्यांनी फडक्यांच्या वर्तनाचा निषेध केला.
डाव्यांच्या एकजुटीचा आग्रह
डाव्या पक्षांची आणि कष्टक-यांसाठी काम करणा-या संघटनांच्या स्वतंत्र राहुट्या हा एनडींची काळजी वाढवणारा विषय होता. सगळ्यांनी एकत्रित लढायला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. असे कष्टकरी समूह एकत्र येण्याची शक्यता दिसली की त्यांना खूप आनंद व्हायचा. मधल्या काळात असे वेगवेगळे घटक एकत्र येऊ लागले तेव्हा त्यांना ती काळ्या ढगाची चंदेरी झालर वाटायला लागली. सारे आदिवासी एकत्र येताहेत. सारे मच्छिमार एकत्र येताहेत. गायरानावर आक्रमण केलेले दलित सगळे एकत्र येताहेत. शेतकरी-शेतमजूर एकत्र येताहेत. आज कमी संख्येने ते एकत्र येत असतील पण आता शेतमजूर-शेतकऱ्यांच्या मधली जागृती वाढायला लागलेली आहे, याबद्दल त्यांना खूप आनंद वाटायचा.
कष्टक-यांच्या या लढ्याला जर सर्व राजकीय पक्षांनी आपली ताकद लावली आणि सर्वांत उपेक्षित जे वर्ग आहेत त्यांचे भिजत पडलेले प्रश्न हे आज जर आम्ही टोकाला आणण्यासाठी ताकद लावली तर वातावरणनिर्मिती होईल आणि त्या वर्गाना एक मायेची ऊब, दिलासा मिळेल, असे ते म्हणायचे. माझ्या प्रश्नासाठी मलाच लढलं पाहिजे असं नाही. माझ्या प्रश्नासाठी लढणाच्या अजून दुस-या काही शक्ती आहेत की ज्या शक्तींची मदत मला उपकारक ठरावी, त्या शक्तीदेखील तो घेऊन लढू शकतो. हे सारे वर्ग एकत्र आले तर एक चांगली शक्ती राज्यकर्त्यांच्या विरोधात उभी राहू शकेल, असे त्यांचे मत होते. पुढे एनरॉनविरोधातला लढा, कोल्हापूरचा टोलविरोधातला लढा यामध्ये त्यांनी अशा सगळ्या शक्तिंना एकत्र आणून लढा यशस्वी करून दाखवला. रायगडच्या सेझविरोधातला लढा हाही त्यांच्या झुंझार वृत्तीचाच निदर्शक होता.
रस्त्यावरचा संघर्ष करूनही, सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी लढे उभारूनही डाव्या शक्तिंना निवडणुकीच्या राजकारणात लोकांनी साथ दिली नाही. त्याबद्दल त्यांच्या मनात खंत होतीच, परंतु ते वास्तव त्यांनी मान्य केले होते. संसदेत किंवा विधिमंडळात डाव्या पक्षांचे प्रतिनिधी नसल्याबद्दल त्यांची कुचेष्टा केली जायची. त्यासंदर्भात एनडी म्हणायचे, तुम्ही कितीही वल्गना केल्या तरी रस्त्यावर बहुमत आमचेच आहे आणि त्या बहुमताच्या जोरावर आम्ही तुम्हाला लोकविरोधी निर्णय मागे घ्यायला भाग पाडू. चित्रही तसेच होते. रस्त्यावरच्या बहुमताच्या बळावर त्यांनी अनेक लढे यशश्वी करून दाखवले.(N D PATIL)
रयत शिक्षण संस्थेवर
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण संस्थेतून पदवीधर झाल्यानंतर एनडी पाटील संस्थेतच काम करायला लागले. पुढे संस्थेचं काम सोडून मुंबईला गिरणी कामगार चळवळीचं काम करायला गेले. कर्मवीर अण्णांनी स्वतः रयत शिक्षण संस्थेवर मेंबर म्हणून त्यांना घेतलं. कर्मवीर अण्णा दवाखान्यात असताना त्यांनी संस्थेला पत्र पाठवून एनडी पाटील यांना संस्थेवर घेण्यास सांगितले, त्यानंतर पाच-सहा दिवसांनी अण्णांचे निधन झाले. एका अर्थाने एनडींसारखा जबाबदार माणूस संस्थेवर आणला आणि मगच त्यांनी जगाचा निरोप घेतला. या घटनेला अनेक अर्थांनी महत्त्व आहे. जर अण्णांनी निधनाच्या आधी पाच-सहा दिवस तसे पत्र लिहिले नसते, तर एनडी पाटील रयत शिक्षण संस्थेवर आले असते का आणि पुढे दीर्घकाळ रयतवर त्यांचा जो नैतिक धाक आणि अधिकार राहिला तो राहिला असता का, असे जर-तरचे अनेक प्रश्न उपस्थित होतात. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून एनडी पाटील यांनी दीर्घकाळ काम केले. कर्मवीर अण्णांनी ज्या चारित्र्यसंपन्न जीवनाचा, शिक्षणाचा आग्रह धरला तो त्यांनी पुढे नेला. रयतची प्रतिमा अधिक उंचावण्याचा प्रयत्न केला.
रस्त्यावरचा संघर्ष
एनडींचं बरंचसं आयुष्य रस्त्यावरच्या संघर्षात गेलं. शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता, नेता या नात्याने अनेक लढ्यात, निदर्शनात, मोर्चात, धरणे धरण्याच्या व घेरावाच्या कार्यक्रमांत भाग घेतला. अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. पोलिसांच्या लाठ्या झेलल्या. अनेक निदर्शनांचे व मोर्चाचे नेतृत्व त्यांनी केले. २८ मार्च १९६९ रोजी मुंबईच्या विधानसभेवर सीमा प्रश्नासाठी म्हणून हजारो लोकांचा मोर्चा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नेण्यात आला होता, त्या मोर्चाचे नेतृत्व एनडींनी केले. पोलिसांनी जारी केलेली बंदीरेषा ओलांडून जाऊन व आपल्या सहकाऱ्यांसह त्यांनी अनेकदा अटक करवून घेतली. अनेक प्रसंगी शांतपणे व कर्तव्यबुद्धीने पोलिसांच्या लाठ्यांचा मार खाल्ला. लढ्यांच्या प्रसंगी हाडाच्या सत्याग्रही कार्यकर्त्याला साजेल असेच वर्तन त्यांनी केले.
महाराष्ट्राच्या विधानसभेवर लाखलाख शेतकरी-शेतमजुरांचे मोर्चे नेले. मात्र राजकीय हेतूने प्रेरित होऊन व्यक्तिगत स्वार्थासाठी अशी आंदोलने त्यांनी कधी केली नाहीत. आजच्या काळात अशी बहुतांश आंदोलने केवळ राजकीय हेतूने केली जातात, तेव्हा एनडींच्या लढ्यांचे वेगळेपण मनावर ठसल्यावाचून राहात नाही.
दुष्काळातला मोर्चा
१९७२च्या दुष्काळातला इस्लामपूर तहसील कचेरीवर काढलेला मोर्चा ही एनडींच्या सार्वजनिक जीवनातली एक महत्त्त्वाची घटना म्हणून नमूद करावी लागेल. त्या काळात ते दुष्काळाची परिस्थिती समजून घेण्यासाठी गावोगावी फिरत होते. ज्या गावातून रोजगार हमी योजनेची कामे चालू होती, त्या कामावर त्या-त्या गावातील स्थानिक मजुरांनाच पुरेसा कामधंदा मिळत नव्हता. बहुसंख्य गावांतून कामेच काढण्यात आली नव्हती. त्यामुळे त्या त्या गावांतील व परिसरातील गरजू लोकांना शासनातर्फे कोणतेही काम मिळाले नव्हते. सुरू केलेली कामे संपण्यापूर्वी नव्या कामांची आखणी केली जात नव्हती. त्यामुळे कामामध्ये खंड पडून मजुरांवर सक्तीची बेकारी लादली जात होती.
अनेक लोक कामाच्या ठिकाणी जाऊनही काम मिळत नसल्याने परत येत होते. अशा सर्वच लोकांना तक्रारी घेऊन बी.डी.ओ. किंवा तहसीलदार यांच्याकडे जाणे शक्य नव्हते. २ ऑक्टोबर १९७२ रोजी सकाळी स्कूटरवरून एनडी एकटेच बावचीला निघाले असताना रस्त्यात अनेक लोक खांद्यावर कुदळी, फावडी टाकून परत गावात येत असताना त्यांना दिसले. चौकशी केली तेव्हा मला समजले की, आष्टा-वाळवा रस्त्यावर कामासाठी गेलेल्या बावचीच्या सुमारे २०० लोकांना ‘काम देता येत नाही’ म्हणून परत पाठविण्यात आले होते. एनडींनी आपली स्कूटर रस्त्याकडेलाच एका वगळीत लावली आणि त्यांच्यापैकी पाच-सहाजणांना कुदळी फावड्यांसहित सोबत घेऊन त्यांची तक्रार बी.डी.ओ. पंचायत समिती, वाळवा यांच्या कानावर घालण्यासाठी १५ मैल पायी चालत इस्लामपूरला गेले.
त्यातूनच पुढे इस्लामपूर तहसील कचेरीवरचा दुष्काळग्रस्तांचा भव्य मोर्चा निघाला. सनदशीर मार्गाने आणि शांततेत निघालेल्या या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार, गोळीबार केला. त्यात तीन तरुणांचा बळी गेला. एनडी पाटील यांचा सख्खा पुतण्या सुरेश, याच्यासह रंगराव पाटलांचा मुलगा राजेंद्र आणि दिलीप निलाखे हा शाळकरी विद्यार्थी असे तिघांचे बळी गेले. पहाडासारख्या एनडींचे हृदय पिळवटून टाकणारी ही घटना होती. ज्या मोर्चाचे आपण नेतृत्व केले. त्या मोर्चावर गोळीबार होऊन काही कोवळे जीव त्यामध्ये निष्कारण बळी पडले, या गोष्टीचा त्यांच्यावर फार मोठा आघात झाला.
हिंसाचाराला ठाम विरोध
अलीकडच्या काळात संघर्षाला हिंसाचाराची जोड दिल्याशिवाय त्याची दखल घेतली जात नाही त्यामुळे समूहांना हिंसेसाठी प्रवृत्त केले जाते. परंतु एनडी पाटील अशा गोष्टींच्या ठाम विरोधात होते. सत्याग्रह शांततेच्या मार्गानेच व्हायला हवा, असा त्यांचा आग्रह असे. चार दगड फेकून काहीतरी बदल होईल, असं मानणाच्यांपैकी ते नव्हते. त्यांचा विश्वास संख्याबळावरच होता. संख्याबळ आणि काम करीत असताना संयम महत्त्वाचा असे ते मानत. आपल्याला जे नैतिक बळ मिळतं ते हिंसक प्रकारानं मिळत नाही, यावर त्यांचा दृढ विश्वास होता.(N D PATIL)
त्यांना या वास्तवाची जाणीव होती की, आपल्यापेक्षा सरकारची दमनशक्ती अधिक आहे. तेव्हा हिंसेला हिंसेनं उत्तर देणं हे काही ठीक नाही. सरकार जेव्हा लाठीहल्ला करते, तेव्हा हिंसेनं त्याला प्रत्युत्तर न देता संख्याबळाच्या आधारानं आपल्या प्रश्नांवर, आपल्या विचारांवर ठाम राहाणं, हे खरे उत्तर असल्याची त्यांची धारणा होती. तुमच्या लाठीहल्ल्याला, गोळीबाराला आम्ही काही भीक घातलेली नाही. आम्ही अजूनही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, हे आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवणं हेच खरं उत्तर. दमनशक्तीचा विचार केला तर आपल्यापेक्षा सरकारकडे दमनशक्ती अधिक आहे, या वास्तवाचे भान त्यांनी कधी सुटू दिले नाही. म्हणून त्याविरुद्धची लढाई सोडली नाही किंवा त्या दमनशक्तिपुढे कधी कच खाल्ली नाही.
एनडींना माहीत होतं की कुठंतरी दगड मारून चळवळ पुढे जात नाही. प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न सुटायचे असतील, चळवळ पुढे न्यायची असेल; तर सोबत विचारानं पक्की असलेली निष्ठावान माणसं असावी लागतात. त्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता विचारांवर पक्की निष्ठा ठेवून एकत्र वाटचाल केली पाहिजे. अशी माणसं सोबत असतील, तर चळवळ करणा-याला भिण्याचं अजिबात कारण नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. हिंसेला हिंसेनं प्रत्युत्तर, हे कुठल्याही प्रश्नावरचं समर्पक उत्तर होत नाही. चळवळीत काम करीत असताना उभ्या आयुष्यात आपण हिंसाचाराचा प्रचार कधीच केला नाही. मी संयमानं चालणारा, संख्याबळावर चालणारा, त्यावर विश्वास ठेवणारा माणूस आहे, असं ते जाहीरपणे सांगत.