Home » Blog » गाणं कुठं सुरू आहे का?

गाणं कुठं सुरू आहे का?

0 comments
  • गणेश मनोहर कुलकर्णी

संगीत ही फार सावकाशपणे बदलत जाणारी कला आहे, असं मानलं जातं. भाषेचा आश्रय घेतलेल्या कला उदाः साहित्यात त्यामानाने जलद बदल होतात. दृश्यकलांवर सुद्धा परिवर्तनाचा परिणाम दिसतो. संगीत ही एक वेगळी भाषा आहे. अनेक शतके आपल्याला एकाच प्रकारचे संगीत ऐकू येते. सध्याच्या काळात संगीतावरचं तंत्रज्ञानाचं आक्रमण टाळता न येण्यासारखं अफाट आहे. याचे धक्के एकवेळ आपण सहनही करू, पण त्या अनुषंगाने होत असलेली पडझड रोखता येणं अशक्य आहे. चांगली माणसं ऐकली न जाणं, त्यांचं गायन-वादन बंद पडणं क्लेषकारक आहे… (Music past and present)

एकदा पं. भीमसेनजींचं बरोड्यात गाणं होतं. त्यावेळी ही इतकी दिग्गज गायक मंडळी देखील फार तामझामचा आग्रह धरत नसत. तर ते बरोडा स्टेशनवर उतरून कार्यक्रम स्थळी टांग्यातून निघाले. त्यावेळी आजच्यासारखी रस्त्यावर गर्दी वगैरे नसायची. कार्यक्रमात गायल्या जाणाऱ्या रागाचा रियाज म्हणून पंडितजींनी काही ताना घ्यायला सुरुवात केली आणि थोड्या वेळाने थांबले. ते ऐकून टांगेवाला म्हणाला, पंडितजी इतना बढिया पुरिया चल रहा था, रूक क्यो गये? ते ऐकून पंडितजी अवाक् झाले. म्हणाले, “आपकी संगीतकी समझदारी तो अच्छी दिख रही है, आप भी कुछ गाना वगैरे सिखते हो क्या?” तर तो नम्रपणे म्हणाला, “नहीं, नहीं मैं फैयाझ खाँसाहब के बगलमेही रहता हूं और सुबह शाम उनका रियाज सुनता रहता हूं शायद इसी वजहसे थोडा बहोत समझ लेता हूं.” त्यावेळी फैयाझ खाँसाहेबांचा ‘आवाज चांगला नाही’ असं बरेच लोक म्हणत असतानाही त्यांची गायकी नावाजली जायची, कारण यांच्या तबकड्या बाजारात सहज उपलब्ध होत्या.

लोकानुनयी रागदारी

या पार्श्वभूमीवर खुर्जा घराण्याचे अल्ताफ हुसेनखाँ म्हणून एक गायक होते. खुर्जा हे उत्तर हिंदुस्थानी घराणं आहे. चार दोन अभ्यासकांशिवाय कोणीही त्या ऐकायला तयार नसतं. लोकांना असलं गाणं-संगीत पचायला जड जातं. अॅज म्युझिक गेट्स मोअर अँड मोअर वॉटर्ड डाऊन, पचत नाही म्हणून हे पातळ (सौम्य) होत असावं. लोकांना कळावं, आवडावं म्हणून सोपं, सोप्पं असं करत जाणारे गायक अशा रीतीने लोकानुनयी होत जातात. श्रोत्यांना शरण जातात. काहीजण त्याला मग धर्माची, भक्तिमार्गाची वगैरे डूब देतात. उगीचच संस्कृत कवनं काढून ती रागांच्या चालीत म्हणतात. व्यक्तिशः मला असं वाटतं की, पं. जसराज हे त्याचं मोठं उदाहरण आहे. (Music past and present)

मी यांच्या बिहागच्या अपार प्रेमात होतो. त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची अनेकदा संधी मिळाली होती. नंतर नंतर त्यांना स्टेजवर दहा-पंधरा जणांना सोबत घेऊन गाताना बघून कधी एकदा उठून जातो, असंच व्हायचं. लोकांना कदाचित राग येईल. पण ज्या लोकांनी पूर्वीची भीमसेनी गायकी ऐकली होती, त्यांनाही भीमसेन जोशींच्या बदलत गेलेल्या गाण्याबद्दल आक्षेप होते. पूर्वीच्या काळी असं होत असे की, एक गायक शिष्य दोन-चार वेगवेगळ्या गुरूंकडे शिकत असे. म्हणजे ‘माझ्या घराण्यातलं शिकवून झालं. आता तू दुसरीकडे जा.’ असं गुरूच सांगे. शिष्य स्वतःचं सर्जन करत. तेवढी कुशाग्रता, तेवढी बुद्धी, स्वतःला विकसित करणं इथे आवश्यक असतं. एकतर आता हे करायला लोकांना वेळही नाही आणि मुळात त्यांची तयारीही नाही. श्रुती आणि इतर बारकाव्यांचा वापर वेगाने नष्ट होत चालला आहे. जाड, भद्दे, ढोबळ असं करण्याकडे कल वाढतोय.

गुलाम अलीच्या गझला खूप नाट्यात्म असतात. म्हणजे, एकदम नाटकीपणा आणला जातो. गाण्यातील व वादनातील कसरत आता महत्त्वाची झाली आहे. कदाचित ही कसरतबाजी तारुण्य, जोश, जीवनाचा उत्सव इत्यादींशी संबंधित आहे; म्हणून याची पकड असेल. परस्परसंबंधच असे आहेत, की सावकाश गाणं, मोठ्या गमकेच्या ताना गाणं हे सगळं गरीब, म्हातारे, खेड्यात राहणारे थोडक्यात, मागासलेपणाशी जुळलेलं आहे. (Music past and

संगीत कलेचे परिवर्तन पर्व

संगीत ही फार सावकाशपणे बदलत जाणारी कला आहे, असं मानलं जातं. भाषेचा आश्रय घेतलेल्या कला उदाः साहित्यात त्यामानाने जलद बदल होतात. दृश्यकलांवर सुद्धा परिवर्तनाचा परिणाम दिसतो. संगीत ही एक वेगळी भाषा आहे. अनेक शतके आपल्याला एकाच प्रकारचे संगीत ऐकू येते. विसाव्या शतकात भारतीय भाषांवर आणि पर्यायाने साहित्यकृतींवर इंग्रजीचा खूप परिणाम झालेला दिसतो. पाश्चात्त्य संगीताचा भारतीय संगीतावर त्यामानाने खूप कमी परिणाम झालेला दिसतो. इंग्रजांची सत्ता आपल्या देशावर होती.

त्यांची परंपरा तपासली, तर असे दिसते की ते काही संगीतवेडे खचितच नव्हते. त्यामुळे साहित्याच्या तुलनेत त्यांनी आपल्याकडील संगीतात फारशी चबढब केलेली दिसत नाही. सुप्रसिद्ध इतिहासकार श्री. के. एन. पण्णीकर यांनी युरोपीय प्रभावांचा एकंदर कालखंड हा १४९७ ते १९४७ असा ४५० वर्षांचा धरला आहे. इतक्या वर्षांचा हा कालखंड असूनही भारतीय संगीत म्हणजे देशी संगीत अचल राहिले. पाश्चात्त्य किंवा युरोपीय संस्कृती आपल्या मानाने उच्च/नीच असं ठरवण्याची गरज नाही. एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, सुरुवातीचा हा काळ (१४९८ साली वास्को-द-गामा भारतीय किनाऱ्याला लागला) पोर्तुगीज संस्कृतीचा काळ होता. इंग्रज, डच आणि फ्रेंच हे पोर्तुगीजांच्या मानाने गौण होते.

जेसुईट (Jesuit) परंपरेचा कर्मठ वारसा सांगणाऱ्या या पोर्तुगीज मंडळींचे संगीत चर्चशी नाते सांगणारे होते. त्यांच्या वाद्यांच्या माध्यमातून त्यांनी ते रुजवायचा थोडाफार प्रयत्न केला. आपल्या भारतीय मंडळींनी ती वाद्यं घेतली आणि थोड्याच काळात आत्मसात केली. ही एक फार वैशिष्ट्यपूर्ण परंपरा किंवा गुणधर्म आपल्यात म्हणजे भारतीयांत आहे. प्रतिपक्षाच्या योजना स्वीकारून थोड्याच काळात सरळ सरळ जिंकायच्या अन् त्यांचं भारतीयीकरण करून टाकायचं ! (Music past and present)

संगीतातलं एक मजेदार उदाहरण म्हणजे, पोर्तुगीजांनी आणलेला की-बोर्ड. चर्चमधील उपासनेसाठी आणलेलं हे वाद्य भारतीयांना सर्वस्वी अपरिचित अशा यंत्रसंस्कृतीतून आलं. मोठ्या अवजड ऑर्गनमध्ये नाना प्रकारच्या सुधारणा होत गेल्या अन् आज अशी परिस्थिती आहे की, हार्मोनियम फक्त भारतातच मिळू शकतो. म्हणजे दुसऱ्यांचा उद्देश असफल करायचा असला किंवा हाणून पाडायचा असला; तर त्यांना आपल्यात सामील करून घेणं हा आपला स्थायीभावच आहे, असं अनेक ठिकाणी जाणवतं. (Music past and present)

बहर सुरांचा

आमचा मुलगा स्वप्निलला जेव्हा व्हायोलिन शिकायची इच्छा झाली, तेव्हा आम्ही पं. मिलिंद रायकरांना जाऊन भेटलो. ते जुन्या गुरू-शिष्य परंपरेत शिकलेले. त्यांना आम्ही किशोरीताईंच्या कार्यक्रमात संगत करताना दुरून बघायचो. त्यांनी स्वप्निलला स्वीकारलंच नव्हे, तर अपार मायेनं शिकवलं. या काळात त्याचं नातं घट्ट होत गेलं. गुरूंची कृपा लाभल्याने इतर अध्ययन करतानाही त्याचा फायदाच झाला. (Music past and

रायकरसरांनी मात्र फार कष्टाने ही विद्या शिकली. सुरूवातीला गोव्यात त्यांचे वडील आणि इतर गुरूकडे शिकल्यानंतर पं. दातार गुरूजींनी त्यांना शिकवलं. मग किशोरीताईंबरोबर त्यांचे सूर जुळले, पण त्यांच्याकडे शिकणं सोपं नव्हतं. एकदा हे सलग दोन-तीन दिवस जाऊ शकले नाहीत, तर ताईंनी यांना चक्क घरातच दोन तास एका कोपऱ्यात उभं करून ठेवल्याची आठवण स्वतः रायकर सर सांगतात.

एकदा असेच भर पावसाचे दिवस. सगळीकडेच पाणी भरलेलं. हे ताईंना फोन करून सांगतात, की आज सगळीकडे पाणी भरलंय, मी घरीच रियाज करतो. त्यावर ताई म्हणतात, असा एकट्याने तुझा रियाज होणार नाही, तू टॅक्सीने ये, मी टॅक्सीचे पैसे देते. हे अगदी गुडघाभर पाण्यातून वाट काढत कसेबसे भर पावसात भिजलेल्या अवस्थेत ताईंकडे पोचले. त्यांना पाहताच ताईंनी लगबगीनं डोकं पुसायला टॉवेल आणून दिला. म्हणाल्या, अरे एवढ्या पावसात येण्याची काय जरूर होती आणि परत घरी पाठवून दिलं. अशी कठोरपणे परीक्षा घेणे आणि तितकीच माया लावणारी ताई गुरू म्हणून लाभणं हे भाग्यच. (Music past and present)

अर्थातच ताईंच्या बरोबरचा रियाजही कडकच असायचा. एकदा एक पलटा यांना शिकवला. म्हणाल्या ५०० वेळा वाजव. यांनी तो हातावर नीट चढवला आणि ताईंना वाजवून वगैरे दाखवला, ताई म्हणाल्या वा, छान जमतंय आता अजून ५०० वेळा परत वाजव म्हणजे, पक्का होऊन जाईल. याच किशोरीताईंनी आम्हाला इतका आनंद त्यांच्या गाण्यातून दिलाय, की विचारता सोय नाही. त्यांच्या अनेक मैफलीत जातीने हजर राहून त्यांचं गाणं ऐकण्याचं भाग्य आम्हाला लाभलंय. आम्ही त्यांच्या इतके प्रेमात पडलो, की ताई गेल्यावर पहिला स्मृती महोत्सव मी डोंबिवलीत केला आणि सलग सात वर्षं पारही पाडला.

ताईंच्या पुस्तकात एक उल्लेख वाचला होता, ताई म्हणतात, की कुर्डी गावातल्या नदीच्या किनाऱ्यावर एकदा असेच बसलेल्या असताना वरून एक फुल वाहत्या नदीत पडलं, टप्पा खाऊन पुढे गेलं आणि त्याक्षणी मला लय काय असते, ते समजलं. मी त्या झाडाचा अधिक शोध घेतला. ते बॅरिग्टोनिया रासिमोसा म्हणजे समुद्री तिवराचाच प्रकार आहे, हे कळल्यावर मी सोसायटीच्या आवारात ते झाड लावले, गेली १३ वर्ष जपलेय, आता हंगामात झाडावर सुरेख लालचुटुक फुलांचे तुरे लटकताना बघतो. ताईंना गाण्यातून आठवत होतोच, पण जाता-येता झाडाकडे बघून त्यांची स्मृती मनात ताजी होते. (Music past and present)

झंकारल्या तारा

एकदा पं. मिलिंद रायकरांच्या गुरू पौर्णिमेच्या कार्यक्रमात व्हायोलिन वाजवताना बरोड्याचे आमचे संगीतप्रेमी मित्र आमच्या मुलावर म्हणजेच स्वप्निलवर लड्डू झाले. ते स्वतः अनेक ओरिजनल व्हायोलिनचा संग्रह हौस म्हणून बाळगून होते. त्यांना त्यातल्या तांत्रिक अंगाची बारकाईने माहिती होती. छोट्या मोठ्या दुरूस्ती करून ते जुनी व्हायोलिन इतरांनाही देतात. तर त्यांनी स्वप्निलला एक व्हायोलिन भेट केलेलं होतं. या ओरिजनल व्हायोलिनची खासियत म्हणजे, ही मेपलच्या झाडाच्या लाकडांपासून बनवली जातात आणि जितकी जुनी होतात तितकी सुरेल वाजायला लागतात. सर्वात महाग आणि सुरेल ही जर्मन व्हायोलिन असतात. (Music past and present)

डोंबिवलीत एकदा ‘महाराष्ट्र टाइम्स’चे ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन आले होते, त्यांनी संपादक गोविंदराव तळवलकरांचा व्यासंग किती थोर आहे याची आठवण सांगितली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण सुरू होते. स्वतः अशोक जैन म.टा.चे दिल्लीतले प्रतिनिधी होते. ते तिथून माहिती देत होते. ट्रंक कॉलचाच जमाना होता. संध्याकाळी हॉटेलवरून यांनी मुंबईत गोविंदरावांना फोन लावला. हे काही बोलण्याअगोदरच गोविंदरावांनी सांगितले की अंत्यसंस्काराच्या वेळी पार्श्वभूमीवर जी धून वाजत होती, ती हँडेलची होती का? जैन हैराण ! एक तर हेंडेल का हँडेल हेच मुदलात माहिती नाही, तर इतर माहिती कशी काढणार. त्यात माजी पंतप्रधानांची हत्या झालेली त्यामुळे वातावरणात एक वेगळा तणाव. अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेत सगळी उच्च पातळीवरची खबरदारी आणि व्यवस्थापन सहभागी, त्यामुळे माहिती कशी मिळवावी हा मोठाच पेच.

अशोक जैनना कुणीतरी सांगितले, की सैन्यदलाच्या जवानांनी ती धून वाजवली होती. हे चाचपडायला लागले, एकेक करत अगदी वरच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला गेला, तेव्हा त्या अधिकाऱ्याने सांगितले, की हो ती धून हँडेलचीच होती. दुसऱ्या दिवशीच्या फक्त ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या अग्रलेखात ही नोंद होती, की माजी पंतप्रधान इंदिरा गांधीजींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पार्श्वभूमीवर जर्मनसंगीतकार हँडेलची धून वाजवली जात होती. अशोक जैन नंतर म्हणाले, की खूप वर्षांनंतर मला जर्मनीला जाण्याचा योग आला, तिथे एका संग्रहालयाच्या बाहेर हँडेलचा पुतळा बघितला आणि त्यांच्या थोरपणाची जाणीव झाली. हँडेल हा प्रसिद्ध जर्मन व्हायोलिन वादक याने पहिल्या किंग जॉर्जच्या विनंतीवरून थेम्स नदीच्या किनाऱ्यावर झालेल्या पहिल्याच (१७ जुलै १७१७) कार्यक्रमात आपलं वॉटर म्युझिक सादर केलं होतं. यात त्यांनी पाण्याचा एखादा थेंब पाण्यावर पडला की कसा आवाज येतो आणि पाण्याचा धबधबा पाण्यावर कोसळताना कसा आवाज येतो याचं ध्वनिबिंब व्हायोलिनवर अचूक टिपलं होतं. (Music past and present)

गंध सुरांचा

तर सध्याच्या काळात संगीतावरचं तंत्रज्ञानाचं आक्रमण टाळता न येण्यासारखं अफाट आहे. याचे धक्के एकवेळ आपण सहनही करू, पण त्या अनुषंगाने होत असलेली पडझड रोखता येणं अशक्य आहे. चांगली माणसं ऐकली न जाणं, त्यांचं गायन-वादन बंद पडणं क्लेषकारक आहे. वाल्मिकी रामायणाचा मल्याळम अनुवाद करणारे श्रेष्ठ आणि जाणते कवी नारायण मेनन (१६ ऑक्टोबर १८७८-१३ मार्च १९५८) यांनी एक सुरेख घटना नोंदवून ठेवली आहे. दक्षिणेत टायगर वरदाचारी नावाचे विद्वान गायक होते आणि वीणा धन्नमल नावाची गायिका. ही स्वतः देवदासी होती, पण हाताने वीणा वाजवत नितांत सुंदर गायची म्हणून तिला वीणा धन्नमल म्हणायचे. तर ही कुठलाही राग तीन मिनिटांपेक्षा जास्त गायची नाही, तिला जेव्हा विचारलं गेलं की असं का ? तर ती म्हणाली मला या पेक्षा अधिक गाण्याची जरुरच वाटत नाही. तर वरदाचारी दोन तासांपेक्षा कमी गायचे नाहीत. त्यांना ऐकणाऱ्या रसिकांना वाटायचं, की हा माणूस जेव्हा दोन तास निवांत गातोय, तेव्हा हा सहा तासही गाऊ शकतो, कारण यांच्याकडे सांगण्यासारखं बरंच आहे.

काही लोक यांच्याजवळ जाऊन म्हणाले, की वीणा धन्नमल तर तीनच मिनिटे गातात आणि तुम्ही तासंतास गाता असं का? तेव्हा विद्वान वरदाचारी म्हणाले की मी माझ्या जवळच्या हजारो एकर पसरलेल्या गुलाबाच्या ताटव्यांमधून तुम्हाला फिरवून आणतो आणि वीणा मात्र या सगळ्या गुलाबांना एकत्र करून त्याचा अर्क काढून त्याचं अत्तरच तुमच्यावर शिंपडते. तात्पर्य, राग हा कितीही वेळ गायला जाऊ शकतो.

पाश्चात्त्य देशातही एरिक साटी (१८६६ ते १९२५) नावाचा एक कंपोजर होता. त्याची एक संपूर्ण चार मूव्हमेंट्स, पार्ट्स असलेली सिंफनी साडेचार मिनिटांची आहे. बेथोवेनसारख्याची नाईथ सिंफनी साठ मिनिटांची आहे. सिंफनीची लांबी किती असावी, याबाबत पाश्चात्त्यांकडे जास्त ताठरपणा आहे. आपल्याकडे रागाच्या बाबतीत त्यामानाने पुष्कळ स्वातंत्र्य आहे, कालसापेक्षता आहे. (Music past and present)

शोध गाण्याचा…

‘पंचम निषाद’चे शशी व्यास एका मुलाखतीत म्हणाले होते, की आजकाल रसिकांची तक्रार असते, की तासाभराचाच वेळ प्रत्येकाला दिला जातो किंवा कधी कधी अनेक मोठ्या कलाकारांना एकत्रच मंचावर बसवलं जातं. यात स्वतंत्र घराण्याच्या गाण्याचा आनंद घेता येत नाही, तेव्हा शशीजी म्हणाले, की आजकाल तीन-तीन तास गाणारे गायकच कुठे आहेत, तुम्ही दाखवा मला, मी उद्या त्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित करतो. जशी जीवनाची गती, त्याप्रमाणे संगीताची गती ठरणार आहे. आजकाल घड्याळ आपल्या मनगटाबर नाही, तर मानगुटीवर बसले आहे. पूर्वीसारखी पुनरावृत्ती आता चालत नाही. पुनरावृत्तीतून जी जाणीव व्हायची, एक वेगळा अर्थ दर वेळी मिळत राहायचा, तो संबोध आज संगीतातून घेण्याची कुवत ऐकणाऱ्याचीही नाही, त्याच्या इतर कामांमुळे हे एका बाजूनं झालं. दुसऱ्या बाजूनं जे त्याला शिकायचंय, ऐकायचंय, जो संबोध त्याला घ्यायचाय, तो घेणारा अत्यंत ग्रहणशील असल्यामुळे तो जास्त वेगानं घेऊ शकतो. त्यामुळे वेळेचं प्रमाण आज बदललं आहे.

भातखंड्यांचं १९३७ सालचं पुस्तक आहे. त्यात ते म्हणतात, ‘आजकाल गायक गायला लागला की, समोरचे प्रेक्षकच हातातील घड्याळाकडे बघतात!’ १९३७ साली ही परिस्थिती होती. हान्स आयझलर (१८९८-१९६२) म्हणून एक मोठा कंपोझर होता, जर्मनीमध्ये. त्याने एके ठिकाणी म्हटलंय, ‘जुनंच संगीत नव्या वाद्यावर वाजवण्यात अर्थ नाही, जुन्या वाद्यांवर नवं संगीत वाजवणं हेच विशेष म्हटलं पाहिजे.’ कारण संगीत म्हणजे विचार आहे, वैचारिक, बौद्धिक प्रक्रिया आहे. जर तुम्ही खरोखरच बुद्धीने काही करत असाल, तर त्यात संगीतातला काही नवा विचार करता येणं आवश्यक आहे. एकंदरीतच संगीताचं जागतिकीकरण अस्वस्थ करणारं आहे गाणं आत सुरू आहे इथपासून आताशा, गाणं कुठं सुरू आहे का? या प्रश्नापर्यंत आपण सारे येऊन ठेपलो आहोत.

आमेन !

(गणेश मनोहर कुलकर्णी हे ‘रूळानुबंध’ या राज्य पुरस्कार प्राप्त पुस्तकाचे लेखक आणि कला आस्वादक आहेत.)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00