Home » Blog » वॅन गॉफ : एक सर्जन शोध (Vincent van Gogh)

वॅन गॉफ : एक सर्जन शोध (Vincent van Gogh)

जपानी चित्रशैलीतले आमंड ब्लासम्स आणि ते साकारणारा मनस्वी व्हॅन गॉफ...

0 comments
  • डॉ. आनंद जोशी

खिडकीतून बाहेर बघितले आणि टंकित हात थबकला. बाहेरच्या झुडुपावर चढलेली आईस्क्रीम वेल बहरली होती. गुलाबी इवलीशी फुले, झुडुपाची हिरवी पाने, काही कोवळी; काही थोडी जून. हिरव्याच्या अनेक छटा गुलाबी इवल्यांसह नुकत्याच उगवलेल्या सूर्याच्या कोवळ्या किरणात खुलून दिसत होत्या. रंगसंगती पाहून वाटले, निसर्गाच्या आविष्कारात सुद्धा एक पोत असतो. रंगांचे ते ताणेबाणे, तंतू-ओतू, उभे आडवे, पाहून माझ्या नजरेने ‘क्लिक’ केले आणि ते ‘सृष्टीचे पेंटिंग’ माझ्या स्मृतीत बंदिस्त झाले. अवकाशातील आकाराला रंगाने आणि रंगाला आकाराने असे काही कवटाळले होते, ते एकमेकांपासून निराळे करणे कठीण. ही रंगकला मी पाहिली आणि रंगकलेचा नुकताच वाचलेला इतिहास डोळ्यांपुढे आला आणि थबकलेला हात परत टंकित झाला… (Vincent van Gogh)

रंग कलेला इतिहास आहे. क्लॉड मॉने (१८४०-१९४६) आणि जॉर्ज सुराह (१८५९-१८९१) या फ्रेंच रंगवंतांनी रंगावर नाजूक प्रयोग केले. रंगाबाबतचे ज्ञान लाजाळू असते, ते या रंग कलाकारांनी हुडकून काढले. हे प्रयोग प्रभावी होते. निसर्गातील ‘रंजक ऊर्जा’ माणसाच्या ‘सायकी’शी बोलते. ती कॅनव्हासवर एकत्रित केली पाहिजे, असे चित्रकारांना वाटू लागले. या निसर्गातील रंजक उर्जेचा शोध घेण्यासाठी पॉल सिनिअॅक (१८६३-१९३५), हेन्री मातिस (१८६९-१९५४), पॉल गॉहगन (१८४८-१९०३) आणि वॅन गॉफ, डच उच्चार वान हॉह (१८५३-१८९०), जणू एकामागोमाग एक साउथ ऑफ फ्रान्सला येऊन गेले होते.

वॅन गॉफला निसर्गातील रंगाचे वेड. या वेडापायी तो साउथ ऑफ फ्रान्सला आला आणि अवघ्या तीन-चार वर्षात त्याने हे रंगाकार कॅन्व्हासवर अजरामर केले आणि स्वतःच स्वतःच्या छातीत गोळी मारून जगाचा निरोप घेतला. त्यावेळी त्याचे वय होते, ३७ आणि साल १८९०. (Vincent van Gogh)

शेतकरी कामकरी

विन्सेंट वॅन गॉफचा जन्म १८५३ सालचा. हॉलंडमधील एका धर्मोपदेशकाच्या कुटुंबातला. सहा भावंडात तो सगळ्यात मोठा. तो हट्टी, अशांत, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारा, रागीट, स्वभावाचा मुलगा असे त्याची नॅनी म्हणत असे. त्याच्या आईचे आणि त्याचे फारसे पटत नसे. वयाच्या १४व्या वर्षी त्याने शाळा सोडली. १८७६ ते १८८० या काळात धार्मिक कथा सांगत उपदेश करत, तो इंग्लंड आणि बेल्जियम येथील गावातून फिरत होता. तेथे त्यांनी खाणकामगार, शेतकरी कामकरी बायका-पुरुष बघितले. तो सुद्धा गरिबीचे जीवन काढत होता.

त्याच सुमारास ज्याँ फ्राँसवा मिलट (१८१४-१८७५) याची शेतकरी जीवनावरची पेंटिंग्ज त्याने पाहिली. तीन बायका ओणव्याने शेतात काम करत आहेत, मिलटचे The gleaners (१८५७) हे पेंटिंग वॅन गॉफने पाहिले होते. यात नाट्य काहीही नाही, साधे ग्रामीण चित्रण. तरीही बॅन गॉफ प्रभावित झाला. त्याने पेंटर होण्याचा निर्णय घेतला. दृश्यकलेचाच नव्हे, तर कोणत्याही ज्ञानशाखेचा इतिहास हा सामाजिक बदलाचा इतिहास असतो. ‘प्रतिष्ठित पेंटिंग हे प्रतिष्ठित माणसे दर्शविणारे असले पाहिजे, तर त्याला प्रतिष्ठा मिळते’, असे युरोपमधील कलेच्या ‘अकादमीत’ शिकवले जायचे. १८४८ ते १८४९ या खंडात युरोपमध्ये सामान्यांची

स्थिती हलाखीची होती, असमानता तर होतीच, उदारमतवादाच्या झुळुका येऊ लागल्या होत्या, लोकांना बदल हवा होता. सिसिली आणि फ्रान्स येथे सुरु झालेली क्रांतीची छोटी लहर जर्मनी, इटली, ऑस्ट्रियन एम्पायर येथे पसरली. (Vincent van Gogh)

त्याच काळात १८४८ मध्ये फ्रान्सच्या बार्बिझन खेडेगावात काही चित्रकार जमले होते. त्यांनी ठरविले आता निसर्गाकडे आणि चिखलात काम करणाऱ्यांकडे स्वच्छ नवनजरेने बघायचे आणि त्यांचे जीवन कॅनव्हासवर रंगवायचे. या समूहात चित्रकार मिलट होता. त्याने जी पेंटिंग्ज केली, ती त्या काळाची प्रातिनिधिक समाजचित्रे म्हणून आजही युरोपातील चित्रसंग्रहालयात पाहावयास मिळतात. या चित्रांचा वॅन गॉफवर खोल परिणाम झाला होता. ही त्याची मीमांसा आहे.

मिलटचे १८५७ सालचे चित्र आणि एकंदरीत मिलटची चित्रकला पाहून वॅन गॉफने चित्रकार होण्याचा निर्णय घेतला. यातला १८५७ हा आकडा पहिल्याबरोबर मी चरकलो, ‘काल’ असा काही विक्राळ हसला, मला आपल्याकडे ब्रिटिशांविरोधात झालेले १८५७चे बंडच दिसू लागले, पण तो विचार बाजूला सारला आणि १८५७च्या आसपास येथील ‘कला शेतात’ काय फुलत होते, हा सुंदर विचार मनात आला. प्रत्येक खंडात काहीतरी सुरेख असतेच. याच काळात भारतात पाश्चात्य पद्धतीच्या कलाशाळा स्थापन झाल्या, मद्रास १८५०, कलकत्ता १८५४, जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई १८५७. ‘स्त्री चित्रकार (१८५७-१९५०)’ लेखिका साधना बहुळकर, राजहंस प्रकाशन, आवृत्ती पहिली नोव्हेंबर २०२१ यात लिहिले आहे, ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील जुन्या कार्यालयीन दप्तरात तेव्हाच्या विद्यार्थिनींची काही ना काही नावे मिळतील.

एका बॅचला साधारण किती विद्यार्थिनी असायच्या याचा अंदाज घ्यावा. त्यासाठी जे. जे. स्कूलचे सध्याचे डीन श्री. विश्वनाथ साबळेसरांना दोनदा फोन. एक-दोन कार्यक्रमांना ते भेटले. त्याही वेळेला माझा अभ्यासाचा विषय व त्यासाठी काही रेकॉर्ड बघणे आहे, हे सांगितले. पूर्वसंमतीसाठी पत्र देऊ का? अशीही विचारणा केली. परंतु पूर्वीच्या विद्यार्थ्यांचे हजेरीपट, अॅडमिशन फीचे काही रेकॉर्ड किंवा रिझल्ट्स हे काहीच उपलब्ध नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले’ असे असून सुद्धा लेखिकेने मेहनती संशोधनाने माहितीपूर्ण पुस्तक सिद्ध केले आहे. त्यानंतर भारतीय परिस्थिती पर्यावरणानुसार दृश्यकला इथे विकसित होत गेली. पूर्वरेखेवरचा हा लेखन प्रवास मनोहारी असतो. मी पुन्हा वर्तमानात येऊन पोचलो. (Vincent van Gogh)

वॅन गॉफचे पुनरुजीवन

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विन्सेंट वॅन गॉफच्या पुनरुजीवनाला झळाळी आली. तो मृत्यूनंतर पाश्चात्य संस्कृतीतील कलाक्षेत्राचा एक हिरो बनला. हे शक्य झाले कारण वॅन गॉफची ‘कागदपत्रे, अगदी चिठ्ठयासुद्धा’ पाश्चात्य जगात ठिकठिकाणी जपून ठेवल्या होत्या. त्या अभ्यासकांना सहज मिळत होत्या. म्हणून त्याच्या जीवनावर नाटके, कादंबऱ्या, लिहिल्या गेल्या, चित्रपटही निघाले. कोणत्याही चित्रकारावर इतकी पुस्तके लिहिली गेली नसतील. त्याच्या चित्रांच्या जितक्या कौशल्यपूर्ण नकला केल्या गेल्या आहेत आणि कलेच्या बाजारात विकल्या गेल्या आहेत, तितक्या दुसऱ्या कोणा चित्रवंतांच्या झाल्या नसतील. त्याच्या चित्रांची लाखो पिक्चर पोस्टकार्ड्स झाली आहेत. त्याच्या हयातीत दुर्लक्षित राहिलेला हा चित्रकार आज ‘रोमँटिक आर्टिस्ट’ मानला जातो. त्याच्या मनोविकृती, त्याचे आत्मघातकी जीवन आणि मृत्यू जणू त्याचे जीवनातील अपयश हे त्याच्या यशस्वी पुनरुजीवनाचे कारण ठरले आहे. यातून तज्ज्ञांना वाट पुसत, त्याच्या कलेचा रसरंग आणि बॅन गॉफ एक ‘केस स्टडी’ या दोन्ही अंगांनी केलेला हा लेखन प्रयत्न.

अस्थिरतेच्या अवकाशात

वयाच्या १६व्या वर्षी तो गॉपिल या चित्र विक्रेत्या कंपनीत नोकरीला लागला. तेथे त्याने चार वर्षे काम केले. तेथून त्याची या कंपनीच्या लंडन शाखेत बदली झाली. ही कंपनी फ्रेंच असल्यामुळे त्याला पॅरिसच्या शाखेत काम मिळाले. ‘चित्रं विकणे हा एक फ्रॉड आहे’ असे मत त्याने ऑफिसमध्ये उघडपणे सांगितल्यामुळे त्याला नोकरीतून तडकाफडकी काढून टाकण्यात आले. (Vincent van Gogh)

विन्सेंट ब्रसेल्सला गेला, त्याने हातात पेन्सिल घेतली आणि तो निरनिराळ्या सामान्य माणसांची रेखाटने करू लागला. त्याचा धाकटा भाऊ थिओ त्याची काळजी घेत होता. सगळे बरे चालले होते, पण एक दिवशी त्याचे आणि त्याच्या बापाचे कडाक्याचे भांडण झाले. विन्सेंटने घर सोडले आणि तो द हॉग या शहरी आली. वर्षभर चित्रे काढत होता. एक दिवस अचानक देवीचे व्रण असलेल्या वेश्येबरोबर राहण्याचा त्याने निर्णय घेतला. तिला एक मूल होते. हा निर्णय त्याने कणवेतून घेतला होता. तो पर्यंत त्याने २५ ऑईल पेंटिंग्ज, ३०० रेखाटने आणि काही वॉटर कलर्स केली. पण तेथील चित्रकारांशी

त्याच्या भांडाभांड्या, वाद‌विवाद झाले. तो गावी परतला आई-वडील दोघे आजारी होते. १८८५ला वडील वारले. विन्सेंट आजारी पडला. इतर शारीरिक-मानसिक आजारांसोबतच गुप्तरोगाचे निदान झाले होते. त्यातच तो खंगत गेला. अखेरीस अगदी अशक्त अवस्थेत तो पॅरिसला थिओकडे आला. (Vincent van Gogh)

पण वॅन गॉफचा आर्टिस्ट म्हणून जन्म केव्हा, कसा झाला?

साल २०१५

वॅन गॉफचा लेख टंकत होतो, तेव्हा एक विलक्षण अनुभव आला. त्याच्याबद्दल लिहिताना त्याच्या पुनरुजीवनातून विन्सेंट उलगडत जातो हे समजले. अगदी सिनेमातल्या फ्लॅशबॅकप्रमाणे प्रकाश पडतो, त्याच्या जीवनावर. २०१५ साली ‘मोन्स या बेल्जियममधील शहराची ‘युरोपीयन कॅपिटल ऑफ कल्चर’ म्हणून निवड झाली. २०१५ हे वॅन गॉफच्या मृत्यूचे १२५ वे वर्ष आहे, हे ‘मोन्स’च्या नागरिकांच्या लक्षात आले. मोन्स शहराजवळ क्युसमस हे कोळशाचे खाणगाव आहे. पूर्वी जेव्हा हे गाव कोळशाच्या काळ्या काजळीने माखले होते तेव्हा १८७८ साली २५ वर्षाचा विन्सेंट येथे येऊन राहिला होता. सुवार्तिक ख्रिस्तीधर्माचा प्रसार करणारा उपदेशक म्हणून त्या गावात तो आला होता. त्याला चर्चचा आदरणीय पाद्री होण्याची मनिषा होती, पण तशी संधी त्याला मिळाली नाही.

तो आसपासच्या जगाशी स्वतःला जोडू पाहात होता, संपर्क संवाद करू पाहत होता. ते त्याला जमत नव्हते. पण शेतकरी, कामकरी तसेच खाणकामगार यांच्याशी मात्र त्याचे नाते झटकन जुळले. काहींशी तर त्याची मैत्री झाली. सह-अनुभूती (एम्पथी) आणि सहानुभूती (सिम्पथी) या भावना नात्यात होत्या. मग त्यांनी त्यांची रेखाटने करण्यास सुरुवात केली. त्याला कलाशिक्षण नव्हते. तो स्वशिक्षित होता. स्वतःला घडवण्यासाठी तो ब्रेटन आणि मिलट यांच्या चित्रासारखी चित्रे काढू लागला. या दोन्ही चित्रकारांच्या शैलीबद्दल आणि त्यांनी निवडलेल्या तळागाळातील चित्रविषयाबाबत त्याला विलक्षण आदर होता. त्यांची चित्र नक्कल करणे, हा त्याच्यासाठी चित्रकलेच्या शिक्षणाचा रियाज होता. त्याची ‘द डिगर्स’ ‘द सोअर’ ही त्या काळातील चित्रे त्याची नैसर्गिक प्रतिभा आणि खोल भावनिक बुध्यांक दर्शवतात. (Vincent van Gogh)

चित्रकार गॉफचा जन्म…

बॅन गॉफने रंगांचे जाडथर, उठावदार पोत, तेजस्वी आणि तीव्र रंग वापरून खेड्यातली कामकरी माणसांचे रोजचे ठसठोंबस जीवन कॅन्व्हासवर सजीव केले. १८८० साली क्युसमस या गावी त्याने चित्रकार होण्याचा निर्णय घेतला. तो त्याच्या जीवनातील स्पष्टतेचा क्षण होता. २०१५ साली १२५ व्या स्मरणवर्षाच्या निमित्ताने भरलेल्या ‘बॅन गॉफ द बर्थ ऑफ अॅन आर्टिस्ट’ या प्रदर्शनात त्याची ही चित्रे मांडली होती आणि त्या गावातून विन्सेंटने त्याचा भाऊ थिओ याला जी पत्रे लिहिली, त्या सात पत्रांचा व्यवहार प्रदर्शनार्थ ठेवला होता. एका पत्रात विन्सेंटने लिहिले आहे, ‘इथे माझे रक्ताभिसरण पुन्हा सुरू झाले आहे, काही महिन्यापूर्वी अशी माझी स्थिती नव्हती. १८८८ साली थिओने त्याच्या बहिणीला लिहिले, ‘विन्सेंटचा जगाबद्दलचा दृष्टिकोन स्वच्छ आणि स्पष्ट आहे, हे एक आश्चर्य आहे. त्याला आणखी काही वर्षे आहेत, त्यात तो निश्चितच नाव कमवेल.’ पण पुढे फक्त दोनच वर्षे शिल्लक होती. माझ्याकडे एका जुन्या पुस्तकाच्या दुकानात मिळालेले, छोटेखानी वॅन गॉफचे रंगीत सचित्र चरित्र आहे, त्याची रंगीत पाने उलटताना हा पट डोळ्यापुढे उभा राहतो.

नाद जपानी कलेचा

जपान दोनशे वर्षे पाश्चात्य देशांपासून कुलुपबंद होता. १८५४ मध्ये अमेरिकेने जपानला व्यापार-उदिमाकरता दरबाजे उघडण्याची सक्ती केली. याचा युरोप अमेरिकेतील दृश्यकलेतील आविष्कारावर परिणाम झाला. जपानी कलेने युरोपीय बाजार अक्षरशः तुडुंबला. युरोपीय दर्शकांना Ukiyoe – उकीयोए म्हणजेच ‘तरंगत्या जगाची चित्रे’ ही कला प्रथमच पाहायला मिळाली. जापानी लँडस्केप्स, रस्त्यावरची दृश्ये, लोककथा, आणि निसर्ग विषय दाखवणारी तेजस्वी जिवंत रंगीत ‘वूडब्लॉक प्रिंट्स’ थोड्याच काळात लोकप्रिय झाली. उकीयोए ही जपानी कलाशैली १६०३-१८६८ काळात बहरली. जपानी ‘काष्ठ छपाई’ ही कला सातव्या शतकात चीनमधून जपानमध्ये आली. यात कलाकार आधी लाकडावर चित्र कोरतो, नंतर वॉटर कलर वापरून छपाई करतो. यात कलाकार आणि छपाईकार या दोघांचे कौशल्य उपयोगी ठरते. पॅरिस येथील इम्प्रेशनिस्ट मॅने, मोने, डुगाह, यांनी या जपानी प्रिंट्सचा अभ्यास केला, पण बॅन गॉफला त्यातील सौंदर्य जसे शोषून घेता आले, तसे कोणालाच आले नाही. २०१८ मध्ये ‘बॅन गॉफ आणि जपान’ हे प्रदर्शन अॅमस्टरडॅम येथे भरले होते. त्याच्याकडे ६६० जपानी प्रिंट्स होती. त्यातील बरीच त्याने त्याच्या स्टुडियोच्या भिंतीवर लावली होती. वॅन गॉफने स्वतः

६० जपानी पेंटिंग केली होती. या सगळ्याचे ते प्रदर्शन होते. त्यात विन्सेंट आणि थिओ यांचा जपानी चित्रांबाबतचा पत्रव्यवहार दर्शकांकरता हेतूपुरस्सर ठेवला होता. विन्सेंटने थिओला एका पत्रात लिहिले आहे, ‘माझे सगळे चित्रकाम काही प्रमाणात जपानी कलेवर आधारित आहे.’

पॅरिस येथे बॅन गॉफला जपानी कलेचा नाद आणि ध्यास लागला. तो घेऊनच विन्सेंट दक्षिण फ्रान्समधील अर्लिस या गावी गेला. विन्सेंट एका पत्रात थिओला लिहितो, ‘येथे सुद्धा मी जपानी नजरेतून पाहतो.’ या काळातील त्याच्या पेंटिंगमध्ये ब्रशचे फटकारे उत्तीर्व होते, रंगांची घुमड होती आणि त्या बरोबरच उकीयोएमधील नितांत आणि रमणीय प्रशांतताही होती. ‘सनफ्लॉवर्स’ (१८८८), ‘द नाइट कॅफे’ (१८८८), या चित्रात त्याचा जपानी डोळा दिसतो, असे कला समीक्षक म्हणतात.

सुंदरीचे चित्र

विन्सेंटने १८८७ मध्ये Courtesan हे जपानी पेंटिंग केले. पॅरिस इलस्ट्रे या मासिकाच्या मुखपृष्ठावर Keisai Eisen (१७९०-१८४८) या सुप्रसिद्ध उकीयोए कलाकाराचे ‘bijin-ga’ ‘सुंदर स्त्रीचे चित्र’ हे प्रिंट वापरले होते. त्यावरून कोर्टझान हे पेंटिंग केले होते. उकीयोए शैलीतील हे व्यक्तिचित्र आहे. चित्राभोवतीच्या महिरपीत ‘लिली पाँड’ आणि बेडूक आणि बगळे आहेत. बेडूक आणि बगळे यांच्या फ्रेंच शब्दाचा ‘स्लॅग’ अर्थ वेश्या असा होतो. ती जपानी ‘गेशा’ असेल का? ते दर्शकाने ठरवावे.

पाश्चात्य व्यक्तीचित्रापेक्षा हे खूप वेगळे होते. २०१८ सालच्या ‘वॅन गॉफचा जपानी प्रभाव’ या प्रदर्शनाचे ते एक आकर्षण होते.

पुलावरचा अवचित पाऊस

हिरोशिगी (१७७७-१८५८) हा उकीयोए शैलीतला सुप्रसिद्ध कालाकार. त्याने १८५७ मध्ये ‘Sudden shower over Shin-Ohashi bridge and Atake’ हे चित्र काढले होते. सुमिदा नदीवरचा पूल आणि आटेक गोदीवर अचानक आलेला ढगफुटी पाऊस, याने लोकांची उडालेली धांदल या चित्राचे प्रिंट पाहून बॅन गॉफ प्रभावित झाला. त्यावरून विन्सेंटने ‘द ब्रिज इन द रेन’ हे उकीयोए पेंटिंग केले. यात त्याने त्याच्या रंग कुंचल्याने ढगांचे पुंजके दाखवले, पुलाखाली फेसाळलेला हिरवट दर्या आणि वरून पडणारा पाउस उभ्या बारीक पातळ रेषात चित्रित केला आहे. पेंटिंगच्या महिरपीमध्ये कांजी या व्हॅन गॉफने मानवी प्रेरणांचा अथक शोध घेतला. त्याच शोधात त्याने ‘द सोअर’ आणि ‘द डिगर्स’ ही दोन जगप्रसिद्ध चित्रे साकारली…

चिनी व्यक्तिरेखांची आरास केली आहे. मी एक सामान्य वाचक, दर्शक, पण कविता, चित्रकलेचा लोभी. चित्र आणि कविता मला समसमान भासतात. मग कधी कविता वाचता वाचता चित्र डोळ्यांपुढे तरळते, कधी चित्र नजरले, तर कविता आठवते.

हे पेंटिंग पाहिल्यानंतर ‘पावसाच्या गर्भतळी’ (प्रकाशक शब्दमल्हार प्रथम आवृत्ती ७ जून २०२५) या कविता संग्रहातील कवी स्वानंद बेदरकर यांच्या पावसाच्या रेषा आठवल्या…

चित्रात रेघांनी दाखवलेल्या पावसाने ओला होत नाही कागद वा रंगही पसरत नाही इतस्ततः…

… असे काहीच होत नाही तरी भरत जातो कलाकृतीतला पाऊस प्रत्येकाच्या डोळ्यांत…

‘चित्रकार नेहमीच कवी असतात. आकार आणि रंग यांचे संतुलन साधत, नजरेला सुखदायी, असा सुंदर आकृतीबंध पेंटिंगमध्ये करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो’ (इ. एच. गॉम्ब्रिच १९०९-२००१ सुप्रसिद्ध कलाइतिहासकार) या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ आणि आतील मांडणी चित्रवंत चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केली आहे, हे सूचक आहे.

बदामी बहर

होकुसाई (१७६०-१८४९) या उकीयोए कलाकाराचे ‘बुलफिंच आणि विपिंग चेरी ब्लॉसम’ हे प्रिंट वॅन गॉफने कला विक्रेत्याकडे पाहिले होते. खूप महाग असल्याने तो ते विकत

घेऊ शकला नाही. पण या प्रिंटने त्याच्या मनावर खोल परिणाम केला. १८९० मध्ये तो दक्षिण फ्रान्स येथील ‘सेंट रेमी असायलम’ मध्ये भारती झाला होता. तेथे त्याला त्याचा भाऊ थिओला मुलगा झाल्याचे कळले. पुतण्याचा जन्म साजरा करण्यासाठी त्याने सृजनाचे, नवजीवनाचे प्रतीक म्हणून ‘आमंड ब्लॉसम्स’ (१८९०) बदामाच्या फुलांचा बहर हे उकीयोए-ए होकुसाई शैलीतील पेंटिंग केले. निळ्या पार्श्वभूमीवर रंगवलेला नाजूक फुलोरा चित्रात कोणतीही सावली नसलेला, हा रंगकलेचा अभिजात नमुना आहे. वॉलपेपर, सोफा, फर्निचर, गादिकाम या वरील आवरणे, कॅन्व्हास बॅग्ज यावर चित्राच्या असंख्य प्रिंट्स जगभर लोकप्रिय झाल्या आहेत. आजही या पेंटिंगच्या प्रतिकृती वारेमाप विकल्या जातात. विन्सेंट असा घराघरांत पोहोचला आहे.

चेरी ब्लॉसम क्षणिकतेचे प्रतीक मानले जाते, पण बदामाचा फुलोरा हे नवजीवनाचे नाजूक प्रतीक म्हणून विन्सेंटने हे पेंटिंग केले. त्याची उकीयोए शैलीतील पेंटिंग्ज या नकला नव्हत्या, कारण प्रत्येक चित्रात वॅन गॉफ होता. (Vincent van Gogh)

निर्वाणाची अंतः प्रेरणा ?

वॅन गॉफने १८८८ मध्ये दक्षिण फ्रान्समध्ये असताना सेल्फ पोर्टेट काढले होते. त्यात त्याने डोक्यावरचे केस आणि भुवया बारीक करून घेतल्या होत्या. त्या स्वचित्राबाबत तो थिओला लिहितो, ‘या स्वचित्राला राखाडी आणि फिकट हिरव्या रंगाची पार्श्वभूमी आहे. जपानी बौद्ध भिक्षुसारखे हे माझे चित्र आहे.’ त्याला निर्वाणाची जाणीव झाली होती का? असा विचार स्पर्शन गेला. टंकत वेळ कसा गेला हे कळले नाही. शब्दमर्यादला पोहोचलो होतो. बाहेर आकाशाकडे नजर टाकली, विन्सेंटचे ‘स्टारी नाइट’ कोणीतरी रंगविले होते, का ते मी मनोमय नजरत होतो ?

(व्यवसायाने हृदयरोग तज्ज्ञ असलेले डॉ. आनंद जोशी हे मराठीतले नामवंत विज्ञानलेखक, ललितलेखक आहेत. ‘बोलकी हाडे’, ‘मेंदूतला माणूस’, ‘कर्कविज्ञानाची गोष्ट’, ‘अक्षर पाविजे निधरि’, ‘व्यूहृचक्र’, ‘आपले वर्तन, आपला मेंदू’ (सहलेखक सुबोध जावडेकर) ‘ऑर्वेलच्या अवतीभोवती’ ही त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके आहेत.)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00