मुंबईः मेळघाट संघर्ष यात्रेच्या निमित्ताने मेळघाटातील आरोग्य, पाणी पुरवठा आणि इतर समस्या शासन स्तरावरून सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या सर्व उपाययोजना तातडीने अंमलात आणण्यासाठी येत्या आठवड्यात बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन मंत्री प्रकाश आबिटकर आणि उदय सामंत यांनी दिले. (Melghat Sangharsh Yatra)
बच्चू कडू यांच्या नेतृत्वात कर्जमुक्ती आठवण व मेळघाट संघर्ष यात्रेचा समारोप आज चिखलदरा येथे करण्यात आला. या यात्रेच्या निमित्ताने उद्योगमंत्री उदय सामंत आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. यावेळी आनंदराव अडसूळ, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला आदी उपस्थित होते. (Melghat Sangharsh Yatra)
एकनाथ शिंदे यांचे फोनवरुन आश्वासन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांशी संवाद साधला. मेळघाटमधील प्रश्नांची मला जाण असून येत्या काळात विशेष बैठक बोलविण्यात येईल. यामध्ये आरोग्य, पाणीपुरवठा, सिडको, स्कायवॉक आदी सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येईल. यात धोरणात्मक अडचण निर्माण झाल्यास मुख्यमंत्र्यांकडेही दाद मागण्यात येईल. सध्या शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांना न्याय मागण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. सरकारकडून सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिले. (Melghat Sangharsh Yatra)
मंत्री उदय म्हणाले, राज्य शासनाने दोन लाख रुपयांची केलेली कर्जमुक्ती ही बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे झाली आहे. कर्जमुक्तीचा निर्णय आंदोलनामुळे झाला आहे. या कर्जमुक्तीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठपुरावा करून तीस जूनपर्यंत अहवाल घेतला आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्याने कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. पदयात्रेच्या निमित्ताने आदिवासींचे विविध प्रश्न समोर आले आहेत. या सर्व प्रश्नांची दखल शासनाने घेतली असून यानंतर या बाबीसाठी पुन्हा आंदोलन करावे लागणार नाही. शासनाच्या योजना राबवताना त्रुटी आढळल्यास यात लक्ष घालून त्याची पूर्तता येत्या काळात करण्यात येईल.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, चुरणी येथील उपजिल्हा रुग्णालय ३० खाटांवरून ५० खाटांचे करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. त्यासोबतच या ठिकाणी सेवा देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र बजेट देण्यात येईल. आंदोलनाच्या निमित्ताने मेळघाटातील विविध समस्या समोर आल्या आहेत. या समस्यांवर योग्य उपाययोजना करून कार्यवाही करण्यात येईल.
यावेळी बच्चू कडू यांनी चिखलदरा आणि मेळघाट परिसरातील विविध समस्यांची माहिती दिली. (Melghat Sangharsh Yatra)