कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराणी ताराराणीची नैतिकता, नेतृत्वगुण, संघटन, मुत्सद्दीपणा आणि स्वराज्याबद्दल नि:स्सिम प्रेम याबरोबरच समाजातील शेवटचा माणूस त्याच्यासोबत असल्याने त्यांनी बलाढ्य औरंगजेबाला महाराष्ट्रातच झुकवले. मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुध्दातील छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई हे सुवर्णपान होते. अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. (Maharani Tararani)
शहाजी छत्रपती म्युझिअम ट्रस्ट आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या ‘मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई’ या ग्रंथाचे प्रकाशन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी खासदार शाहू छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के, ग्रंथाचे लेखक डॉ. जयसिंगराव पवार, माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, डॉ. मंजूश्री पवार, शाहू छत्रपती ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र चव्हाण, सुरेश शिपुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.(Maharani Tararani)
खरा इतिहास लिहिणारी माणसे खूप कमी असून ताराराणींचा सत्य इतिहास लिहिल्याबद्दल खासदार सुळे यांनी डॉ. जयसिंगराव पवार यांचे आभार मानले. डॉ. जयसिंगराव पवार यांनी सत्यनिष्ठ इतिहासाचे लेखन केले आहे. ताराराणींचा पराक्रमाचा आणि शौर्याचा इतिहास भावी पिढीसमोर येण्यासाठी त्याचा समावेश राज्य सरकारने पाठपुस्तकात करावा, अशी मागणी करून त्या म्हणाल्या, सध्याच्या काळात पुरातत्व विभाग वास्तवापासून दूर आहे का? तिथला इतिहास बदलला जात आहे का? अशा शंका निर्माण होत असताना ताराराणींचा सत्य इतिहास लिहिला गेला आहे. ताराराणींच्या पराक्रम आणि शौर्याचे धडे इतिहासाच्या पुस्तकात लावले पाहिजेत. तरच पुढच्या पिढीला त्यांचा पराक्रम कळेल. त्यांचे चरित्र इंग्रजीसह अन्य भाषात भाषांतरीत झाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.(Maharani Tararani)
औरंगजेबाशी सात वर्षे संघर्ष
डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, ‘गेली ६० वर्षे ताराराणींवर ग्रंथ लिहिण्याचा विचार करत होतो, पण गेल्या सात वर्षांत माझे मिशन पूर्ण झाले आहे. सध्याच्या पिढीला आम्ही ताराराणीविषयी शिकवले नाही हे आमचे अपयश आहे. औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी २७ वर्षे संघर्ष करुन छत्रपती संभाजीराजे, शिवपुत्र राजाराम महाराज, आणि त्यांची स्नुषा महाराणी ताराराणी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्याचे संरक्षण केले. शेवटच्या सात वर्षात ताराबाईंनी पराक्रम आणि मुत्सद्देगिरीच्या जोरावर औरंगजेबाला नेस्तानाबूत केले. ’.(Maharani Tararani)
आपल्या बापजाद्यांनी तलवारी गाजवल्या पण इतिहास लिहिला नाही. तर आमच्या मराठ्यांचा पराक्रमाचा इतिहास शूत्रूंनी लिहिला, याकडे लक्ष वेधताना इतिहास संशोधक डॉ. पवार यांनी ज्या पन्हाळागडावर महाराणी ताराराणींचा विवाह झाला. शत्रूशी झुंजताना पन्हाळागडावर खलबती केल्या. मराठ्यांचे राज्य स्थापन करुन पन्हाळा येथे राजधानी केली. तिथे त्यांचा पुतळा उभा रहावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
नानासाहेब पेशव्यांशी झुंज
खासदार शाहू छत्रपती म्हणाले, ‘देशात २२ सुभे असलेल्या बलाढ्य औरंगजेबाला एक सुभा असलेल्या महाराणी ताराबाईंनी पराभूत केले. छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीतून संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्यासह पराक्रमी सरदारांनी पराक्रम करुन मोगलांना जेरीस आणले. जिंजीतच ताराराणींचे नेतृत्वगुण दिसून आले. छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर ताराबाईंनी पराक्रमाच्या जोरावर औरंगजेबाला नेस्तानाबूत केले. नानासाहेब पेशव्यांना मुत्सद्देगिरीने झुंज दिली. अशा महान ताराराणींनी कोल्हापुरात मराठयांचे साम्राज्य निर्माण केले’.
शिक्षणमहर्षी व्ही.टी. पाटील यांनी ताराराणी विद्यापीठाची स्थापना केली. त्यांचा पुतळा उभारला. डॉ. जयसिंगराव पवार यांनी संशोधन करुन ताराराणींचा ग्रंथ लिहिल्याने भावी पिढीला स्फूर्ती मिळेल, असा विश्वास खासदार शाहू छत्रपतींनी व्यक्त केला.(Maharani Tararani)
भावी पिढीला प्रेरणा
ताराराणींचा ग्रंथ लिहिल्याने भावी पिढीला त्यांच्या पराक्रमांपासून प्रेरणा मिळेल, असे सांगून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महाराणी ताराराणी यांच्यावर मालिका करण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच पन्हाळा किल्ल्यावर ताराराणींचा पुतळा उभाराला जाईल, असे आश्वासन दिले.
ताराराणींचा सत्य इतिहास लिहिल्याबद्दल वैदयकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ डॉ. पवार यांचे आभार मानले. राज्य सरकारकडून पन्हाळा गडावर ताराराणींचा पुतळा उभारला जाईल अशी ग्वाहीही दिली.
कार्यक्रमाला याज्ञसेनी राणीसाहेब, संयोगिता राजे, मधुरिमा राजे, शहाजी राजे, यशस्वीनी राजे, यश राजे, शाहू उद्योग समूहाचे समरजीत घाटगे, माजी आमदार के.पी. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आभार सुरेश शिपूरकर यांनी मानले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. तारा कमांडो फोर्सने ताराराणींचे गौरव गीत तर शाहीर आझाद नायकवडी यांनी पोवाडा सादर केला.(Maharani Tararani)
सुप्रिया सुळेंचे राजकर्त्यांना टोले
देश संविधानाने चालतो, कुणाच्या मर्जीने चालत नाही, अरे ला का रे, असे उत्तर न देता जनतेत मिसळल्याने समाजातील शेवटच्या माणसाने मला साथ दिली म्हणून मी विजयी झाले, असे टोले सुप्रिया सुळे यांनी भाषणात लगावले. पंडित नेहरुंची वैज्ञानिक दृष्टी होती म्हणून आपण त्यांनी स्थापन केलेल्या शाळेत शिकलो, ही त्यांची दूरदृष्टी होती, टोला ६० वर्षात देशाने काय केले या विरोधकांच्या टीकेवर त्यांनी लगावला.
गप्प बसतो तो खरा गुन्हेगार
दडपशाही ही चुकीची पद्धत आहे. दडपशाहीच्या विरोधात जो गप्प बसतो तो खरा गुन्हेगार असतो. बीड परभणीतील अत्याचाराच्या विरोधात जे गप्प आहेत ते तेवढेच गुन्हेगार आहेत, असा टोला सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.(Maharani Tararani)
गुजरात नव्हे, महाराष्ट्र पॅटर्न हवा
गुजरात राज्यातील भूज येथील भूकंपाचे पुनर्वसनाचे काम शरद पवारांनी केले. त्यांचे कौतुक अटलबिहारी वाजपेयींनी केले. गुजरातमध्ये महाराष्ट्र पॅटर्न चालला. त्याला राज्यमान्यता मिळाली. मग महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न कशाला हवा, महाराष्ट्र पॅटर्न संपूर्ण देशभर चालला पाहिजे, असे मत खासदार शाहू छत्रपती यांनी व्यक्त केले.