Home » Blog » बँकिंग व्यवस्थेचे पोस्टमार्टम करणारी डॉक्युमेंटरी

बँकिंग व्यवस्थेचे पोस्टमार्टम करणारी डॉक्युमेंटरी

by प्रतिनिधी
0 comments

The Great Indian Illusion ! भ्रमाचे पडदे फाडून, देशातील बँकिंग उद्योग सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याच्या जिव्हाळ्याचा विषय कसा आहे हे लोक शिक्षण करणारी वरुण सुखराज यांची नवीन डॉक्युमेंटरी फिल्म !

  • संजीव चांदोरकर

डॉक्युमेंटरीज बऱ्याच बनत असतात. पण शुद्ध राजकीय अर्थव्यवस्था, त्यात देखील बँकिंग सारख्या क्लिष्ट विषयाला, डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून भिडण्याचे धाडस फक्त वरुणच करू शकतो. जे त्याने केले आहे. The Great Indian Illusion या तब्बल ८८ मिनिटांच्या फिल्म मधून. ( युट्यूबवर ती उपलब्ध आहे). बँकिंग क्षेत्र कोणत्याही प्रगत, आधुनिक अर्थव्यवस्थेच्या हृदयाच्या स्थानी असते. त्यातून होऊ शकणाऱ्या किफायतशीर व्याज आणि खात्रीशीर पतपुरवठ्यावर देशातील बॉटम ऑफ पिरॅमिड मधील नागरिकांचे अर्थव्यवहार सुदृढ होऊ शकणार असतात. पण… (The Great Indian Illusion)

कॉर्पोरेटच्या कह्यात

स्वातंत्र्यानंतर, विशेषतः १९६९ मधील बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतर, देशातील आपले हक्काचे बँकिंग क्षेत्र, आपले राहणीमान उंचावण्यासाठी काम करेल अशी वाजवी अपेक्षा देशातील कोट्यावधी जनतेने बाळगली होती. तो भ्रम होता हे गेल्या काही वर्षात पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे. वरुण त्या भ्रमनिरासाची गोष्ट त्याच्या फिल्म मधून आपल्याला सांगत आहे.

स्वातंत्र्यापासूनच्या बँकिंग पासून सुरुवात करून फिल्म आजच्या काळापर्यंतचा वेगवान प्रवास आपल्याला घडवते. ग्रामीण आणि शहरी भागातील भौतिक दृष्ट्या वंचित असणारे समूह औपचारिक बँकिंग क्षेत्रापासून देखील वंचित आहेत हे दाखवते. देशातील बँकिंग क्षेत्र हळूहळू कसे मोठ्या कॉर्पोरेटच्या कह्यात गेले. किती मोठ्या कंपन्यांनी, मोठी कर्जे घेऊन ती कशी थकवली. आम्ही देशाच्या विकासासाठी कंपन्या चालवतो असा दावा करणारे भांडवलदार प्रवर्तक एका रात्रीत देश सोडून कसे पळाले हे ही फिल्म सांगते. (The Great Indian Illusion)

रिझर्व बँक काय करत होती?

पण हा खरेच बँका आणि ते भ्रष्ट प्रवर्तक यांच्यातील खासगी मामला होता का? रिझर्व बँक काय करत होती? काय करते? असा वाजवी प्रश्न आपल्या मनात उपस्थित करत रिझर्व्ह बँकेच्या अनेक धोरणांची सामान्य नागरिकांना समजेल अशा पद्धतीने चिरफाड ही फिल्म करत जाते. (The Great Indian Illusion)

सवलतीच्या व्याजदराने शेतीक्षेत्राला कर्जे द्यावी लागू नयेत म्हणून आता बँका डायरेक्ट शेतकऱ्यांना कर्जे न देता एनबीएफसी कंपन्यांना कर्जे देतात. मग या एनबीएफसी चढ्या /शोषक व्याजदराने ते पैसे शेतकऱ्यांना कर्जे म्हणून देतात. मुंबई आणि मोठ्या शहरातील कंपन्या आम्ही शेतीक्षेत्रासाठी वास्तुमाल / सेवा पुरवतो असे कागदोपत्री दाखवत प्रायोरिटी सेक्टर साठी राखून ठेवलेली कर्जे कशी हडप करतात…, हे फिल्म सविस्तरपणे सांगते.

१२ लाख कोटींचे कर्ज निर्लेखित

फिल्मच्या ओपनिंग वाक्यापासून वरुण स्वतः त्याच्या संयत आवाजात दर्शकांना हाताला धरून भारतीय बँकिंग क्षेत्राच्या खोल पाण्यात (खरेतर दलदलीत) फिरवून आणतो. बँकिंग क्षेत्राने एकत्रितपणे १२ लाख कोटी रुपयांचे कर्ज निर्लेखित (Write Off) केले आहे, हे सांगत १२ लाख कोटी म्हणजे किती होतात हे प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचवतो. (The Great Indian Illusion)

या १२ लाखात किती विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह आहार दिला जाऊ शकतो, किती घरे, किती रोजगार हमीचे दिवस, किती आरोग्य सेवा… आणि हे सारे कित्येक वर्षे दिले जाऊ शकले असते हे आकडेवारी घेऊन सांगतो. फक्त त्या तीन चार मिनिटांमध्ये बँकिंग क्षेत्रात जे काही गैर सुरू आहे त्याचा संबंध माझ्या वंचितावस्थेशी कसा आहे हे वरुण एवढ्या सोप्या पद्धतीने सांगतो, की अगदी वित्त निरक्षर नागरिकाला देखील कळेल.

फिल्मची उपयुक्तता

या फिल्ममध्ये पी साईनाथ, सुचेता दलाल, देवीदास तुळजापूरकर, प्रशांत भूषण, पृथ्वीराज चव्हाण या आणि अशा जाणकारांच्या मुलाखती आहेत. प्रसाद झावरे निर्माते आणि कुणाल कामरा सहनिर्माते यांनी या फिल्मची निर्मिती केली आहे. वरुणच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेले काम देखील वाखाणण्याजोगे आहे. (The Great Indian Illusion)

देशातील बँकिंग उद्योगाच्या बॅलन्स शीटचे सतत वाढणारे आकार, त्यांच्या शेअर्सच्या सतत वाढणाऱ्या किमती आणि आपल्या हक्काच्या बँकिंग क्षेत्राकडून भ्रमनिरास झालेल्या देशातील कोट्यावधी नागरिकांचा परस्परसंबंध काय आहे, हे या फिल्मवरून कळून येईल. आणि जोपर्यंत हा विरोधाभास राहील तोपर्यंत या फिल्मची उपयुक्तता देखील राहील. वरुण सुखराज आणि त्याची सारी टीम तरुण आहे. हे तरुण दिसतात, भेटतात म्हणून भविष्याबद्दल आशेची ज्योत तेवत राहते. वरुण आणि या फिल्मशी सबंधित सर्वांना खूप शुभेच्छा. सर्वांनी वेळ काढून ही फिल्म जरूर पाहावी

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00