Home » Blog » Kolkatta Murder Case : संजय रॉयला जन्मठेप

Kolkatta Murder Case : संजय रॉयला जन्मठेप

कोलकात्त्यातील डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात निकाल

by प्रतिनिधी
0 comments
Kolkatta Murder Case

कोलकात्ता :  आर. जी. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी कोर्टाने संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच ५० हजार दंडही ठोठावला. सियालदह कोर्टाने रॉयला शनिवारी दोषी ठरवले होते. (Kolkatta Murder Case)

तसेच पीडित डॉक्टरच्या नातेवाईकांना १७ लाखाची नुकसानभरपाई देण्याचे आदेश पश्चिम बंगाल सरकारला दिले. सहा महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. गुन्ह्याची तीव्रता पाहता दोषी रॉय याला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा सुनावली जाईल, अशी शक्यता होती. कोर्टाने सोमवारी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निकालावर आर. जी. कार रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्टर्सनी असमाधान व्यक्त केले. इतर संशयितांवर कारवाई झालेली नाही, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतरांची चौकशी करण्याची मागणीही या डॉक्टर्सनी केली आहे.(Kolkatta Murder Case)

डॉक्टरवर बलात्कार आणि खुनाची घटना सहा महिन्यांपूर्वी घडली होती. हॉस्पिटलच्या सेमिनार रूममध्ये डॉक्टरांचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रॉयला अटक केली होती. न्यायालयाने त्याला भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ६४, ६६, आणि १०३(१) अंतर्गत दोषी ठरवले. या कलमानुसार जन्मठेपेपासून मृत्युदंडापर्यंतची शिक्षा आहे.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) ने तपास केला होता. डीएनए रिपोर्ट, टॉक्सिकॉलॉजी रिपोर्ट्स आणि सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक पुराव्याच्या आधारे रॉयला शनिवारी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिर्बन दास यांनी दोषी ठरवले.(Kolkatta Murder Case)

“मला फसवले जात आहे.  मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी काहीही केले नाही आणि तरीही मला दोषी ठरवले गेले आहे,” असे रॉयने शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायालयात सांगितले. मला कोठडीत मारहाण करण्यात आली आणि जबरदस्तीने कागदपत्रांवर मला सह्या करायला लावल्या, असे तो म्हणाला.

सीबीआयच्या वकिलांनी सांगितले की,  डॉक्टरांचे व्रत सेवा हे असते.  इतरांची सेवा करणाऱ्या डॉक्टरवर झालेला हल्ला हा दुर्मिळातील दुर्मिळ आहे आणि त्यामुळे आरोपी फाशीच्या शिक्षेस पात्र आहे.  न्यायालयाने दोषीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकून राहील, असे वकिलाने सांगितले. युक्तिवाद ऐकून न्यायालयाने रॉयला दोषी ठरवले. सोमवारी शिक्षा सुनावली.

 

हेही वाचा :

सैफ अलीवर हल्ला करणारा बांगलादेशी, ठाण्यातून अटक

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00